२ दिवसच पाऊस झाला; पण सर्दी, खोकला, ताप यांचे रुग्ण विशेष करून लहान मुले यायला प्रारंभही झाला. वातावरणातील पालट, हवेतील ओलेपणा आणि साथीचे रोग हे हातात हात घालून येतात, हे आपण सर्व जाणतोच. घरातील लहान मूल जेव्हा सतत आजारपण काढू लागले, तेव्हा ते त्रासदायक होते. लहान वयात कफाचे त्रास जसे सर्दी, खोकला पटकन होतात. त्यातून उद्भवणारी लक्षणे, म्हणजेच वजन न्यून होणे, भूक मंदावणे, चिडचिड, ही लक्षणे पुढे महिनोन्महिने टिकू शकतात. ते टाळण्यासाठी काही सोपे उपाय येथे देत आहे.

उपचार
१. मुलांना सकाळची शाळा असेल, तर आवर्जून प्रतिदिन अंघोळ करून पाठवायचेच, असा अट्टहास नको.
२. मोजे आणि बूट कोरडे असावेत. केस ओले असता नीट पुसावेत. हवे तर ‘माईल्ड हेअर ड्रायर’चा (अल्प उष्णतेचा आणि हळूवार हवेचा प्रवाह सोडणारे केस सुकवण्याचे यंत्र) वापर करावा.

३. कफ साठायची प्रवृत्ती असता छाती, तळपाय आणि टाळू यांना प्रतिदिन वेखंड पावडर लावावी.
४. दही, फळे, पालेभाज्या, शहाळे पाणी हे पावसाळ्यात प्रारंभीला विशेष करून लहान मुलांसाठी पूर्ण बंद करावे. आंबे मिळत असले, तरी खायला देऊ नयेत. आंबट आणि बेरी जातीची फळे (स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी, चेरी, संत्री, मोसंबी) विशेष करून देऊ नयेत. खजूर, मनुका, बेदाणे आणि सुके अंजीर खायला दिले तरी चालतील.
५. १ ते ३ वर्षांचे मूल असता रात्रीच्या जेवणानंतर किंवा जेवणाच्या ऐवजी दूध नको. मूल लहान असल्यास आणि दुधाची सवय असता चिमूटभर सुंठ घालून द्यावे.
६. सितोपलादी चूर्ण घरात ठेवावे. नेहमीच या त्रासाची प्रवृत्ती असता प्रतिदिन सकाळी मधातून २-३ चिमूट चाटवायला हरकत नाही.
७. भूक मंद असता मुद्दाम बदाम, पिस्ता, फळे, अंडी असे ‘पौष्टिक’ पदार्थ बलपूर्वक खायला देऊ नयेत. च्यवनप्राश हे सर्दी खोकल्यावरचे औषध नाही. वारंवार सर्दी, खोकला असेल, तर त्या त्रासाची प्रवृत्ती न्यून करून मग ते वैद्यकीय सल्ल्याने चालू करावे. पोटाचे आजार होऊ नये; म्हणून बाहेरचे कच्चे (काकडी, टोमॅटो, बीट, लेट्यूस) आणि रस्त्यावर विकत मिळणारी फळांच्या तुकड्यांचे ताट वगैरे टाळावे.
८. लहान मुले खायला नको म्हणत असतील, तर धाकाने किंवा टीव्हीचे आमीष देऊन खायला देऊ नये; पण त्याच वेळी हा कटाक्ष ठेवावा की, ते अन्य सटरफटरही खाणार नाहीत.

९. कफ अधिक असता दही भात, नुसता भात, उडीद, मासे, दहीवडा अजिबात नको. रात्रीचे जेवण ८ वाजेपर्यंत झाले पाहिजे. मैदा, चीज, मेयो हे पदार्थ न्यूनतम असावे. तळकट तेलकट नको. द्यायचे झाल्यास दुपारी ४ वाजण्याच्या आधी थोडे द्यावे.
१०. अंतर्वस्त्रे, बनियन, पेटीकोट नीट कोरडे असावेत. कपडे ओलसर असले, तर इस्त्रीने गरम करून कोरडे करून घ्यावेत.
११. रात्री पंख्याखाली मुलांना झोपवू नये. कोपर्यात झोपवावे.
१२. संध्याकाळी घरात कोळसा, तूप, वेखंड, धूप, कडुनिंब पाने टाकून धूर करून कोपर्या कोपर्यातून फिरवावा. याला ‘धूपन’ असे म्हणतात. या योगे संसर्गजन्य आजार आटोक्यात रहायला साहाय्य होते, तसेच डासांचे उपद्रव न्यून होऊ लागतात.
१३. वातावरण छान गार झाले आहे. भूक न्यून होते; पण त्यातच भजी, चाट असे पदार्थ खावेसे वाटतात, मुलांनाही पाठोपाठ दिले जातात. त्या सगळ्यांमध्ये डाळीचे पीठ असतेच. सलग सलग होऊ नये, याच्याकडे लक्ष ठेवावे.
१४. सर्दी, खोकला झाल्या झाल्या वैद्यांच्या सल्ल्याने औषधे चालू करावीत. पावसाळ्यात वैद्यांकडून देखभालीसाठी एखादे चाटण औषध चालू ठेवावे. यामुळे तापापर्यंत प्रकरण पोचत नाही आणि तसे वारंवार होतही नाही. छातीच्या मध्यभागात घुरघुर असता छातीला तेल-मीठ लावून शेकणे, ओव्याच्या पुरचुंडीने नाकाच्या आजूबाजूला शेकणे. यामुळे साठलेल्या कफाला बाहेर जायला उद्युक्त् करावे.
१५. वरचेवर मूल आजारी पडत असता आयुर्वेद औषधांचा रोग असतांना आणि परत होऊ नये, अशा दोन्ही वेळी अत्यंत उत्तम उपयोग होतो. सारख्या होणार्या सर्दी-खोकल्यामागे कधी कधी कृमी (जंत) हे लक्षणही असते. तशा विचारांनी दिलेली औषधे कायमस्वरूपी अटकाव घालतात.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
गर्भाशयातील ‘फायब्रॉईड्स’ आणि आयुर्वेदाचा दृष्टीकोन
कुपोषण निर्मूलनात रत्नागिरी जिल्हा परिषदेचा राज्यात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
संस्कारमूल्ये रुजवतांना आध्यात्मिक साधनेमुळे झालेला अद्वितीय लाभ !
हित-अहिताचे ज्ञान : निरोगी मनाची गुरुकिल्ली !
पिंपळी खुर्द आणि सती पुलाजवळील प्रदूषणकारी ‘भंगार व्यवसायां’च्या विरोधात कारवाई करा !