वर्णांनुसार साधनेचे महत्त्व आणि चारही वर्णांची साधना करवून मोक्ष देणारी गुरुकृपायोगानुसार साधना

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : एकेका वर्णानुसार साधना पूर्ण करून मोक्षाला जाता येते कि पुढच्या पुढच्या वर्णांची साधना एकत्रित करून लवकर मोक्षाला जाता येते ? (१४.१.२०२५)

उत्तर : ‘एकेका वर्णानुसार साधना करणे, म्हणजे व्यष्टी साधना, याउलट सर्व वर्णांची एकत्रित साधना, म्हणजे समष्टी साधना.

१. साधनेच्या दृष्टीने वर्णाची व्याख्या

अध्यात्मात प्रकृतीनुसार साधना आणि क्षमतेनुसार साधना यांना सर्वांधिक महत्त्व आहे. व्यक्ती त्याच्या प्रकृतीनुसार कर्म करतो, तर त्याच्या क्षमतेनुसार त्याला त्या कर्मांत यश प्राप्त होते. या दोन्ही घटकांना लक्षात घेऊन व्यक्तीचे वर्ण ठरवले गेले आहेत. व्यक्तीला त्याच्या प्रकृतीनुसार साधना करता यावी; म्हणून वर्णानुसार साधना सांगितली जाते. एका वर्णाच्या साधनेतून अधिकाधिक संतपदापर्यंत पोचता येते; कारण संतपद गाठणे, म्हणजे जिवाचा वर्ण ‘हंस वर्ण’ होणे. या टप्प्याला जिवाच्या अहंचा लय बर्‍याच प्रमाणात झाल्याने त्याचा प्रकृतीनुसार साधनेचा आग्रह नसतो. जीव हंस वर्णाचा झाल्यावर त्याला पुढच्या टप्प्याची साधना करून मोक्ष मिळवता येतो.

२. एका वर्णानुसार साधना केल्याने पुढच्या वर्णातील साधना करण्याची क्षमता निर्माण होणे

एका जन्मात एका वर्णानुसार तळमळ आणि भावयुक्त साधना केल्याने व्यक्तीमध्ये पुढच्या पुढच्या वर्णाची साधना करण्याची क्षमता आपोआप निर्माण होते, उदा. शूद्र वर्णानुसार साधना केल्याने व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीत वाढ होऊन त्याच्या प्रारब्धाचा खडतर भाग नष्ट होतो. त्यामुळे तो स्वत:च्या पुण्याचा बळावर धन संचय करण्यास समर्थ होतो. त्याच्यात वैश्य वर्णानुसार साधना करण्याची क्षमता जागृत होते. याउलट त्याचा अहं अल्प झाल्याने बुद्धी सात्त्विक होऊन त्याच्यात ब्राह्मण वर्णानुसार साधना करण्याची क्षमता निर्माण होते.

२ अ. प्रयत्नांना भक्तीची जोड दिल्यावर आवश्यक साधना होऊन संतपद गाठता येणे : व्यक्तीने एका वर्णानुसार करत असलेल्या साधनेला भावाची जोड दिल्यास तिची आध्यात्मिक प्रगती होते. त्यामुळे तिच्याकडून आपोआप पुढच्या वर्णांची साधना घडून तो संतपदापर्यंत पोचू शकतो, उदा. महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार मडके बनवण्याच्या माध्यमातून वैश्य वर्णाची साधना करायचे. त्यांच्यातील भक्तीमुळे त्यांना विविध अभंग स्फुरले. या अभंगांचे गायन आणि प्रसार करणे या माध्यमातून त्यांनी समाजाला प्रायोगिक अध्यात्म शिकवल्याने त्यांची ब्राह्मण वर्णाची साधना झाली. यामुळे व्यक्ती एका वर्णानुसार जरी साधना करत असला, तरी तिच्यात उत्कट भाव असल्यास एकाच जन्मात त्याच्याकडून नकळत पुढच्या पुढच्या वर्णांची साधना होऊन तो संतपदापर्यंत जाऊ शकतो.

३. व्यष्टी साधनेचे तीव्र संस्कार असल्याने ९० टक्के व्यष्टी उपासकांनी एका जन्मात एकाच वर्णाने साधना करण्याच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे

श्री. निषाद देशमुख

व्यक्ती भावभक्ती ठेवून एका वर्णानुसार साधना करून संतपद प्राप्त करू शकते. असे असले, तरी व्यष्टी साधना करणार्‍या जिवांमध्ये स्वत:च्या प्रकृतीला अनुरूप असलेल्या वर्णानुसार साधना करण्याचा आग्रह तीव्र असतो. त्यांच्यात पुढच्या वर्णाची साधना करण्याची क्षमता असते. समवेत त्यांना दुसर्‍या वर्णाची साधना करून मनोलय, बुद्धीलय आणि अहंलय करण्याची अन् समष्टी साधना करण्याची संधी असते; मात्र संकुचित वृत्तीमुळे ते स्वत:च्या वर्णात अडकून पूर्ण जीवन फुकट घालवतात. व्यष्टी साधना करणार्‍यांपैकी केवळ १० टक्के साधकांना भक्तीभावानुसार एका वर्णानुसार साधना करून एका जन्मात संतपद गाठता येते आणि पुढे उच्च लोकांत राहून काही काळाने मोक्ष मिळवता येतो. याउलट वर्णानुसार साधना करणार्‍या अन्य ९० टक्के जिवांमध्ये भाव नसल्याने त्यांची याच जन्मात संतपदापर्यंत वाटचाल होत नाही, त्यामुळे देव त्यांना पुढचा जन्म या जन्मात साधना केलेल्या वर्णाच्या तुलनेत उच्च वर्णाच्या कुटुंबात देतो, उदा. या जन्मात वैश्य वर्णाची साधना केली असेल, तर पुढचा जन्म क्षत्रिय वर्णाच्या साधनेसाठी पूरक कुटुंबात किंवा त्या परिस्थितीत जन्म देतो, जेणेकरून जिवाची त्या वर्णाची साधना व्हावी. अशा प्रकारे अनेक जन्मांतून भाव अल्प असलेल्या आणि एका वर्णातून साधना करणार्‍यांची मोक्षप्राप्तीकडे वाटचाल होते.

४. समष्टी साधना करणारा एकाच जन्मात अनेक वर्णांची साधना करत असल्याने त्याची आध्यात्मिक उन्नती शीघ्र होणे

समष्टी साधनेत जिवाला काळानुसार साधना शिकवली जाते. काळानुसार साधनेत व्यक्तीच्या क्षमतेचा विचार करून त्याला साधना सांगितली जाते, उदा. शारीरिक आजारपण असेल, तर शारीरिक सेवेच्या तुलनेत बौद्धिक सेवा. यामुळे समष्टी साधना करणार्‍या जिवाकडून एकाच जन्मात सर्व वर्णांची साधना होते. याचा परिणाम असा होतो की, साधना करतांना येणार्‍या विविध अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक क्षमता त्याच्यात निर्माण होत जाते, उदा. शारीरिक सेवा केल्यामुळे व्यक्तीचे प्रारब्ध नष्ट होते. त्याच्यातील भावात वृद्धी होण्यास साहाय्य होते. दान दिल्याने व्यक्तीच्या पुण्यात वाढ झाल्याने व्यक्तीचे मानसिक स्तरावरील त्रास अल्प होतात. त्यामुळे जीवनात काळानुसार तीव्र प्रारब्धाचे प्रसंग आल्यावरही जिवाच्या साधनेवर अधिक परिणाम न झाल्याने त्याची आध्यात्मिक प्रगती न थांबता मंद गतीने का होईना; पण चालू रहाते. याच प्रकारे विविध वर्णांची साधना करायला सांगितल्याने ते ध्येय साध्य करण्यासाठी जिवाकडून देवाचे साहाय्य घेण्याचा भाग वाढत असल्याने त्याच्या मनावर भक्तीचे संस्कार होतात.

समष्टी साधनेत व्यक्तीची मुख्य साधना एका वर्णानुसार असली, उदा. वैश्य वर्णानुसार, तरी तो सर्व वर्णांनुसार साधना करत असल्याने त्याच्या अहंमध्ये वाढ न होणे, त्याचे मन अंतर्मुख असणे, असे विविध गुण त्याच्यात निर्माण होतात. त्यामुळे तो व्यष्टी साधना करणार्‍या जिवांच्या तुलनेत शीघ्र आध्यात्मिक उन्नती करतो. यामुळे जिथे एका वर्णातून साधना करणार्‍या व्यष्टी उपासकांपैकी केवळ १० टक्के जीव एकाच जन्मात साधना करून संतपद गाठतात, तर समष्टी साधना करणार्‍यांपैकी ३५ टक्के जिवांना चारही वर्णांची साधना करून एकाच जन्मात सहजतेने संतपद गाठता येते. एवढे नव्हे, तर याच जन्मा जिवंत असतांना मोक्षप्राप्तीही साध्य करता येते.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवलेल्या गुरुकृपायोगानुसार साधनेमुळे साधकांची प्रतिदिन चारही वर्णांची साधना होणे

‘सनातनच्या आश्रमांत, तसेच समाजात राहून गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकांची चारही वर्णांची साधना कशा प्रकारे होते ?’, हे येथे दिले आहे.

५ अ. ब्राह्मण वर्णाची साधना : ग्रंथनिर्मिती, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे प्रकाशन, संकेतस्थळासाठी लेख लिहिणे, आध्यात्मिक अनुभूती किंवा आध्यात्मिक त्रास यांचा अभ्यास करणे, संशोधन, सत्संग/कार्य बैठक घेऊन नियोजन करणे.

५ आ. क्षत्रिय वर्णाची साधना : स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवणे, विविध सामाजिक उत्सवांतील अपप्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणे, हिंदु धर्मावर होणार्‍या विविध आघातांच्या संदर्भात हिंदु समाजाचे संघटन करणे इत्यादी.

५ इ. वैश्य वर्णाची साधना : समाजात सात्त्विक वस्तूंचे वितरण करणे, समाजात जाऊन समष्टी कार्यासाठी अर्पण घेणे, आश्रमातील विविध वस्तूंचा आवश्यक तेवढा वापर करणे, सात्त्विक जीवनशैली (वेशभूषा, केशभूषा) इत्यादींसाठी खर्च करणे इत्यादी.

५ ई. शूद्र वर्णाची साधना : सात्त्विक प्रसारसाहित्य आणणे किंवा पाठवणे, सत्संग/बैठक यांची पूर्वसिद्धता करणे, आश्रमात स्वयंपाक किंवा स्वच्छतेशी संबंधित सेवा करणे, प्रत्येक दिवशी काही काळ सत्सेवा करणे इत्यादी.

वरील विश्लेषणातून लक्षात येईल, ‘गुरुकृपायोगानुसार साधनेचे प्रयत्न प्रतिदिन केल्यावर जिवाची प्रत्येक दिवशी चारही वर्णांनुसार साधना होते.’ हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवलेल्या गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. इतर साधनामार्ग, पंथ, संप्रदाय आणि संस्था यांच्या तुलनेत गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होण्यामागील हेही एक कारण आहे.

६. कृतज्ञता

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सांगतात, ‘गुरु सांगत असलेल्या कृतीचा कार्यकारणभाव कळणे अशक्य आहे. यामुळे शिष्याने बुद्धीच्या विश्लेषणात न अडकता गुरूंचे आज्ञापालन करणे श्रेष्ठ !’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधना म्हणून साधकांना शिकवलेल्या कृतींमागे दडलेले अध्यात्मशास्त्र त्यांच्या कृपेने ग्रहण करून त्याचे टंकलेखन करता आले, यासाठी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याची वेळ : सप्टेंबर २०१८ (टीप) आणि १५.१.२०२५, दुपारी १.१५ (अर्धा मिनिट))

टीप – सप्टेंबर २०१८ मध्ये आश्रमदर्शन करतांना ‘आश्रमात केल्या जाणार्‍या सेवांच्या नियोजनामुळे साधकांची एकाच दिवसात चारही वर्णांची साधना होते’, हे सूत्र मला स्फुरले होते. तसे त्या काळी लिहूनही दिले होते. तेव्हापासून आश्रम पहाण्यासाठी आलेल्या भाव असलेल्या व्यक्तींना मी हे सूत्र सांगायचो.

– श्री. निषाद देशमुख

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.