‘फास्ट फूड’ बंद !

कोपरगाव शहरातील (जिल्हा अहिल्यानगर) एक रुग्ण माझ्याकडे आली होती. शहरातील एका मोठ्या मारवाडी कुटुंबातील एक मुलगी, वय वर्ष ११. गेल्या एक वर्षापासून ती डोकेदुखीने ग्रस्त होती. शहरातील सर्व आधुनिक वैद्य (डॉक्टर्स) झाले. सुधारणा होईल म्हणून पुणे येथे दाखवले. तेथे सर्व वैद्यकीय चाचण्या आणि ‘ब्रेन स्कॅनिंग’ इत्यादी सोपस्कार पार पडले. अहवाल (रिपोर्ट) सामान्य; परंतु डोकेदुखी काही न्यून नाही.

वैद्य रामदास आव्हाड

 

प्रतिदिन वेदनाशामक गोळ्या चालू. शेवटी मुंबई येथील प्रसिद्ध ‘न्युरॉलॉजिस्ट’ना (‘मज्जातंतू आणि मेंदू यांच्या विकारांवर उपचार करणारे आधुनिक वैद्यां’ना) दाखवले. त्यांनीही काही वेदनाशामक गोळ्या, काही मानसिक रोग यांवर कार्य करणारी आणि एक रक्तदाब यांवरील सौम्य गोळी दिली. यामुळे तिला काही प्रमाणात फरक पडला; परंतु ६ महिने झाले त्या गोळ्या चालूच होत्या. एखादी जरी गोळी राहिली, तरी ती ‘पुष्कळ डोके दुखते’, म्हणून संपूर्ण घर डोक्यावर घेत होती. ‘‘अजून किती दिवस औषधे घेणार ? म्हणून शेवटी ‘तुमच्याकडे जमेल का बघू’, असा विचार करून तुमच्याकडे आलो’’, असे तिच्या शिक्षित आणि श्रीमंत आई-वडिलांनी सांगितले. तिला पडताळल्यावर, तिची प्रकृती आणि तिचा आहार-विहार विचारल्यानंतर १० मिनिटांमध्ये निदान झाले. मी म्हटले, ‘‘ही मुलगी १०० टक्के बरी होईल.’’ मोठ्या घरची, लाडावलेली ती मुलगी, मागितलेले लगेच मिळत असे. त्यामुळे प्रतिदिन ती ‘मॅगी’ खात असे. सकाळ-संध्याकाळ एकदा तरी ती ‘मॅगी’ खायची. आईही करायला अगदी सोपे, ‘बस ‘बेबी’ दोन मिनिट’ म्हणून लगेच ती करून द्यायची. त्या मुलीची प्रकृती पित्ताची, म्हणजेच उष्ण होती आणि त्यात ती ‘मॅगी’सारखे उष्ण पदार्थ प्रतिदिन खात असे. ‘मॅगी’मध्ये ‘सोडियम क्लोराईड’चे, म्हणजे मिठाचे प्रमाण पुष्कळ असते.

त्यामुळे पित्त वाढून थोडा रक्तदाबही वाढे आणि वाढलेल्या पित्ताने आयुर्वेदाप्रमाणे रक्तही दूषित होऊन तिचे डोके दुखत असे. त्यांना म्हटले, ‘‘तिचे ‘मॅगी’ खाणे बंद करा आणि काही औषधे देतो ती घ्या. ती नक्की बरी होईल !’’ तिचे त्या वेळी थोडे दूषित रक्त काढले; ज्यास आयुर्वेदात ‘रक्तमोक्षण’ म्हणतात आणि पित्तावर कार्य करणारी काही औषधे देऊन पाठवले. या अगोदरची सर्व औषधे लगेच बंद केली. आश्चर्य वाटेल, त्या ६ दिवसांत तिचे एकदाही डोके दुखले नाही ! पुढे १ महिन्यानंतर ती मुलगी पुन्हा विचारू लागली, ‘‘काका, आता मी ‘मॅगी’ खाऊ ?’’ साहजिकच उत्तर ‘नाही’ असे होते. या ठिकाणी ‘मॅगी’सारखी ‘फास्ट फूड’ ती मुलगी प्रतिदिन आहारात घेत होती; म्हणून तिला एवढ्या अल्प वयात रक्तदाब आणि डोकेदुखी झाली होती !

– वैद्य रामदास आव्हाड, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर.

(साभार : ग्रंथ ‘आहार आणि आरोग्य’ रामदासकृत पंचकर्मबोध)