‘काही आई-वडील मोठ्या अभिमानाने सांगतात, ‘आमचा मुलगा अमेरिकेत आहे !’ त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ‘मुलगा विदेशात आहे’, ही अभिमानाची नाही, तर पुढील कारणांसाठी अत्यंत दुःखाची गोष्ट आहे.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण – ‘मुलगा विदेशात आहे’, ही अभिमानाची नाही, तर अत्यंत दुःखाची गोष्ट असणे

१ अ. हानी
१ अ १. विदेशातील रज-तमादी अनिष्ट संस्कार होणे : पृथ्वीवरील सर्वांत सात्त्विक देश ‘भारत’ हा आहे. इतर सर्व देश रज-तमप्रधान आहेत. मुलगा विदेशात रहातो, म्हणजेच विदेशातील रज-तमाने प्रदूषित अशा वातावरणात रहात असतो. त्यामुळे त्याच्यावर अनिष्ट संस्कार होतात. (विदेशातील साधक भारतात आल्यावर त्यांना सात्त्विक वातावरणाचा परिणाम लगेच जाणवतो.)
१ अ २. भारतात पुन्हा जन्म होणे अशक्य असणे : मुलगा विदेशात राहिल्यामुळे त्याचे देवाण-घेवाण हिशोब त्या देशात निर्माण होतात आणि त्याला पुढील जन्म तेथेच घ्यावे लागतात. त्यामुळे त्याची स्थिती ‘बुडत्याचा पाय खोलात’, अशी होते. पवित्र भारतभूमीशी जोडलेली त्याची नाळ कायमची तुटते; म्हणूनच त्याला पवित्र भारतात पुन्हा जन्म मिळणे अशक्य होते.
१ आ. उपाय
विदेशात राहूनही मुलाने व्यष्टी साधना, तसेच धर्मप्रसार करून समष्टी साधना केली, तर त्यामुळे तेथील रज-तमप्रधानता न्यून होण्यास साहाय्य होत असल्याने त्याची वर दिल्याप्रमाणे हानी होत नाही. एवढेच नव्हे, तर प्रतिकूल परिस्थितीत साधना केल्यामुळे त्याची उन्नती होते.
(सनातनचे काही साधक असे करत आहेत आणि त्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद होत आहे.)’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (वैशाख शु. ५, कलियुग वर्ष ५११२ (१९.४.२०१०))
२. वरील विषयाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. व्यक्तीने विदेशात न जाता भारतात जीवन व्यतीत करण्याचे महत्त्व !
२ अ १. भारतात सनातन धर्माचे ज्ञान विपुल प्रमाणात असणे : ‘ऋषींनी ईश्वरी प्रेरणेने सनातन धर्म ग्रंथरूपाने सांगितला. या ज्ञानाचा प्रसार आणि प्रभाव भारतात अन्य देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. धर्मग्रंथांमध्ये ‘मनुष्याने धर्माला अनुसरून जीवन कसे जगावे ? कोणते नियम पाळावेत ?’ इत्यादी सूत्रे दिली आहेत. ही सूत्रे मनुष्याला चांगले जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे भारतातील बर्याच जणांमध्ये धार्मिक वृत्ती आणि नैतिकता निर्माण झाली आहे. अशा व्यक्ती सात्त्विक असतात आणि त्यांचे जीवन सुखी, शांत, समाधानी, तसेच आनंदी असते.
२ अ २. भारतात अनन्यसाधारण अशी ‘गुरु-शिष्य परंपरा’ असणे : भारतात दीर्घकाळापासून ‘गुरु-शिष्य परंपरा’ आहे. सर्वसामान्य व्यक्तीला सनातन धर्मातील ज्ञान ‘समजून घेणे आणि ते कृतीत आणणे’, यांस मर्यादा आहेत. साधकाला गुरूंमुळे ‘धर्मज्ञान आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असलेले ज्ञान’, हे अल्प कालावधीतच समजते. त्यामुळे त्याला जीवन जगण्याची योग्य दिशा मिळते. नियमित साधना केल्याने त्याला गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. परिणामी साधकाची शीघ्र आध्यात्मिक प्रगती होते. यातून साधकाची दीर्घकाळापासून चालू असलेल्या ‘सुख- दुःख आणि जन्म-मृत्यू’ या चक्रांतून सुटका होते, तसेच त्याचे जीवन स्थिर अन् आनंदी होते. त्यामुळे भारतातील ‘गुरु-शिष्य परंपरेला’ अनन्यसाधारण महत्त्व आहे.
२ अ ३. भारतात पुष्कळ आश्रम आणि मंदिरे असणे : साधकाला ‘वातावरणातील रज-तम आणि वाईट शक्तींचा त्रास’ यांमुळे साधनेत मन एकाग्र करणे कठीण असते. भारतात अनेक संतांचे असंख्य चैतन्यमय आश्रम आणि मंदिरेही आहेत. तेथे गेल्याने साधकावरील रज-तम आणि वाईट शक्तींचा प्रभाव अल्प कालावधीत न्यून होतो. अशा ठिकाणी साधकाला साधना करणे सुलभ असते.
२ अ ४. भारतभूमी सर्वाधिक सात्त्विक असणे : भारतात अनेक अवतार, ऋषी आणि संत जन्माला आले आहेत. येथील अनेक नद्या, तसेच भूमी यांत देवत्व असून ते पुष्कळ सात्त्विक आहेत. अशा परिस्थितीमुळे धार्मिक लोकांच्या जीवनात स्थैर्य आणि शांतता निर्माण झाली आहे.
२ अ ५. भारतात अनेक देवता आणि महात्मे यांचा सूक्ष्मातून वास असणे : भारत ही आध्यात्मिक भूमी असून येथे सूक्ष्मातून अनेक देवता आणि महात्मे यांचा वास आहे. त्यामुळे या भूमीत वाईट शक्तींना अनिष्ट कार्य करण्यात प्रतिरोध होतो. परिणामी भारतात जीवन सुरक्षित रहाण्यास साहाय्य होते.
२ अ ६. वाईट शक्तींना अन्य देशांच्या तुलनेत भारतात प्रवेश करण्यास सर्वाधिक प्रतिरोध होणे : वातावरणात असंख्य वाईट शक्ती असतात आणि त्या सतत संचार करत असतात. त्या जेव्हा भारताच्या दिशेने येतात, तेव्हा त्यांना भारताच्या सीमेवर तेजपुंज प्रकाश दिसतो. त्यामुळे काही वाईट शक्तींना भारतात प्रवेश करता येत नाही, तर काही वाईट शक्तींना संघर्ष करून भारतात प्रवेश करावा लागतो. याउलट वाईट शक्ती अन्य देशांमध्ये सहजतेने प्रवेश करून त्यांचे कार्य साध्य करतात.
२ आ. भारतातून विदेशात गेल्यावर तेथे साधना करणे कठीण असल्याची कारणे
२ आ १. जीवनाचा उद्देश ठाऊक नसणे : विदेशातील लोकांना जीवनाचा उद्देश ‘प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि साधना करून ईश्वरप्राप्ती साध्य करणे’, हा आहे’, हेच ठाऊक नसते. त्यामुळे त्यांचे जीवन दिशाहीन असते आणि तेथील लोक ‘खाणे-पिणे, मनोरंजन, पैसा आणि संभोग’, यांद्वारे अधिकाधिक सुखप्राप्तीसाठी धडपडत असतात. या जीवनशैलीचा परिणाम तेथील भारतियांवर होऊन त्यांचेही जीवन तसेच होण्याची शक्यता असते.
२ आ २. धर्मातील बंधनांऐवजी स्वैर जीवनाला अधिक महत्त्व असणे : स्त्री-पुरुष यांच्यात नैसर्गिक आकर्षण असते. या दोघांतील कामवासना मर्यादित रहावी आणि केवळ कामवासनेने मिळणार्या सुखामध्ये जीवन व्यर्थ जाऊ नये, यासाठी सनातन धर्मात विवाहसंस्कार सांगितला आहे. पती-पत्नी यांच्यात असलेल्या आयुष्यभराच्या बंधनामुळे कामवासना ही ‘एक पुरुष किंवा एक स्त्री’ यांच्यापर्यंतच मर्यादित रहाते. त्यामुळे पती-पत्नीला आध्यात्मिक जीवन जगणे सुलभ जाते. विवाह बंधनाचे महत्त्व विदेशातील लोकांना ज्ञात नसते किंवा तसे करणे त्यांना मान्य नसते. त्यामुळे तेथे पुरुषांचे अनेक स्त्रियांशी आणि स्त्रियांचे अनेक पुरुषांशी संबंध असण्याचे प्रमाण अधिक आहे. अशांचे जीवन कामवासनेत व्यर्थ जाते. अशा स्वैर जीवनशैलीचा परिणाम तेथील भारतियांवर होऊन त्यांचेही जीवन कामवासनेत व्यर्थ जाण्याची शक्यता असते.
२ आ ३. विदेशात श्राद्धविधीचा अभाव असल्याने पितरांच्या त्रासाची तीव्रता पुष्कळ अधिक असणे : भारतात धार्मिक वृत्तीचे लोक पितरांना गती मिळण्यासाठी श्राद्धविधी करतात. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात पितरांमुळे येणारे अडथळे न्यून होतात, तसेच पितरांना गतीही मिळते. धार्मिक विधींच्या गूढ ज्ञानाचे महत्त्व विदेशातील लोकांना ठाऊक नसल्यामुळे त्यांच्या ‘कुटुंबात सातत्याने कलह होणे, घरात अशांती असणे, यश न मिळणे, रोग बरा न होणे’, इत्यादी असंख्य समस्या निर्माण होत असतात. विदेशात श्राद्धविधीसाठी आवश्यक असलेले सात्त्विक पुरोहित आणि सात्त्विक ठिकाण मिळणेही कठीण असते, तसेच तेथील रज-तमात्मक वातावरणामुळे भारतियांच्या मनात श्राद्धविधी करण्याचा विचार येणेही दुरापास्त असते. परिणामी विदेशातील भारतियांना पितरांच्या त्रासांना सामोरे जावे लागते आणि अशांचे जीवन दुःखी बनते.
२ आ ४. वाईट शक्तींच्या त्रासामुळे विदेशातील लोकांचे जीवन दुःखी होऊन व्यर्थ जाणे : विदेशात सनातन धर्माची शिकवण आणि साधना यांचा अभाव आहे, तसेच मंदिरे, आश्रम आदी सात्त्विक ठिकाणे अल्प आहेत. तेथे संतांचे मार्गदर्शन मिळणेही दुर्लभ आहे. अशा परिस्थितीत तेथील लोकांवर वाईट शक्तींचा प्रभावही अधिक असतो. त्यामुळे तेथील लोकांना ‘अस्वस्थता, अशांतता, मनाचा संघर्ष, रोग आणि अनेक संकटे’ यांना सतत सामोरे जावे लागते. वाईट शक्तींच्या सततच्या त्रासांमुळे त्या लोकांचे मनोबल न्यून झालेले असते. अशा लोकांच्या हातून वाईट शक्तींच्या प्रभावामुळे अपराध घडतात. अशा त्रासदायक जीवनामुळे बहुतेक लोक निराश होऊन व्यसनाधीन होतात. त्या लोकांना यातून बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्याने त्यांचे बहुतेक जीवन दुःख आणि संघर्ष यांत वाया जाते, तसेच त्या लोकांच्या हातून आत्महत्या घडतात.
२ आ ५. एकटेपणा आणि असुरक्षिततेची भावना अधिक असणे : विदेशांतील लोकांना जीवन जगतांना देवता, गुरु आणि साधना यांचा आधार नसतो. त्यामुळे तेथील लोकांमध्ये एकटेपणा आणि असुरक्षिततेची भावना अधिक असते.
२ आ ६. भारतियांचा विदेशाशी देवाण-घेवाण निर्माण झाल्याने त्यांची दूरगामी हानी होत असणे : भारतियांनी विदेशात जाऊन साधना न केल्यास ते तेथील जीवनशैली आणि विचार यांच्याशी पूर्णपणे एकरूप होऊन जातात. त्यांच्या चित्तावर ‘मायेचे तीव्र आकर्षण आणि त्यातील सुख’ यांचा प्रभाव पडतो. यातून अशा भारतियांमध्ये विदेशी जीवनाविषयी आसक्ती निर्माण होते. त्यामुळे त्या भारतियांचा पुढील जन्म विदेशात होतो. हे चक्र अव्याहतपणे चालूच रहाते. त्यामुळे असे जीव दीर्घकाळ जन्म-मृत्यूच्या दीर्घ चक्रांत अडकण्याची शक्यता असते.
अशा भारतियांतील सत्त्वगुण संपून रज-तमोगुण पुष्कळ वाढतो. तेव्हा त्यांना होणारा वाईट शक्तींचा त्रासही पुढे प्रत्येक जन्मात अधिकाधिक होत जातो. परिणामी अशा भारतियांना वाईट शक्तींच्या नियंत्रणातून सुटून परत साधनेला प्रारंभ करणे कठीण असते.
२ इ. साधना करण्याचे महत्त्व
भारतियांनी विदेशात न जाता भारतात राहून साधनेला प्राधान्य देणे, तसेच विदेशातील भारतियांनी भारतात साधनेसाठी येणे महत्त्वाचे आहे. विदेशातील रज-तमात्मक वातावरणात साधना करून स्वतःतील रज-तम न्यून करून सत्त्वगुण वाढवणे कठीण असते. विदेशातील भारतियांनी भारतातील सात्त्विक वातावरणात साधना केल्यास त्यांची साधनेची अनेक वर्षे वाचतात. काहींना तसे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत विदेशात राहून तळमळीने आणि नियमित साधना करणे महत्त्वाचे आहे. सतत साधना केल्याने साधकावरील ‘मायेचा प्रभाव आणि वाईट शक्तींचा त्रास’ हे न्यून होतात, तसेच शीघ्र आध्यात्मिक प्रगती साध्य होऊन जीवनाचे सार्थक होते.
२ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेल्या लिखाणाचे महत्त्व !
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांच्या मनात देश-विदेशातील जिवांच्या आध्यात्मिक कल्याणाचा व्यापक विचार असतो. त्यांच्या लिखाणाद्वारे समष्टीप्रतीची तळमळ आणि प्रीतीही व्यक्त होते. त्यांनी आपल्या लिखाणाद्वारे सर्वांना नेमकेपणाने पुढील दिशा दिली आहे.
१. भारतियांना विदेशात जाण्यामुळे होणारी आध्यात्मिक हानी सांगितली आहे. असे करून त्यांनी अशा भारतियांना सावध करून त्यांचे आध्यात्मिक अधःपतन रोखण्याचे कार्य केले आहे.
२. विदेशातील भारतियांना भारताचे आध्यात्मिक महत्त्व सांगून भारत सोडून जाण्याची चूक लक्षात आणून दिली आहे.
३. विदेशातील ज्या भारतियांना आता भारतात परतणे शक्य नाही किंवा काही मूळ विदेशींना आध्यात्मिक प्रगती साध्य करायची आहे, अशांची अडचण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी समजून घेऊन त्यांना विदेशातच राहून साधना करून आध्यात्मिक प्रगती साध्य करण्याची प्रेरणा आणि मार्ग दाखवला आहे.
२ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी दूरदृष्टी ठेवून समष्टीला मार्गदर्शन करणे, हा त्यांच्या अवतारी कार्याचाच एक भाग आहे !’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १४.५.२०२६, वेळ : सकाळी १०.३०, कालावधी : ३० सेकंद आणि ज्ञानाचे टंकलेखन अन् संकलन करण्याचा एकूण कालावधी : १ घंटा)
राष्ट्र-धर्माभिमान्यांनो, सर्वच क्षेत्रांमधील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा !
महाराष्ट्रात मराठी भाषेची होत असलेली दुरवस्था आणि सरकारसह प्रशासनाचे कर्तव्य !
थिरूवनंतपूरम् येथील भाजप नगरसेवकांच्या शपथविधीविषयी केरळ उच्च न्यायालयाची भूमिका !
स्वामी विवेकानंद यांचे विचार दूरदर्शी !
हरवलेल्या श्रद्धेचा हिंदुत्ववाद !
जीवनातील सकारात्मकता आणि जीवनाचे खरे कार्य !