जगात २ गोष्टी कधीच थांबत नाहीत, एक म्हणजे, सूर्य उगवणे आणि दुसरे म्हणजे ट्रम्प यांचे स्वतःची पाठ थोपटून घेणे. नुकतीच बातमी आली, ‘१०० दिवस युद्ध, आता ‘ग्रेट डील’ (महान करार) ! इराण, अमेरिका, इस्रायल, लेबनॉन, हॉर्मुझची सामुद्रधुनी, पाकिस्तानी पंतप्रधान, स्विस घड्याळ, २४ अब्ज डॉलर (२ लाख २८ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) ६० दिवस, १४ कलमे, ३.६७ टक्के युरेनियम अहो, एवढी आकडेवारी वाचून वाटले, हा करार आहे कि ‘आय.पी.एल्.’ क्रिकेट सामन्याचे ‘स्कोअरकार्ड’ ? ‘डील’ कि ‘ढोल’ ?

१. करार झाला; पण कार्यवाही कोण करणार ?
ट्रम्प म्हणतात, ‘डील ग्रेट’ आहे. इराण म्हणते, ‘युद्ध थांबले, नाकेबंदी उठली.’ इस्रायल म्हणते, ‘आम्ही कुठेच स्वाक्षरी केली नाही, आम्ही लेबनॉनमध्ये कायम रहाणार, म्हणजे लग्न एकाचे, वरात दुसर्याची आणि बाशिंग बांधायला तिसराच उभा ! स्वित्झर्लंडमध्ये स्वाक्षरी करार, पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ साक्षीदार. करारात लिहिले आहे, लेबनॉनसह सगळीकडे युद्धबंदी. इस्रायलचे संरक्षणमंत्री कात्झ म्हणतात, ‘आम्ही लेबनॉन, सीरिया, गाझा इथे कायम रहाणार’, म्हणजे स्वाक्षरी इराण-अमेरिकेची आणि कार्यवाही कुणीच करायची नाही ! ट्रम्प इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंना दूरभाषवर म्हणाले, ‘तू हे आक्रमण का केलेस ? माझा ‘डील’ बारगळला असता !’ नेतान्याहूंनी ऐकले असेल का ? नाही; कारण त्यांच्या लेखी ट्रम्प यांचा ‘ग्रेट डील’, म्हणजे ‘ग्रेट ढोल’ आहे, वाजवायला ठीक; पण आत पोकळ !
२. युरेनियम ३.६७ टक्के आणि ६० दिवसांची मुदत

वर्ष २०१५ च्या करारात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामांनी हेच ३.६७ टक्के लिहिले होते. ट्रम्प यांनी वर्ष २०१८ मध्ये तो करार फाडून टाकला. वर्ष २०२६ मध्ये पुन्हा त्याच ३.६७ टक्क्यावर स्वाक्षरी, म्हणजे लग्न मोडून ४ वर्षांनी पुन्हा त्याच मुलीशी साखरपुडा ! घरच्यांनी विचारले, ‘मग आधी कशाला भांडलात ?’ तर म्हणायचे, ‘त्या वेळी ‘माझा’ करार नव्हता, आताचा ‘ग्रेट’ आहे.’
३. २४ अब्ज डॉलर : युद्धाची भरपाई कि लाच ?
इराण म्हणते, ‘६० दिवसांत २४ अब्ज द्या, तरच पुढची चर्चा.’ अमेरिका म्हणते, ‘वागणूक बघून देऊ.’ संयुक्त अरब अमिराती म्हणते, ‘आमच्याकडे पैसे नाहीत.’ ‘रॉयटर्स’ म्हणते, ‘आहेत’, म्हणजे पैसे आहेत; पण कुणाचे ते कुणालाच ठाऊक नाही. अहो, हे ‘डील’ आहे कि ‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’ (हत्येची सुपारी) ?
४. ट्रम्प नीती : आधी जाळायचे, मग विझवायचे !
२८ फेब्रुवारीला ट्रम्प यांनी युद्ध चालू केले आणि म्हणाले, ‘क्षेपणास्त्र (मिसाईल) उद्योग भुईसपाट करू.’ १०० दिवसांनी म्हणतात, ‘मिसाईल कार्यक्रम चर्चेतून वगळला. हिजबुल्ला, हुती, हमास यांना ‘संपवू’ म्हणाले होते.’ करारात त्यांचा उल्लेखच नाही, म्हणजे दुकान पेटवले, नंतर स्वतःच पाणी मारले आणि म्हणालो, ‘बघा, मी किती मोठा फायर ब्रिगेड’ (अग्नीशमन दल) ! आणि हो, इराणच्या अणूकार्यक्रमावर ‘कायमस्वरूपी’ मर्यादा. ‘कायमस्वरूपी’, म्हणजे पुढचा अध्यक्ष येईपर्यंत; कारण अमेरिकेत प्रत्येक ४ वर्षांनी ‘कायम’चा अर्थ पालटतो. तेलाचे भाव १०० वरून ८४ वर आले. ‘शेअर’ (समभाग) विक्री बाजार उसळला, म्हणजे १०० दिवस युद्ध, अब्जावधींची हानी आणि शेवटी काय मिळाले ?
ट्रम्प यांना एक ट्वीट, इराणला करवसुलीचा परवाना आणि इस्रायलला ‘आम्ही ऐकलेच नाही’, असे म्हणायची मुभा !
जगात ‘कायमचा मित्र’ नसतो, ‘कायमचा स्वार्थ’ असतो. भारताने कोणत्याही महासत्तेच्या ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’वर (धोरणात्मक भागीदारावर) भिस्त ठेवू नये.
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद. (१७.६.२०२६)
हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !
युद्ध संपवण्यामागील अमेरिकेची अस्वस्थता !
‘ॲमेझॉन’च्या ‘ॲमेझॉन नाऊ’ विज्ञापनातून थोर शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा अक्षम्य अवमान !
(म्हणे) ‘पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देण्यास सज्ज !’ – Bilawal Bhutto Zardari
पाकिस्तानची उपरोधिक टीका : भारताचे चोख प्रत्युत्तर !