कै. गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी यांनी स्थापन केलेल्या ‘नाईक मराठा मंडळा’ला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने...!
माजी पदाधिकारी आणि सदस्यांसह केळुस्करांच्या वारसदारांच्या सत्काराचे आयोजन

मुंबई, २० जून (वार्ता.) – समाजप्रबोधन, शिक्षण, साहित्य आणि सामाजिक संघटन क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरुस्थानी मानलेले गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर (केळुस्करगुरुजी) यांनी स्थापन केलेल्या ‘नाईक मराठा मंडळा’ला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शताब्दी वर्षानिमित्त मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत विविध स्तरांवर कार्य केलेले पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि केळुस्कर यांचे वारसदार यांचा विशेष सत्कार २१ जून या दिवशी करण्यात येणार आहे.
वर्ष १९२६ मध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर केळुस्करगुरुजी यांनी मुंबईत ‘नाईक मराठा मंडळा’ची स्थापना केली. सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी कार्य करणार्या या संस्थेने गेल्या शतकभरात समाजजीवनात उल्लेखनीय योगदान दिले आहे. या शतकीय प्रवासाचा गौरव करण्यासाठी मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, २१ जून या दिवशी दुपारी ३ ते रात्री ८ पर्यंत अंधेरी (पूर्व) येथील सिम्फनी बँक्वेट्स, तिसरा मजला, विजयनगर सोसायटीजवळ, डी-मार्ट शेजारी, सहार रस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे. मंडळाच्या कार्यकारिणीत किमान ५ वर्षे कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्ती हयात नसल्यास त्यांच्या वारसदारांचा सन्मान करण्यात येईल.
याप्रसंगी ‘नाईक मराठा मंडळा’चे संयुक्त कार्यवाह आणि ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक यांनी समाजबांधवांना स्वत:च्या कुटुंबियांसह उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.
गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांचे नाव महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक इतिहासात अत्यंत आदराने घेतले जाते. २० ऑगस्ट १८६० या दिवशी तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील केळुस या गावी त्यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत त्यांनी सावंतवाडी आणि मुंबई विल्सन हायस्कूल येथे शिक्षण घेतले. वर्ष १८८१ मध्ये हायस्कूलमधून पहिल्या २५ क्रमांकांत ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. भायखळा येथील इस्रायली शाळेत दरमहा १५ रुपये वेतनावर त्यांच्या नोकरीस प्रारंभ झाला. त्यानंतर विल्सन हायस्कूलमध्येच शिक्षक म्हणून दरमहा ३० रुपये वेतन त्यांना मिळू लागले. ते कुशल, आदर्श, तसेच कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. विद्वत्तेच्या जोरावर मॅट्रिक असूनही इयत्ता ६ वी पर्यंतच्या वर्गास त्यांनी शिकवले. वर्ष १९२५ मध्ये ३९ वर्षे सेवा करून वयाच्या ६५ व्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले. त्या वेळी सेवानिवृत्तीचे वय ५५ वर्षे असतांनाही गुरुजींना १० वर्षे वाढवून दिली, तसेच नियम नसतांनाही ३० रुपये मासिक सेवानिवृत्ती वेतन विल्सन हायस्कूलच्या संचालकांनी त्यांना दिले.
स्वातंत्र्यापूर्वीचा काळ असल्याने मुंबईतील ब्रिटीश अधिकार्यांना मराठी आणि संस्कृत शिकवण्यासाठी गुरुजींची विशेष नेमणूक करण्यात आली होती.
वयाच्या १० व्या वर्षांपासून ते ७० व्या वर्षांपर्यंत त्यांनी वाचनाची आवड जोपासली. ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी स्वाध्यायावर भर दिला. केवळ स्वाध्यायाच्या आधारे तर्कशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, भूगर्भशास्त्र या शास्त्रात ते पारंगत झाले. सुबोधपत्रिका, सुबोधप्रकाश, दीनबंधू, शेतकर्यांचा कैवारी या पत्रकांमध्ये तेजस्वी आणि विचारप्रवर्तक लेख त्यांनी लिहिले. ‘जगदवृत्त’ वृत्तपत्र, ‘इस्रायल’ मराठी साप्ताहिक, ‘समाजसुधारक’ मासिक आदींचे ते संपादक होते.
मराठा एकेच्छु सभा, मराठा प्रॉव्हिडेट फंड, निधी प्रसारक मंडळ, बुद्ध सोसायटी, सेवासदन सोसायटी, गोमंतक मराठा समाज, नाईक मराठा मंडळ इत्यादी संस्थांची स्थापना त्यांनी केली.
शिक्षण घेत त्यांनी विद्वत्तेच्या जोरावर शिक्षक, लेखक, संपादक आणि समाजसुधारक म्हणून मोठी ओळख निर्माण केली. मुंबईतील विल्सन हायस्कूलमधील त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी सहस्रो विद्यार्थ्यांना घडवले. स्वाध्यायाच्या बळावर त्यांनी तर्कशास्त्र, नीतीशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र आणि इतर अनेक विषयांमध्ये प्राविण्य मिळवले. त्यांनी २३ हून अधिक ग्रंथांची निर्मिती केली असून त्यांचे एकूण लेखन ६ सहस्र पानांहून अधिक आहे. ७ उपनिषदांचे भाषांतर केले, तसेच ‘निर्णयासागर निती बोधमाला’ही लिहिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले विस्तृत चरित्र, गौतम बुद्धांचे चरित्र, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे चरित्र, श्रीमद्भगवद्गीता यांसारखे अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिले. वर्ष १९३४ मध्ये मुंबई येथे भरलेल्या ‘पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे ते एकमताने निवडलेले अध्यक्ष होते. १४ ऑक्टोबर १९३४ या दिवशी त्यांचे दुःखद निधन झाले.
वर्ष २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून गुरुजींच्या १२ खंडांचे पुनर्प्रकाशन करण्यात आले.
शताब्दी वर्षाचा अभिमान !
गुरुवर्य केळुस्कर गुरुजींच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली ‘नाईक मराठा मंडळ’ ही संस्था आज १०० वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण करत आहे. या निमित्ताने होणारा सन्मान सोहळा हा केवळ व्यक्तींचा गौरव नसून गेल्या शतकभर समाजकारण, शिक्षण आणि संघटन क्षेत्रांत योगदान देणार्या सर्व कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यात केळुस्करगुरुजींचे सर्वांत मोठे योगदान !केळुस्करगुरुजींचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याला दिलेली दिशा ! बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गुरुजींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले आणि स्वतः लिहिलेले ‘गौतम बुद्ध चरित्र’ हे पुस्तक त्यांना भेट दिले. याच पुस्तकातून बाबासाहेबांना भगवान बुद्धांच्या विचारांची प्रेरणा मिळाली. पुढे त्यांनी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा महान ग्रंथ लिहिला. बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी विलायतेस जाण्याची इच्छा होती; मात्र आर्थिक अडचणींमुळे ते शक्य होत नव्हते. हे समजताच केळुस्करगुरुजी स्वतः बाबासाहेबांना बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे घेऊन गेले. त्यातून बाबासाहेबांना शिष्यवृत्ती मिळाली आणि पुढे ते ‘बॅरिस्टर’ बनून भारताच्या इतिहासात परिवर्तन घडवू शकले. |
मुंबई लोकलमध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणार्या मुख्य सूत्रधारांवर गुन्हे नोंदवा अन्यथा जनआंदोलन करू !
देश धर्मशाळा नसल्याने घुसखोरांना भारतात राहू देणार नाही ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
हार्बर रेल्वेत लावली आहेत ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारी पत्रके !
पुणे येथील ‘विबग्योर स्कूल’मधील ख्रिस्ती कर्मचार्याकडून हिंदु विद्यार्थिनीच्या धर्मांतराचा प्रयत्न !
१ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ !
Ganpatipule Tourists Drowned : गणपतीपुळे येथे ८ पर्यटक बुडाले : ३ पर्यटकांना वाचवण्यात यश