पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश !

खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांचा सत्कार करतांना  कु. क्रांती पेटकर

पूजनप्रसंगी उपस्थित महिला

पुणे, २९ जून (वार्ता.) – येथील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदा वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी प्रशासनाला मागे घ्यावी लागल्याने या कार्यक्रमाला विजयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. पुरातत्व विभागाने फुले वाड्यातील पारंपरिक वटपूजनावर बंदी घालणारा आदेश काढला होता. या निर्णयाविरुद्ध हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, विश्व हिंदु परिषद, दुर्गा वाहिनी, स्थानिक महिला आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संघटित प्रयत्नांमुळे पुरातत्व विभागाने बंदी उठवली. वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्थानिक महिलांनी फुले वाड्यात येऊन वटपौर्णिमेची पूजा केली. यामध्ये भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, रणरागिणी शाखेच्या महिला, सकल हिंदु समाज आणि स्थानिक नगरसेविका यांनी सहभाग घेतला. ‘हा धार्मिक स्वातंत्र्याचा विजय आहे’, अशी सर्वांची भावना आहे. ‘सकल हिंदु समाज’ आणि ‘महात्मा फुले वाडा परिसर भगिनी मंडळा’च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

हिंदूंचे सण म्हणजे निसर्ग संवर्धनाचा संदेश ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी

वटपौर्णिमा हा केवळ सण नसून ती निसर्गाची आराधना आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे. वडाच्या पारंब्यांचे पुनरुज्जीवन आणि त्याचे दीर्घायुष्य हे कौटुंबिक वंशाच्या अखंडतेचे प्रतीक मानले जाते. नागपंचमी, बैलपोळा यांसारखे सणही निसर्गसेवेचाच संदेश देतात.

सनातन धर्मात वटवृक्षाला विष्णूचे रूप मानले जाते ! – सौ. उज्ज्वला गौड, पुणे शहर सरचिटणीस (महामंत्री), भारतीय महिला मोर्चा

सनातन धर्मात वटवृक्ष हे श्रीविष्णूचे रूप मानले जाते. या श्रद्धेपोटी सर्व महिलांनी एकत्र येऊन आनंदाने ही पूजा केली.

वडपूजनानंतर उपस्थित नगरसेवकांनी खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांचा सत्कार केला. यानंतर सौ. मेधा कुलकर्णी यांनी दुर्गा वाहिनीच्या सौ. कार्तिकी परदेशी आणि हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर, तसेच अन्य सदस्य यांचा सत्कार केला. सनातनच्या साधिकांनी सौ. मेधा कुलकर्णी यांची ओटी भरली.

हा संघटित प्रयत्नांचा परिणाम ! – कु. क्रांती पेटकर, रणरगिणी शाखा

पुरातत्व विभागाच्या आदेशानंतर स्थानिक महिला, हिंदुत्वनिष्ठ संघटना, खासदार सौ. मेधा कुलकर्णी यांच्या संघटित प्रयत्नांमुळे यंदा पुन्हा एकदा येथे वटपौर्णिमेची पूजा अतिशय उत्साहामध्ये साजरी झालेली आहे.

उपस्थित मान्यवर

भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, भारतीय महिला मोर्चाच्या पुणे शहर सरचिटणीस सौ. उज्ज्वला गौड, नगरसेविका मृणाल कांबळे, ऐश्वर्या थोरात, स्नेहा माळवदे, विश्व हिंदू परिषदेचे पुणेचे पूर्व विभाग सहमंत्री श्री. विजय कांबळे, कसबा जिल्हा मंत्री श्री. शैलेंद्र जाधव, पुणे (पूर्व) विभाग दुर्गावाहिनीच्या संयोजिका सौ. कार्तिकीताई परदेशी आणि कार्यालय प्रमुख कसबा जिल्हा येथील गोपाल शिंदे, साहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे

विशेष – पुणे पूर्व विभाग दुर्गावाहिनीच्या संयोजिका सौ. कार्तिकीताई परदेशी यांचा या संपूर्ण लढ्यात सक्रीय सहभाग होता.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी या प्रकरणात ‘तुघलकी’आदेश काढणार्‍या आणि हिंदूंना विनाकारण त्रास देणार्‍या पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.