विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड !

मुंबई, १ जुलै (वार्ता.) – शिवसेनेचे विधान परिषद सदस्य सचिन मोहन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. संजय खोडके यांनी त्यांच्या उपसभापती निवडीचा प्रस्ताव मांडला होता. त्याला सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला. विरोधी पक्षांकडून अंबादास दानवे यांनी जगन्नाथ अभ्यंकर यांच्या उपसभापतीपदी निवडीचा प्रस्ताव दिला होता; परंतु विरोधकांनी तो प्रस्ताव मागे घेतल्याने सचिन अहिर यांची निवड एकमताने करण्यात आली.


विधान परिषदेची उच्च परंपरा पाळत या सभागृहाने अहिर यांची निवड एकमताने केली, त्याविषयी सर्वच सदस्यांचे आणि विरोधकांनी प्रस्ताव मागे घेतला म्हणून त्यांचेही आभार मानतो. अहिर हे कामगार चळवळीतील कार्यकर्ता म्हणून पुढे आले. निर्भिडपणे काम, सर्वांशी चांगले संबंध हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. समर्पक उत्तरे देणारे मंत्री आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणारेही अहिर आहेत.

– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. सर्व कामगारांसाठी लढणारा, प्रसंगी रस्त्यावर येऊन आंदोलने करणारा आणि कामगारांसाठी सतत संघर्ष करणारा म्हणून सचिन अहिर यांची ओळख आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडून प्रेरणा घेणारा एक शिवसैनिक विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बसत आहे, याचा आनंद शिवसेना आणि शिवसैनिक यांना आहे.

– एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री