शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडणार्‍यांना लागणार ‘मकोका’ !

यापुढे परीक्षा ऑनलाईन घेण्याचे सरकारच्या विचाराधीन !

टीईटी प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण

मुंबई, २९ जून (वार्ता.) – शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडणार्‍यांना मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) लावण्यात येणार आहे. यासाठी कायद्यामध्ये आवश्यक तो पालट करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली. २९ जून या दिवशी दादा भुसे यांनी याविषयी विधानसभेत निवेदन केले. यासह प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार घडू नयेत, यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेसह अन्य परीक्षाही ऑनलाईन घेण्याच्या दृष्टीने कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे, असे दादा भुसे यांनी सभागृहात सांगितले.

या वेळी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्रात असतांना त्याच्या प्रश्नपत्रिका मात्र आग्रा येथे छापण्यात आल्या, असे समजते. असे असेल, तर प्रश्नपत्रिका महाराष्ट्रात का छापल्या जात नाहीत ? यापुढे प्रश्नपत्रिका महाराष्ट्रातच छापण्यात याव्यात.’’

शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार अतिशय संवेदनशील आहे. आतापर्यंत या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी विशेष अन्वेषण पथक बिहार, हरियाणा आणि देहली येथे गेले आहे. यापुढे परीक्षा पारदर्शक आणि शिस्तबद्ध पार पडावी, यासाठी परीक्षा ऑनलाईन करण्याविषयी अभ्यास करण्यात येणार आहे.

– दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री

संपादकीय भूमिका

परीक्षेतील निष्पक्षता आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रश्नपत्रिका फुटीविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबायला हवे !