पवनमुक्तासनाचे अनन्यसाधारण लाभ !

पोट साफ, तर सगळे माफ !

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे पोटाचे आजार ही घराघरातील मुख्य समस्या बनली आहे. अपचन, गॅस (वात) आणि पोट फुगणे या त्रासांमुळे अनेक जण त्रस्त असतात. यावर सर्वांत सोपा, विनामूल्य आणि अत्यंत गुणकारी उपाय, म्हणजे पवनमुक्तासन !

काय काय लाभ होतात या आसनाने ?

१. वात (गॅस) आणि पित्त (अ‍ॅसिडिटी) यांपासून तात्काळ सुटका

जेव्हा आपण पवनमुक्तासन करतो; म्हणजेच पाय दुमडून पोटावर दाबतो; तेव्हा आतड्यांवर एक नैसर्गिक दाब निर्माण होतो. विज्ञानानुसार या दाबामुळे आतड्यांमध्ये अडकलेला वायू अगदी सहज बाहेर पडतो. जर तुम्हाला नेहमी पोट फुगल्यासारखे वाटत असेल, तर हे आसन तुमच्यासाठी ‘इन्स्टंट रिलिफ’ (तात्काळ मुक्तता) देणारे औषध ठरेल.

२. बद्धकोष्ठता होईल गायब !

संशोधनात असे दिसून आले आहे की, या आसनामुळे आपल्या पचनसंस्थेची हालचाल सुधारते. सोप्या भाषेत सांगायचे, तर हे आसन पोटातील मळ पुढे ढकलण्यास आतड्यांना साहाय्य करते. त्यामुळे ज्यांना सकाळी पोट साफ न होण्याची तक्रार आहे, त्यांनी प्रतिदिन सकाळी हे आसन आवर्जून करायला हवे.

३. कंबरदुखी आणि पाठीचा कडकपणा यांवर रामबाण उपाय

आजकाल घंटोन्घंटे संगणकासमोर बसून अनेकांची कंबर आखडते. पवनमुक्तासन करतांना पाठीच्या खालच्या भागाला पुष्कळ छान आणि खोलवर ‘स्ट्रेच’ (ताण) मिळतो. कंबरदुखी आणि पाठीचा कडकपणा न्यून करण्यासाठी हे अतिशय सुरक्षित आणि प्रभावी आसन आहे.

४. वजन आणि पोटाची चरबी न्यून करण्यास साहाय्य

पवनमुक्तासनाचा थेट परिणाम आपल्या पोटाच्या स्नायूंवर होतो. पोटावर दाब पडल्यामुळे तिथले स्नायू ‘टोन’ होतात आणि चयापचय क्रिया वेगवान होते. यामुळे पोटाभोवती जमा झालेली अतिरिक्त चरबी न्यून होण्यास साहाय्य होते.

५. ताणतणाव न्यून आणि मन शांत

जेव्हा आपण या आसनात स्थिर राहून संथ श्‍वास घेतो, तेव्हा आपल्या मेंदूला शांत होण्याचे संकेत मिळतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे, तर यामुळे शरिरातील ‘स्ट्रेस हार्मोन’ची (ताण निर्माण करणार्‍या संप्रेरकांची) पातळी न्यून होते. पोट साफ राहिल्यामुळे आणि मन शांत झाल्यामुळे साहजिकच तुमचा पूर्ण दिवस उत्साहाने (‘एनर्जी’ने) भरलेला रहातो.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.

हे आसन अतिशय सोपे असले, तरी ज्यांची नुकतीच पोटाची एखादी शस्त्रक्रिया झाली आहे, तीव्र ‘स्लिप डिस्क’चा त्रास आहे त्यांनी किंवा गरोदर महिला यांनी हे आसन करू नये.