हठयोग 

‘हठयोग हे योगाभ्यासाचे मूळ आहे. हठयोग शारीरिक मुद्रा (आसन), श्वासोच्छ्वासाचे तंत्र (प्राणायाम) आणि ध्यान यांवर आधारित आहे. ‘हठ’ म्हणजे ‘शक्ती’ आणि ‘योग’ म्हणजे जोडणे. शक्तीशी एकरूप होणे, म्हणजे ‘हठयोग’ होय !’ 

हठयोग आणि सुषुम्ना नाडीचे महत्त्व 

हठयोग हा कष्टसाध्य योग आहे. हठयोगात आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा, त्राटक, नेती, धौती, बस्ती इत्यादी कष्टसाध्य कृतींच्या आधारे समाधी प्राप्त करून घेतली जाते. त्यामुळे त्याला ‘हठयोग’ म्हणतात. हठयोगाविषयीच्या ग्रंथांमध्ये ‘हठयोग’ या शब्दाची वेगळी व्युत्पत्ती दिली जाते. त्यानुसार ‘ह’ म्हणजे सूर्यनाडी आणि ‘ठ’ म्हणजे चंद्रनाडी. सूर्यनाडी आणि चंद्रनाडी अनुक्रमे उजव्या अन् डाव्या नाकपुडीतून चालणार्‍या श्वसनाला म्हटले जाते. त्यांनाच अनुक्रमे ‘पिंगला’ आणि ‘ईडा’ असेही म्हणतात. या दोन्हींचा संयोग जेथे होतो, तिला ‘सुषुम्ना नाडी’ म्हटले जाते. ‘ह’ (पिंगला) आणि ‘ठ’ (ईडा) एकरूप होण्यातून जो योग साधला जातो, तो हठयोग. आपल्या शरिरात नाभीच्या खाली आणि मूलाधारचक्राच्या वर कुंडलिनी नावाची एक तेजोवलयरूपी नाडी असते. ‘कुंडलिनीला जागृत करून मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत पोचवणे’, हे हठयोगाचे ध्येय असते. ही कुंडलिनीजागृती सुषुम्ना नाडीच्या माध्यमातूनच घडते. हे सुषुम्ना नाडीचे महत्त्व आहे.

हठयोगावरील उपयुक्त ग्रंथ  

हठयोगातील काही ज्ञान उपनिषदे, ‘पातंजल योगसूत्र’, ‘श्रीदत्त माहात्म्य’ आणि अन्य प्राचीन साहित्यात विखुरलेले आढळते. नाथ संप्रदायाचे मच्छिंद्रनाथ (किंवा मत्स्येंद्रनाथ – नववे-दहावे शतक) आणि गोरखनाथ (किंवा गोरक्षनाथ – नववे-दहावे शतक) हे हठयोगाचे प्रमुख आचार्य मानले जातात; पण हठयोगाची ‘स्वतंत्र शास्त्र’ अशी मांडणी करण्याचे श्रेय गोरखनाथ यांना द्यावे लागेल. त्यांनी हठयोगाविषयी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांतील ‘अमरौघशासनम्’, ‘गोरक्ष पद्धति’, ‘गोरक्ष शतक’ आणि ‘सिद्धसिद्धांत पद्धति’ हे विशेष प्रसिद्ध आहेत. यानंतरचा ‘वसिष्ठसंहिता’ हा ग्रंथ १२ व्या शतकानंतर लिहिला गेला असावा. या ग्रंथांत ‘पातंजलयोगा’प्रमाणेच हठयोगातील अनेक विषयांचे विवेचन येते. त्यानंतरचा हठयोगावरील महत्त्वाचा ग्रंथ, म्हणजे स्वात्माराम योगींद्र (१४-१५ व्या शतकातील नाथ संप्रदायातील एक योगी) यांनी लिहिलेला ‘हठप्रदीपिका’हा होय !

हठयोगाची साधना  

शरिरात ७२ सहस्र नाड्यांचे जाळे

हठयोगाची साधना, म्हणजे नाडीशुद्धीची साधना होय. नाडी म्हणजे अंतःशरिरात प्राणशक्तीचे अभिसरण करणारी वाहिनी होय. ‘शरिरात अशा ७२ सहस्र नाड्या असून त्यांचे एक जाळेच निर्माण झालेले आहे’, असे हठयोगात सांगितलेले आहे. वर उल्लेखलेल्या ईडा, पिंगळा आणि सुषुम्ना या त्यांपैकी प्रमुख नाड्या असून प्राणायाम साधनेत त्यांच्याद्वारे इतर नाड्यांची शुद्धी केली जाते.

शरीरशुद्धीच्या ६ प्रक्रिया

हठयोग्याने योगसाधनेची पहिली पायरी म्हणून शरीरशुद्धीकडे लक्ष दिले पाहिजे. शरिरात वात-पित्त-कफ आणि मेद वृद्धी यांसारखे विकार असल्यास योग्याने ते दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी धौती, बस्ती, नेती, त्राटक, नौली आणि कपालभाती या ६ ‘शुद्धीक्रिया’ सांगितल्या आहेत.

  • त्यामागोमाग आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा आणि नादानुसंधान ही हठयोगाच्या साधनेची ५ महत्त्वाची अंगे आहेत.
  • षट्कर्मांनी शरीर आणि नाड्या शुद्ध झाल्यावर मग ‘आसन’ सिद्ध करावयाचे असते.

आसन

शरिराच्या विशिष्ट स्थितीत स्थिर रहाणे, म्हणजे आसन. 

  • ‘प्राण्यांच्या जेवढ्या, म्हणजे ८४ लक्ष योनी आहेत, तेवढीच ८४ लक्ष आसने आहेत; मात्र भगवान शिवाने प्रातिनिधिक स्वरूपात ८४ आसने सांगितली आहेत’, असे गोरखनाथ यांचे म्हणणे.
  • स्वात्माराम यांनी १५ आसनांचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यात सिद्धासन, सिंहासन, पद्मासन आणि भद्रासन या ४ आसनांना विशेष महत्त्वाचे स्थान दिले आहे. या आसनांमुळे पाठीच्या कण्याचे बळ आणि चपळता वाढण्यास साहाय्य होते. (स्वस्तिकासन, गोमुखासन, वीरासन, कूर्मासन, कुक्कुटासन, उत्तानकूर्मासन, धनुरासन, मत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन, मयूरासन, शवासन ही उर्वरित ११ आसने त्यांनी वर्णिली आहेत.)

प्राणायाम

प्राणनियंत्रणातून मनाचे नियंत्रण शक्य आहे. ‘मनाची पूर्णपणे स्थिर आणि शांत स्थिती, म्हणजे उन्मनी किंवा मनोन्मनी, जी प्राणायामाच्या अभ्यासाने गाठता येते’, असे हठयोगात मानले जाते. कुुंभक (श्वास आत घेणे) आणि रेचक (श्वास बाहेर सोडणे) यांचे विविध प्रकार अन् लाभ यांचे विवेचन ‘हठयोग प्रदीपिके’त आढळते. प्राणायाम करत असतांना शरीर विशिष्ट अवस्थेत बांधल्यासारखे ठेवणे (बंध) किंवा त्याचा विशिष्ट प्रकारचा आविर्भाव (मुद्रा) राखणे यांचे विशेष लाभ आहेत. प्राणायाम, बंध आणि मुद्रा यांच्या अभ्यासातून ‘उन्मनी’ अवस्था गाठता येणे, कुंडलिनी जागृत होणे, अनाहत नाद ऐकू येणे, अशी विविध वर्णने आढळतात.

नादानुसंधान 

षट्कर्मे, आसने, मुद्रा, बंध आणि प्राणायाम या गोष्टी साध्य झाल्यानंतर ‘प्रत्याहार’, ‘धारणा’, ‘ध्यान,’ ‘समाधी’ इत्यादींकडे साधक वळतो. हठयोगात प्रगती करतांना योग्याला घंटानादासारखा सूक्ष्म नाद ऐकू येऊ लागतो. या नादावर सातत्याने लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘नादानुसंधान’ होय. नादानुसंधान हा हठयोगातील ध्यानसाधनेचा महत्त्वाचा प्रकार आहे. स्वात्माराम यांनी हठयोग आणि राजयोग यांमध्ये भेद केला आहे. राजयोग म्हणजे समाधी, ज्यात मन जीवात्म्यात विलीन होते. जीवात्मा परमात्म्यात विलीन होणे, हेच योगसाधनेचे अंतिम ध्येय आहे.

(साभार : ‘समय निरामय’ पंचांग)

हठयोग हा केवळ व्यायाम नसून शरीर, प्राण आणि आत्मा यांचा समन्वय साधणारा आध्यात्मिक मार्ग आहे !

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.