इंटरनेट डेटा आणि कॉल्स यांसाठी वेगवेगळे प्लान्स ठेवण्याचा होणार नियम

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (‘ट्राय’ने) प्रसारित केले भ्रमणभाष रिचार्ज विषयीचे नवे प्रारूप

नवी देहली – भ्रमणभाषवर केवळ संपर्क (कॉल) आणि लघुसंदेश सुविधा वापरणार्‍या ग्राहकांना लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) अशा भ्रमणभाष रिचार्ज प्लॅन्स आणण्याच्या सिद्धतेत आहे, ज्यामध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट नसेल. विना डेटाच्या रिचार्जमुळे या प्लान्सची किंमत सध्याच्या रिचार्जच्या तुलनेत ५० ते ७० टक्क्यांपर्यंत अल्प होऊ शकते. ‘ट्राय’ने यासाठी ‘टेलीकम्युनिकेशन कंज्यूमर प्रोटेक्शन रेगुलेशंस, २०२६’चे प्रारूप प्रसारित केले आहे. नवीन नियमांना अंतिम स्वरूप देण्यापूर्वी ट्रायने दूरसंचार आस्थापने आणि जनता यांच्याकडून सूचना मागवल्या आहेत.

सध्या दूरसंचार आस्थापने काही ठराविक कालावधीसाठीच कॉल आणि लघुसंदेश रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून देतात. यामुळे ज्या ग्राहकांना इंटरनेटची आवश्यकता नसते, त्यांनाही डेटा असलेला महागडा प्लॅन घ्यावा लागतो. अनेक ज्येष्ठ नागरिक, साधे भ्रमणभाष संच वापरणारे लोक आणि दुसरे सिमकार्ड बाळगणारे ग्राहक डेटाचा वापर करत नाहीत. असे असूनही त्यांना असे रिचार्ज खरेदी करावे लागतात, ज्यांच्या किमतीमध्ये डेटाचा खर्चही समाविष्ट असतो.