कराचीमधील आक्रमणामागे हात असल्याचा आरोप भारताने फेटाळला !

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

नवी देहली –कराची शहरातील सिंध रेंजर्स या अर्धसैनिक दलाच्या मुख्यालयावर झालेल्या आतंकवादी आक्रमणामागे भारताचा हात असल्याचा पाकने केलेला आरोप भारताने फेटाळून लावला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पाकिस्तानचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले. तसेच ‘पाकिस्तानने देशाचे धोरण म्हणून आतंकवादाचा वापर करण्याची प्रवृत्ती सोडून द्यावी’, असेही सांगितले. या आक्रमणात ३ आतंकवादी आणि ३ सैनिक यांचा मृत्यू झाला होता. आक्रमण करणारे आतंकवादी ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या संघटेनेचे होते.

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानावर आक्रमण : ३५ नागरिक ठार झाल्याचा दावा

कराचीतील आतंकवादी आक्रमणानंतर पाकिस्तानने २८ जूनच्या मध्यरात्री अफगाणिस्तानातील काही भागांवर हवाई आक्रमणे केली. (पाकिस्तान त्याच्या देशात आतंकवादी आक्रमण करणार्‍या अफगाणिस्तानमधील आतंकवाद्यांच्या तळावर आक्रमण करतो, तसेच जर भारत पाकमध्ये आतंकवाद्यांच्या तळावर आक्रमण करत असेल, तर पाक थयथयाट का करतो ? – संपादक) पाकिस्तानने ही आक्रमणे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि जमात-उल-अहरार या आतंकवादी संघटनांच्या तळांवर केल्याचे म्हटले असले, तरी अफगाणिस्तानकडून या कारवाईत मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पक्तिका आणि कुनार प्रांतातील निवासी भागांवर झालेल्या या आक्रमणात किमान ३५ नागरिकांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. पाकिस्तान सरकारने या कारवाईत २५ आतंकवादी ठार झाल्याचा दावा केला आहे.

संपादकीय भूमिका

पाकने जे पेरले आहे, तेच तेथे उगवत असतांना स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी तेथील राज्यकर्ते भारताच्या नावाने खडी फोडत आहेत, हे स्पष्ट आहे !