सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘देह असला काय किंवा नसला काय, त्यासंदर्भात काहीच वाटत नाही’, याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण

‘सगुण निर्गुण नाही भेदाभेद ।’ या प.पू. भक्तराज महाराज यांच्या पंक्तीची मला अनुभूती येत आहे, म्हणजे देह असला काय किंवा नसला काय, त्यासंदर्भात मला काहीच वाटत नाही.’ (७.७.२०१४)

श्री. राम होनप

२. वरील विषयाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. सर्वसामान्य व्यक्तीचे शरीर : ‘व्यक्तीचे शरीर त्रिगुण आणि पंचतत्त्वे यांद्वारे बनलेले असते. व्यक्तीचे ‘प्रारब्ध, प्रकृती आणि साधना’ यांनुसार तिच्यात ‘त्रिगुणांचे प्रमाण आणि पंचतत्त्वांची शुद्धी’ हे अवलंबून असते. साधना न करणार्‍या व्यक्तीत सत्त्वगुण अल्प आणि रज-तमगुण अधिक असतात, तसेच पंचतत्त्वेही अशुद्ध झालेली असतात.

२ आ. संतांचे शरीर : साधनेमुळे संतांमधील सत्त्वगुण स्थिर होऊन रज-तमगुण नष्ट झालेला असतो आणि त्यांच्यातील पंचतत्त्वांच्या शुद्धीची प्रक्रिया चालू झालेली असते.

२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दैवी काया ! : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शरिरातील त्रिगुण लोप पावले आहेत, तसेच त्यांच्यातील पंचतत्त्वांची शुद्धी झालेली आहे. पुष्कळ साधनेमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांना त्रिगुण आणि पंचतत्त्वे यांच्या पलीकडील चैतन्यमय अवस्था प्राप्त झालेली आहे. त्यामुळे त्यांचे शरीर चैतन्यमय आहे. त्याला ‘दैवी काया’, असे म्हणतात.

२ ई. ‘सगुण निर्गुण नाही भेदाभेद ।’ याचा अर्थ : ‘सगुण’ याचा अर्थ ‘साकार’ असा आहे. सगुणात ‘त्रिगुण आणि पंचतत्त्वे’, हे अंतर्भूत आहेत. ‘निर्गुण’ याचा अर्थ ‘निराकार’ असा आहे. यात चैतन्य अंतर्भूत आहे. ‘सगुण निर्गुण नाही भेदाभेद ।’ याचा अर्थ सगुण आणि निर्गुण असा भेद नसून ते एकच आहेत.

२ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची उच्च आध्यात्मिक अवस्था : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा देह साधनेमुळे सगुण तत्त्वाशी संबंधित न रहाता चैतन्याशी संबंधित झाला आहे. त्यामुळे त्यांचा देह (सगुण) आणि चैतन्य (निर्गुण) यांत भेद राहिलेला नाही. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर चैतन्याशी एकरूपता अनुभवत असल्याने त्यांना ‘देह असला काय किंवा नसला काय’, यासंदर्भात काही वाटत नाही. त्याला ‘विदेही अवस्था’ किंवा ‘अशरीरि अवस्था’, असे म्हणतात.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १४.२.२०२६, वेळ : सकाळी १०.३०, कालावधी : १० सेकंद)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक