(टीप : ‘बायोमेकॅनिकल’, म्हणजे शरिराची रचना आणि (स्नायू, हाडे अन् सांधे यांच्या) हालचाली यांचा भौतिकशास्त्र आणि यांत्रिक पद्धतीने केलेला अभ्यास)
अनेकदा भुजंगासनाकडे केवळ एक साधे ‘स्ट्रेचिंग’ (स्नायूंना उपयुक्त ताण देणारे) आसन म्हणून पाहिले जाते; पण आधुनिक ‘मस्कुलोस्केलेटल रिसर्च’नुसार (‘स्नायू, हाडे, सांधे, कंडरा आणि लिगामेंट्स यांच्याशी संबंधित संशोधना’नुसार) हे आसन मानवी शरिराच्या अनेक संस्थांवर एकाच वेळी वेगवेगळ्या स्तरांवर काम करते. या आसनाचे वेगवेगळे पैलू आणि त्यामागील अचूक विज्ञान आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.
१. मणक्याचे ‘बायोमेकॅनिक्स’ आणि कंबरदुखीपासून मुक्ती !
(टीप : ‘बायोमेकॅनिक्स’, म्हणजे जीवशास्त्र आणि यांत्रिकी यांचा संगम. शरिराच्या हालचालीमागील वैज्ञानिक तत्त्वांचा अभ्यास)
आजकाल घंटोन्घंटे आसंदीवर पुढे झुकून बसल्यामुळे आपल्या पाठीच्या मणक्यातील गादीवर, म्हणजेच ‘इंटरव्हर्टेब्रल डिस्क’वर मागच्या बाजूने प्रचंड दाब येतो. यामुळेच कंबरदुखी आणि ‘स्लिप डिस्क’च्या समस्या वाढतात. (‘स्लिप डिस्क’, म्हणजे मणक्यांमधील गादी बाहेर सरकणे किंवा फुगणे. त्यामुळे नसांवर दाब येऊन पाठ किंवा पाय येथे वेदना होऊ शकतात.)
जेव्हा आपण भुजंगासन करतो, तेव्हा मणक्याची हालचाल अगदी उलट, म्हणजेच मागच्या बाजूला होते. ‘फिजिओथेरपी’च्या भाषेत याला ‘मॅकेन्झी मेथड’ म्हणतात. (‘फिजिओथेरपी’, म्हणजे व्यायाम, हालचाली आणि विविध उपचारपद्धत यांच्या साहाय्याने वेदना न्यून करणे अन् शरिराचे कार्य सुधारणे यांची वैद्यकीय शाखा. ‘मॅकेन्झी मेथड’, म्हणजे पाठदुखी, मानदुखी आणि ‘स्लिप डिस्क’ यांच्या उपचारासाठी वापरली जाणारी एक विशेष ‘फिजिओथेरपी’ पद्धत.) भुजंगासनामध्ये होणार्या हालचालींमुळे मणक्याच्या गादीवरचा पुढचा दाब निघून जातो, तेथील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. यामुळे जुनाट कंबरदुखी आणि ‘सायटिका’ यांच्या त्रासात आराम मिळतो. (सायटिका, म्हणजे कमरेपासून नितंब, मांडी आणि पाय इथपर्यंत जाणार्या नसेवर दबाव आल्यामुळे होणारी वेदना, मुंग्या किंवा जळजळ.)

२. पोटाचा मेंदूशी संपर्क आणि ‘व्हॅगस नर्व्ह’
आपल्या शरिरात मेंदू आणि पोट यांना जोडणारी एक मुख्य नस असते, जिला ‘व्हॅगस नर्व्ह’ म्हणतात. भुजंगासनात जेव्हा छाती आणि पोट यांचा पुढचा भाग ताणला जातो, तेव्हा ही नस थेट उत्तेजित होते. ही नस सक्रीय होताच शरिरातील ‘स्ट्रेस हार्मोन्स’ (तणावाच्या वेळी शरिरात स्रवणारे संप्रेरक) न्यून होतात आणि शरीर ‘रेस्ट अँड डायजेस्ट मोड’मध्ये जाते. (‘रेस्ट अँड डायजेस्ट मोड’, म्हणजे शरिराची विश्रांती आणि पचनासाठीची अवस्था. यात हृदयाचे ठोके मंदावतात, पचनक्रिया सुधारते आणि शरीर ऊर्जा साठवते.) जोपर्यंत मानसिक ताण न्यून होत नाही; तोपर्यंत पोटाचे आजार बरे होत नाहीत. भुजंगासन एकाच वेळी मनाला शांत करते आणि पोटाची ‘सिस्टम’ (पचनादी क्रिया) सुरळीत करते.
३. मधुमेह (डायबिटीस) आणि लठ्ठपणा यांसाठी
या आसनामध्ये जेव्हा ओटीपोटावर आणि नाभीच्या भागावर दाब पडतो, तेव्हा पोटातील अंतर्गत अवयवांना नैसर्गिक मसाज होतो. संशोधनानुसार या दाबामुळे स्वादुपिंड (पॅनक्रियाज) सक्रीय होते आणि ‘इन्सुलिन’चे वहन सुधारते. (‘इन्सुलिन’ म्हणजे स्वादुपिंडातून स्रवणारे आणि रक्तातील साखर पेशींमध्ये पोचवून तिचे प्रमाण नियंत्रित ठेवणारे संप्रेरक.) म्हणूनच मधुमेहाच्या उपचारांत आणि पोटाची अतिरिक्त चरबी न्यून करण्यासाठी हे आसन अत्यंत प्रभावी मानले जाते.
४. सावधान ! आसन करतांना होणार्या या चुका टाळा !
बहुतेक लोक भुजंगासन करतांना दोन्ही हात पूर्ण सरळ करतात आणि मान मागे झटका देऊन मागच्या बाजूला झुकतात. यामुळे पाठीच्या खालच्या मणक्यावर अतीप्रमाणात दाब येतो आणि कंबरदुखी न्यून होण्याऐवजी वाढू शकते.
अ. योग्य पद्धत : भुजंगासन करतांना नाभीपर्यंतचा भाग भूमीला टेकलेला असावा. हाताचे कोपरे थोडे दुमडलेले आणि शरिराजवळ असावेत. मान मागे झटका न देता छातीचा भाग पुढे आणि वर उचलण्याचा प्रयत्न करावा, तरच पाठ अन् पोट यांना योग्य लाभ होतो.
आ. कुणी करू नये ? : ज्यांना तीव्र ‘स्लिप डिस्क’, ‘हर्निया’ (शरिरातील एखादा अवयव किंवा ऊतक स्नायूंच्या कमकुवत भागातून बाहेर फुगणे. हे पोटात, जांघेत किंवा इतर भागांत होऊ शकते.) आहे किंवा ज्यांची पोटाची शस्त्रक्रिया झाली आहे; त्यांनी हे आसन वैद्यांच्या सल्ल्याविना करू नये.
कमरेच्या दुखण्यात केवळ औषधे न देता भुजंगासनासारख्या प्रभावी आसनाची जोड देण्यास आम्ही आमच्या रुग्णांना नेहमीच सुचवत असतो; जेणेकरून औषधांचा कालावधी मर्यादित होऊन पुढेही त्रास न होण्यास साहाय्य होत रहाते !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.

ध्यान
हठयोग
ध्यानाचे प्रमुख शारीरिक उपयोग !
योगाभ्यासाला विश्वविख्यात करण्यासाठी त्याला ‘निधर्मी’ करू नका !
पवनमुक्तासनाचे अनन्यसाधारण लाभ !
वज्रासमान शरीर मजबुतीसाठी सुप्तवज्रासन !