
राजापूर, २९ जून (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य निर्मितीचा बोध आपण सर्वांनी आजच्या दिनी घ्यायला हवा, असे आवाहन व्याख्याते श्री. प्रभात मेस्त्री यांनी केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार ३५३ व्या राज्याभिषेकदिनी शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या व्याख्यानात बोलत होते.
प्रारंभी शिवभक्त तेजस नार्वेकर यांनी ध्येय मंत्र सांगितला. त्यानंतर ‘हिंदु साम्राज्य दिन बोध नवनिर्मितीचा’ या विषयावरील व्याख्यानात अमोघ वाणीने व्याख्याते श्री. प्रभात मस्त्री यांनी उपस्थित शिवभक्तांना छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य निर्मितीचे कार्य, शिवरायांचे गुणविशेष, अचाट धैर्य आणि धाडस सांगत मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी (२७ जून २०२६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी म्हणजेच हिंदु साम्राज्यदिनी या सुवर्णक्षणाचे स्मरण करण्यासाठी, ऐतिहासिक अशा राजापुरातील शिवतीर्थ, शिवस्मारक येथील शिवरायांच्या मूर्तीची पाद्यपूजा आणि अभिषेक, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे महेश मयेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी श्री. गोपाळ पाध्येगुरुजी यांनी पौरोहित्य केले. यानंतर शिवरायांची आरती आणि जयघोष करण्यात आला.

श्री. प्रभात मेस्त्री म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी केवळ शौर्याच्या जोरावरच नव्हे, तर गनिमी कावा, प्रसंगावधान आणि वेळप्रसंगी तहाचा वापर करून मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून ५ बलाढ्य पातशाह्यांना धूळ चारली आणि स्वराज्याचा विस्तार केला. त्यांनी न्याय, धर्म, स्वाभिमान आणि लोककल्याण या मूल्यांवर आधारित ‘रयतेचे राज्य’ निर्माण केले. यातून बोध घेऊन आजच्या पिढीने जाती-पातीच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे. सर्व हिंदु बांधवांनी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन संघटित होऊन सकल हिंदु समाजाची ताकद वाढवणे आवश्यक आहे.
यानंतर शिवकन्या कौशिकी करंबेळकर हिने प्रेरणा मंत्र सांगितला. कार्यक्रमाचा शेवटी आई तुळजाभवानीला वंदन करून छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांना स्मरून हिंदु धर्माचे संवर्धन आणि रक्षणाची शपथ घेण्यात आली. सूत्रसंचालन डॉ. शुभम कुशे यांनी केले.
महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती निवडणूक १ जुलैला !
पिंपळी खुर्द येथील महामार्गालगतचे धोकादायक काचेचे भंगार हटवले
कुपोषण निर्मूलनात रत्नागिरी जिल्हा परिषदेचा राज्यात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
हिंदूंनी ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातून शत्रूबोध घ्यावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
कल्याण येथे नालेसफाईसाठी बालकामगाराचा वापर; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंद
सातारा येथे व्यावसायिक लाभासाठी महामार्गावरील रस्ते दुभाजक फोडले