पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच

प्रतिकात्मक चित्र

पणजी, २९ जून (वार्ता.) – जून मास संपला आहे, तरीही गोव्यातील धरणांतील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत पुष्कळ अल्प आहे. हंगामी पावसाला विलंब होणे आणि गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर अल्प असणे, यांमुळे धरणांतील पाणीसाठा अल्प आहे.

गतवर्षी २५ मे या दिवशी हंगामी पावसाला प्रारंभ झाला होता. यामुळे गतवर्षी जूनच्या अखेर साळावली धरणातून पाणी भरून वहात होते. यंदा हंगामी पाऊस विलंबाने म्हणजे २२ जूनला प्रारंभ झाला आणि नंतर पावसाचा जोर अल्प झाला यांमुळे धरणातील पाण्याचा साठा गतवर्षीच्या तुलतेन अल्प आहे. धरणातील पाणीसाठा वाढण्यासाठी मुसळधार पावसाची आवश्यकता आहे.

उत्तर गोव्याला पाणीपुरवठा करणार्‍या तिलारी धरणात सध्या ३० टक्के पाणी शिल्लक आहे आणि गतवर्षी याच काळात येथे ६० टक्के पाणी होते. सत्तरी आणि डिचोली तालुक्यांना पाणीपुरवठा करणार्‍या अंजुणे धरणात सध्या १० टक्केच पाणी शिल्लक आहे. अंजुणे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षी जून मासात अल्प पाऊस पडल्याने धरणात गतवर्षी जून मासात अल्प पाणी होते; मात्र गतवर्षी जुलैनंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरणात पाणी भरले होते. गतवर्षी जून मासाच्या अखेर गावणे धरण भरले होते, तर चापोली आणि पंचवाडी धरणांमध्ये गतवर्षी ७० टक्के पाणी होते. सध्या गावणे धरणात ४३ टक्के, तर चापोली आणि पंचवाडी धरणांमध्ये अनुक्रमे ४० आणि १८.७ टक्के पाणी आहे. बार्देश, पेडणे आणि आसपासच्या भागांना प्रक्रिया न करता पाणीपुरवठा करणारे आमठाणे हे एकमेव धरण निम्मे (५१.६ टक्के) भरले आहे. याविषयी जलस्रोत खात्याचे वरिष्ठ अधिकारी माध्यमांना म्हणाले, ‘‘धरणांचा पाणीसाठा वाढण्यासाठी जुलै मासामधील प्रारंभाचे आठवडे महत्त्वाचे ठरणार आहेत. वास्तविक जुलै मासात गोव्यात मुसळधार पाऊस पडत असतो आणि धरणातील पाण्याचा साठा पुरेशा प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा आहे.’’

धरणातील पाणीसाठा (२८ जून या दिवशी)

  • साळावली – ६ कोटी ४७ लाख ६० सहस्र घनमीटर
  • तिलारी – १३ कोटी ९१ लाख ६० सहस्र घनमीटर
  • अंजुणे – ४४ लाख ६० सहस्र घनमीटर
  • चापोली – ४५ लाख ४० सहस्र घनमीटर
  • आमठाणे – ३० लाख ३० सहस्र घनमीटर
  • पंचवाडी – ८ लाख ४० सहस्र घनमीटर
  • गावणे – ७ लाख ८० सहस्र घनमीटर

(१ घनमीटर पाणी म्हणजे अनुमाने १ सहस्र लिटर पाणी)