जेवतांना भ्रमणभाष पहात आहात का ? वेळीच व्हा सावध !

आजच्या डिजिटल युगात भ्रमणभाष (मोबाईल फोन) हा स्वतःच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बहुतेक लोकांचा अधिकाधिक वेळ ‘स्क्रीन’ पहाण्यातच जातो. याचा थेट परिणाम आता खाण्या-पिण्याच्या पद्धतीवरही होऊ लागला आहे. आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण जेवतांना व्हिडिओ पहाणे, सामाजिक माध्यमे पहाणे किंवा ‘चॅटिंग’ (संदेश पाठवणे) करण्यात व्यस्त असतात. ही सवय वरवर अत्यंत सामान्य वाटत असली, तरी आरोग्य तज्ञांच्या मते ती स्वतःची पचनसंस्था आणि एकूण आरोग्य यांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. जेवतांना भ्रमणभाष वापरण्याचे गंभीर दुष्परिणाम आणि ते टाळण्यासाठी काय करावे, याविषयीची माहिती येथे देत आहोत.

जेवतांना भ्रमणभाष वापरण्याचे गंभीर दुष्परिणाम

१. पचनक्रियेवर विपरीत परिणाम : जेव्हा तुम्ही जेवतांना भ्रमणभाष पहाता, तेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष खाण्यावर नसते. यामुळे अन्न नीट चावून खाल्ले जात नाही. परिणामी न पचलेल्या अन्नामुळे गॅस (वायू), अपचन आणि आम्लपित्त (ॲसिडिटी) यांसारख्या पोटाच्या समस्या निर्माण होतात.

२. अतीखाण्याचा (Overeating) धोका : भ्रमणभाषमध्ये लक्ष गुंतलेले असल्यामुळे  पोट कधी भरले, याचा अचूक संदेश मेंदूपर्यंत वेळेत पोचत नाही. अशा स्थितीत लोक आवश्यकतेपेक्षा अधिक खातात, ज्यामुळे वजन वाढण्याचा आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.

३. आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम : निरोगी शरिरासाठी जाणीवपूर्वक आणि लक्ष देऊन जेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. जेवतांना भ्रमणभाष वापरल्यामुळे आतडे आणि मेंदू यांच्यातील समन्वयात अडथळा निर्माण होऊन पचनाच्या तीव्र समस्या उद्भवू शकतात.

४. लहान मुलांच्या आरोग्याला धोका : आजकाल मुलांना भ्रमणभाष पहात जेवू घालण्याची सवय वाढली आहे. यामुळे मुलांमध्ये खाण्याच्या योग्य सवयी विकसित होत नाहीत. परिणामी त्यांच्या शरिरात पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते आणि लहान वयातच लठ्ठपणा किंवा पचनाचे विकार जडू शकतात.

५. मानसिक आरोग्यावर ताण : स्क्रीनसमोर बसून जेवल्याने नकळतपणे मानसिक ताण वाढू शकतो. यामुळे व्यक्तीला जेवणाचा खरा आनंद घेता येत नाही आणि जेवणातील सजगता पूर्णपणे नष्ट होते.

६. जंतू आणि संसर्गाचा धोका : भ्रमणभाषच्या स्क्रीनवर (पडद्यावर) आणि ‘कव्हर’वर (आच्छादनावर) अनेक प्रकारचे हानीकारक जीवाणू (बॅक्टेरिया) अन् जंतू असतात. जेवतांना सतत भ्रमणभाषला स्पर्श केल्याने हे जंतू हाताद्वारे शरिरात प्रवेश करतात, ज्यामुळे विविध आजारांचा संसर्ग होऊ शकतो.

जेवतांना पाळावयाचे महत्त्वाचे नियम

१. जेवण करतांना भ्रमणभाष, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांपासून पूर्णपणे लांब रहा.

२. प्रत्येक घास सावकाश आणि नीट चावून खा, जेणेकरून अन्नात लाळ व्यवस्थित मिसळेल अन् पचन सुलभ होईल.

३. नेहमी शांत आणि प्रसन्न वातावरणात बसून जेवण करा.

४. कुटुंबासह एकत्र बसून जेवल्यामुळे कौटुंबिक संवादही वाढेल.

(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’, २४.६.२०२६)