अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याची घुसखोरी झालेली नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण  

इटानगर (अरुणाचल प्रदेश) – काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तांत असा दावा करण्यात आला होता की, चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशात घुसून भारतीय भूमीवर नियंत्रण मिळवले असून तेथे सैनिकी तळ उभारले आहेत; परंतु हे वृत्त चुकीचे आणि निराधार आहे, असे भारतीय सैन्याने अधिकृतरित्या स्पष्ट केले.

अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील ‘नाह’ या आदिवासी  समुदायाच्या ‘नाह वेल्फेअर सोसायटी’ या समितीने स्थानिक उपायुक्तांना एक निवेदन दिले होते, ज्यामध्ये असे म्हटले होते की, ‘चिनी सैन्य हळूहळू या क्षेत्रावर नियंत्रण  मिळवत आहे. गेल्या ६ वर्षांत नाह समुदाय ज्या ठिकाणी शिकार करतो किंवा गुरे चरतो आणि शेती करतो, तेथील मोठ्या भागावर चिनी सैन्याने नियंत्रण मिळवले आहे.’