जीवनातील सकारात्मकता आणि जीवनाचे खरे कार्य !

मनुष्य स्वतःचा बराचसा वेळ आनंद आणि समाधान यांच्या शोधात घालवतो. तरीही विज्ञान आणि तंत्रज्ञान यांत विलक्षण प्रगती असूनही चिरस्थायी आनंद दुर्मिळ वाटतो. आपण शांतता आणि सुरक्षितता यांची आस बाळगतो; पण त्याच वेळी संघर्षाविषयी आपल्याला आकर्षणही वाटते. हिंसाचार बातम्यांमध्ये भरून रहातो, तर मनोरंजन आक्रमकता आणि सूडाला प्रशंसनीय किंवा शौर्यपूर्ण म्हणून चित्रित करते. अगदी राष्ट्रेसुद्धा स्वतःचे मतभेद मिटवण्यासाठी लढाईचा मार्ग अवलंबतात. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो, म्हणजे मानवी जीवनाचे प्रयोजन स्वतःला पूर्णपणे समजले आहे का ? ३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पालट होणे, हे दैनंदिन जीवनात असणारे मूलभूत वास्तव, स्वतःचे लक्ष भूतकाळ आणि भविष्यकाळ यांकडे असल्यास वास्तव स्वीकारता येणे अवघड, प्रामाणिकपणाचा प्रारंभ वास्तवाच्या स्वीकारण्यानेच आणि ध्येयापर्यंत पोचण्यापेक्षा त्यापर्यंतच्या प्रवासाचा आनंद घेणे महत्त्वाचे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/1057323.html

११. स्वतःची स्वप्ने साकारली, तरी अनेकदा चिरंतन समाधान न लाभणे

यामुळे आणखी एक प्रश्न निर्माण होतो तो, म्हणजे मानवता शेवटी कशाचा शोध घेत आहे ? आपल्या सर्व कृतींमागे ही आशा असते की, क्षणभंगूर सुख एके दिवशी शाश्वत आनंदात रूपांतरित होईल; परंतु आपल्या प्रयत्नांमध्ये प्रचंड वेळ आणि ऊर्जा खर्ची घालूनही चिरंतन समाधान अनेकदा हाती लागत नाही.

आनंदा मॅथ्यूज

इच्छा पूर्ण झाल्या, तरीही त्यातून मिळणारे समाधान सहसा तात्पुरतेच असते. आपण स्वतःची स्वप्ने साकारली, तरी ती कामगिरी कालांतराने केवळ एक आठवण बनून रहाते, तसेच प्रत्येक पद, मालमत्ता आणि यश काळाच्या ओघात मागेच रहाते. आपले अनुभव वारंवार हेच सिद्ध करतात की, आपण मिळवलेल्या गोष्टी आपल्याला केवळ क्षणिक समाधान देतात. त्यामुळे जीवनाचा उद्देश स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा आपल्या प्रतिसादांना प्रकट करण्याशी अधिक संबंधित असू शकतो. प्रत्येक पाऊल आपल्याला सकारात्मकता किंवा नकारात्मकता निवडण्याची संधी देते आणि आपण केलेली ती निवडच पुढील घडामोडींवर प्रभाव पाडते.

१२. जीवनात सकारात्मक सहभाग घेता येईल, असे गुण विकसित करणे, हेच जगण्याचे सखोल प्रयोजन !

कदाचित् वरकरणी दिसणार्‍या गोष्टींच्या पलीकडे हेच सत्य दडलेले आहे की, जगण्याचे सखोल प्रयोजन केवळ आपल्याला हवे ते मिळवणे किंवा स्वतःला सुखी करणे, हे नसून ज्याद्वारे आपण जीवनात सकारात्मक सहभाग घेऊ शकू, असे गुण विकसित करणे, हे आहे. नकारात्मकतेने अधिकाधिक व्यापलेल्या या जगात जिथे विध्वंसक वर्तनाचे अनेकदा कौतुक केले जाते आणि तात्पुरत्या आनंदासाठी सकारात्मक नसलेल्या कृतींचे समर्थन केले जाते, तिथे आपण सर्वप्रथम खर्‍या अर्थाने माणूस बनले पाहिजे. दयाळू, काळजी घेणारे, करुणाशील आणि सेवाभावी, हे गुण आपल्या पलीकडे जाऊन व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला बळकट करतात. तेव्हा हे स्पष्ट होते की, मानवतेला हवा असलेला चिरस्थायी आनंद हा तिच्या इच्छा पूर्ण झाल्याचा परिणाम नाही. उलट जेव्हा आपण कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता सातत्याने सकारात्मकता आणि निःस्वार्थ सेवेची निवड करतो, तेव्हा तो नैसर्गिकरित्या प्रकट होतो. तेव्हा आपल्याला हे कळू शकते की, चिरस्थायी आनंद आपण काय मिळवतो किंवा अनुभवतो, यात कधीच दडलेला नव्हता, तर आपण काय बनतो, यात होता. हे आदिम गुण अंगीकारल्याने चिरस्थायी समाधान हे परिणामांवर नियंत्रण ठेवण्यात नव्हे, तर त्यांना सकारात्मक प्रतिसाद कसा द्यावा, हे शिकण्यात मिळू शकते.

१३. शिकणे आणि चारित्र्य विकसित करणे, हे जीवनाचे खरे कार्य !

आयुष्य स्वतःच्या नियंत्रणाच्या बाहेरच्या परिस्थिती सादर करत राहील आणि आपण त्यांना कसा प्रतिसाद देतो, यांवर जीवनाची दिशा अवलंबून असेल. म्हणून जीवनाचे कार्य केवळ मिळवणे किंवा नियंत्रण ठेवणे, हे नाही, तर शिकणे, चारित्र्य विकसित करणे, प्रत्येक वळणावर सकारात्मकतेची निवड करणे आणि प्रत्येक संधीवर इतरांची सेवा करणे, हे आहे.

(समाप्त)

लेखक : आनंदा मॅथ्यूज, हॉलीवूड ‘सिनेमॅटोग्राफर’ (चलचित्रीकरण तज्ञ), ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ पुस्तकाचे लेखक, गोवा.  (२६.६.२०२६)