कुपोषण निर्मूलनात रत्नागिरी जिल्हा परिषदेचा राज्यात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसाठी २० कोटी

  • प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १० कोटी

रत्नागिरी – कुपोषण न्यून करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद अग्रेसर असून आगामी काळात विविध उपाययोजनांच्या माध्यमातून हे प्रमाण शून्यावर आणत राज्यामध्ये एक आदर्श निर्माण केला जाईल, असे राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हा परिषदेत आयोजित कुपोषित बालकांच्या संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.

१. सध्या कुपोषणाचे प्रमाण अल्प असणार्‍या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत तीव्र अल्प वजनाची ३४, तर मध्यम अल्प वजनाची ६३२ बालके आहेत. ही मध्यम वजनाची बालके तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत जाऊ नयेत, यासाठी आरोग्य विभागाला विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुपोषित बालकांना त्यांच्या पालकांसह रहाण्याची भोजनाची ८ दिवस व्यवस्था करून त्यांना योग्य आणि पोषक आहार देण्याची व्यवस्था केली जाईल. या मोहिमेत डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलच साहाय्य घेतले जाणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून या बालकांसाठी आवश्यक औषधे आणि पूरक पोषण आहार उपलब्ध करून दिला जाईल. या कुपोषित बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी संबंधित भागातील जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या प्रभागातील बालकांचे ‘पालकत्व’ स्वीकारणार आहेत, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

२. ग्रामीण भागातील जनतेला स्थानिक पातळीवरच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रतिवर्षी १० प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत् करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अद्ययावतीकरणाच्या कामासाठी १० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली.

३. जिल्ह्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी जिल्ह्यात किमान २०० ते २५० नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम केले जाणार असून यासाठी जिल्हा परिषदेला २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी बैठकीत सांगितले.