वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !

आरती करतांना भाविक

ठाणे, २९ जून (वार्ता.) – कल्याणपासून जवळ असलेल्या श्री मलंगगडावर वटपौर्णिमेनिमित्त महाआरती आणि वारकर्‍यांचा कुंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात हा धार्मिक सोहळा पार पडला. हिंदु मंच, ठाणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहस्रो भाविकांनी पहाटेपासूनच गडावर उपस्थिती लावत श्री मलंग मत्स्येंद्रनाथांचे दर्शन घेतले. ‘जय श्री मलंग’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ठाणे, रायगड तसेच परिसरातील विविध भागांतून आलेल्या भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत परंपरेचे जतन केले. त्या वेळी मंदिरात पारंपरिक पद्धतीने महाआरती करण्यात आली.

आरतीच्या वेळी संपूर्ण गड भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता. श्री मलंगगड नगरीमध्ये आलेल्या सर्व वारकरी भाविक आणि संत मंडळी यांचे अखिल भारतीय संत समितीचे संघटन मंत्री ह.भ.प. विश्वेनाथ महाराज वारिंगे, तसेच धर्मसंस्थापना संघटना, श्रीमलंग सेवा समिती यांच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.