रत्नागिरीत गोवंशियांची निर्घृण कत्तल : कातळमय भागात सापडले अवशेष

अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद

रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यादव यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते

रत्नागिरी, २१ जून (वार्ता.) – रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशियांची निर्घृण कत्तल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फणसवळे गावच्या तांबड्याचा पर्‍या येथील एका निर्जन कातळमय भागात अनुमाने ४ गोवंश जनावरांचे कापलेले अवशेष आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 

तक्रारदार सुशील सुभाष कदम (मिरजोळे, रत्नागिरी) हे रविवारी, २१ जून २०२६ या दिवशी सकाळी त्यांच्या गॅरेजवर काम करत असतांना त्यांचे मित्र संजय जोशी यांनी त्यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली. फणसवळे येथील संतोष आंबेकर यांनी जोशी यांना फोन करून जनावरांचे अवशेष पडले असल्याचे सांगितले होते.

घटनास्थळावरील विदारक दृश्य

माहिती मिळताच सुशील कदम हे त्यांचे मित्र सोहम खानविलकर यांच्यासमवेत दुपारी १२:३५ च्या सुमारास फणसवळे गावच्या तांबड्याचा पर्‍या येथील कातळमय भागात पोचले. तेथे त्यांना सुमारे २ दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी ४ गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आढळून आले. आरोपींनी जनावरांची चामडी, मान, छाती आणि पाय कापून केवळ मांसाचे अवशेष सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होईल, अशा स्थितीत उघड्यावर टाकून दिले होते.

( ही  चित्रे कुणाच्या भावना दुखावण्यासाठी नव्हे, तर वस्तूस्थिती समजावी, यासाठी छापत आहोत.)

धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा नोंद

जनावरांची बोकडासारखी मान कापून, आतडी काढून अत्यंत क्रूरपणे कत्तल केल्याचे पाहून हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूनेच हे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सुशील कदम यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली.

पोलीस अन्वेषण चालू

या घटनेप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २८०, २९९ आणि ३२५, तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ च्या कलम ५, ५ए, ५बी आणि ९ अंतर्गत गुन्हा (रजिस्टर क्र. ०१२२/२०२६) नोंद केला आहे. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक अभय अशोक तेली करत आहेत.

( ही  चित्रे कुणाच्या भावना दुखावण्यासाठी नव्हे, तर वस्तूस्थिती समजावी, यासाठी छापत आहोत. )

आरोपींना तत्काळ शोधून अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी

या घटनेनंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यादव यांना निवेदन देण्यात आले. आरोपींना तत्काळ शोधून अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलनाची चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

या वेळी रत्नागिरी गोसेवा संघाचे अध्यक्ष श्री. गणेश गायकवाड, सचिव श्री. सुशील कदम, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री सोहम खानविलकर, जीवन जाधव, अविनाश पाटील, श्री. राजेंद्र तोडणकर, हिंदू जागरण मंचचे सर्वश्री चंद्रकांत राऊळ, क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री. राकेश नलावडे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संजय जोशी, संजय पावसकर, विष्णु बगाडे आदी उपस्थित होते.