हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह वैध ठरण्यासाठी केवळ विवाहाचे प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही ! – Gujrat High Court

गुजरात उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कर्णावती (गुजरात) – हिंदु संस्कृतीत विवाहाला एक ‘संस्कार’ मानले गेले आहे. हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह वैध ठरण्यासाठी केवळ विवाहाचे नोंदणी प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही, तर सप्तपदी आणि इतर आवश्यक धार्मिक विधीही पार पडणे अत्यंत अनिवार्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने नुकताच एका खटल्यावर दिला.

कौटुंबिक न्यायालयाचा आधीचा निर्णय रहित करत उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की,

१. भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेनुसार विवाहाच्या पद्धती पालटू शकतात; परंतु हिंदु परंपरेत पत्नीला पतीची ‘अर्धांगिनी’ मानले गेले आहे. विवाह ही एक अशी संस्था आहे, जी नव्या कुटुंबाचा पाया रचते. म्हणूनच तरुण मुला-मुलींनी लग्नासारख्या पवित्र बंधनात अडकण्यापूर्वी या संस्थेचे महत्त्व आणि गांभीर्य व्यवस्थित समजून घेतले पाहिजे.

२. विवाह म्हणजे केवळ नाच-गाणे, खाणे-पिणे किंवा कोणती व्यावसायिक देवाणघेवाण नाही. हा एक पवित्र संस्कार आहे. विवाहाचे विधी केवळ औपचारिकता नसून ते व्यक्तीच्या आत्म्याला शुद्ध करणारे मानले जातात.

काय आहे प्रकरण ?

इंग्लडमध्ये रहाणार्‍या कौशल सोनार याने कर्णावतीमधील एका तरुणीसमवेत  झालेल्या विवाहाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. कौशलच्या मते, त्याचे त्या तरुणीसमवेत कधीही लग्न झाले नव्हते. ती तरुणी जेव्हा त्याच्या आई-वडिलांना भेटली आणि तिने लग्नाचे प्रमाणपत्र दाखवून पत्नी असल्याचा दावा केला, तेव्हा त्याला या विवाहाविषयी समजले. ‘विवाहाच्या प्रमाणपत्रावर माझी स्वाक्षरी फसवणूक करून आणि दबाव आणून घेण्यात आली होती’, असा आरोप कौशलने केला होता. दुसरीकडे संबंधित तरुणीने स्वतः कौटुंबिक न्यायालयासमोर मान्य केले होते की, त्यांच्यात कोणताही विवाह सोहळा किंवा धार्मिक विधी पार पडलेले नाहीत आणि ते कधीही पती-पत्नी म्हणून एकत्र राहिलेले नाहीत.

तरुणीने स्वतः विधी झाले नसल्याचे मान्य करूनही कौटुंबिक न्यायालयाने कौशलची याचिका फेटाळली होती. हा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय चुकीचा होता, असे म्हणत उच्च न्यायालयाने तो रहित केला आणि हे लग्न अवैध ठरवले.

३. विवाह २ व्यक्तींमध्ये आयुष्यभरासाठी सन्मान, समान आणि संमती यांवर आधारित नाते निर्माण करतो. हिंदु धर्मात विवाहाकडे मोक्ष प्राप्तीचे एक माध्यम म्हणूनही पाहिले जाते; पण त्यासाठी विधी योग्य प्रकारे पूर्ण होणे आवश्यक आहे.