गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व सांगणारी एक बोधप्रद कथा !

१. एका तरुणाने गुरुजींना ‘सत्य काय आहे ?’, हे जाणून घ्यायचे असल्याचे सांगणे आणि गुरुजींनी तो मार्ग खडतर असल्याचे सांगणे

‘एका आश्रमामध्ये एक पुष्कळ मोठे संत रहात होते. ते मठाधिपती होते. त्यांचे पुष्कळ शिष्य होते. प्रतिदिन त्यांच्याकडे शेकडो जण येत-जात असत. एक दिवस त्यांच्याकडे पुष्कळ दुरून एक तरुण आला. तो गुरुजींना भेटला आणि म्हणाला, ‘‘सत्य काय आहे ?’, ते मला जाणून घ्यायचे आहे.’’

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

गुरुजी म्हणाले, ‘‘हे बघ. तुला सत्याबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर सोपे आहे. इथे पुष्कळ ग्रंथ आहेत. येथे बर्‍याच चर्चा, सत्संग आणि प्रवचने चालू असतात. काही पुस्तके वाच. काही चर्चांमध्ये सहभागी हो. सत्याबद्दलची माहिती तुला मिळून जाईल; पण सत्य जाणून घ्यायचे असेल, तर मार्ग खडतर आहे. ‘तुला कधी यश मिळेल ?’, याची निश्चिती मी देऊ शकत नाही. पुन्हा एकदा सांगतो, ‘हे म्हणजे हिर्‍याबद्दल माहिती पाहिजे कि प्रत्यक्ष हिरा स्वतःकडे पाहिजे ?’, यासारखे आहे. तू विचार करून सांग.’’

२. तरुणाने ‘सत्यच हवे’, असे सांगितल्यावर गुरुजींनी त्याला भात कांडण्याच्या कामावर रुजू होण्यास सांगणे

तरुण मागचे सर्व पाश तोडून आला होता. त्याने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, ‘‘गुरुजी, मला सत्यच हवे. कितीही वेळ लागला तरी चालेल.’’ गुरुजी हसले आणि म्हणाले, ‘‘ठीक आहे. आमच्या मठामध्ये भात कांडणारा माणूस कालच काम सोडून गेला आहे. तू भात कांडण्याच्या (टीप) कामावर रुजू हो. मला भेटायला यायची आवश्यकता नाही. मला वाटले, तर मीच तुला बोलावणे पाठवीन किंवा भेटायला येईन. तू तुझे काम करत रहा.’’ तरुण ‘हो’ म्हणाला आणि कामावर रुजू झाला.

टीप – भात कांडणे : शेतातून कापून आणलेल्या सुक्या भातावर ‘उखळ’ आणि ‘मुसळ’ यांच्या साहाय्याने प्रहार करणे, म्हणजेच कांडणे. यामुळे भाताच्या दाण्यावर असलेले टरफल किंवा साळ सोलली जाते आणि आतला पांढरा किंवा तांबडा तांदुळ सुटा होतो.

३. सेवा चालू केल्यावर बारा वर्षांनंतरही तरुणाने गुरुजींना भेटण्याची इच्छा व्यक्त न करणे

भात कांडण्याची सेवा चालू झाली. भात कांडायचे काम एकसुरी आणि इतर कुणाशी संपर्क नसणारे होते. प्रतिदिन उठायचे, खायचे, दिवसभर भात कांडायचा, पुन्हा खायचे आणि झोपायचे. असा दिनक्रम चालू झाला. म्हणता म्हणता १२ वर्षे गेली. १२ वर्षांमध्ये तरुणाने गुरुजींना भेटायची इच्छा व्यक्त केली नाही आणि गुरुजीही त्याला भेटले नाहीत.

४. गुरुजींनी ‘मी मठ सोडून अज्ञातवासात जाणार असून ‘सत्य काय आहे ?’, हे सांगणारा उत्तराधिकारी म्हणून नेमला जाईल’, असे घोषित करणे

१२ वर्षांनंतर अकस्मात् गुरुजींनी घोषित केले, ‘‘मी आता मठ सोडून अज्ञातवासात जाणार आहे. त्यामुळे मला एक उत्तराधिकारी नेमायचा आहे. उत्तराधिकारी नेमण्याची एकच छोटी परीक्षा आहे. त्याने ‘सत्य काय आहे ?’, हे सांगावे. जो परीक्षार्थी ‘सत्य काय आहे ?’, हे योग्य पद्धतीने सांगेल, तो उत्तराधिकारी म्हणून नेमला जाईल.’’ सगळीकडे मोठी चर्चा चालू झाली. त्या मठाचा उत्तराधिकारी होणे, म्हणजे पुष्कळ मानाची गोष्ट होती.

५. एका शिष्याने गुरुजींच्या प्रश्नाचे उत्तर लिहून ती चिठ्ठी रात्री गुरुजींच्या आसनासमोर ठेवणे

अनेक शिष्यांनी चर्चा चालू केल्या; पण कुणालाच समजेना. एका शिष्याने धाडस केले आणि एका कागदावर लिहिले, ‘सत्य म्हणजे – मन हे आरशासारखे असते. त्यावर धुळीचे डाग येतात, म्हणजेच संस्कार येतात. संस्कार गेले की, मन पुन्हा शुद्ध होते, म्हणजेच आत्मरूप होते.’ या शिष्याला गुरुजींना सगळ्यांच्या समोर चिठ्ठी द्यायला धजावेना. त्याला वाटले, ‘आपले काही चुकले, तर चार-चौघांत आपली लाज जाईल’; म्हणून त्याने विचार केला, ‘ती चिठ्ठी रात्री गुरुजींच्या आसनासमोर ठेवावी. जर गुरुजींनी चिठ्ठीतील विधान ‘सत्य आहे’, असे घोषित केले, तर ‘ते मी लिहिले आहे’, असे पुढे येऊन सांगावे. जर गुरुजींनी काही वेगळे विधान केले, तर चिडीचूप बसावे.’ त्याप्रमाणे त्याने ती चिठ्ठी गुरुजींच्या आसनासमोर ठेवली.

६. सकाळी ती चिठ्ठी वाचून गुरुजी मोठ्याने ओरडल्यावर आश्रमात शांतता पसरणे आणि दबक्या आवाजात चर्चा चालू होणे

दुसर्‍या दिवशी गुरुजी आले. त्यांनी ती चिठ्ठी वाचली आणि मोठ्याने ओरडले, ‘‘असले काहीतरी लिहिणारा कोण हा मूर्ख ?’’ आश्रमात एकदम शांतता पसरली. शिष्यगणांना कळेना, ‘यात काय चुकले ?’ चर्चा चालू झाल्या. कोपर्‍या-कोपर्‍यात बैठका चालू झाल्या, ‘जे लिहिले होते, ते तर योग्यच होते. मग गुरुजींनी असे का केले ? गुरुजी खरेच शहाणे राहिले आहेत का ? कि अकस्मात् आलेल्या वेडाच्या झटक्यात ते आश्रम सोडून जात आहेत आणि काहीही बडबडत आहेत ?’ दबक्या आवाजात चर्चा चालू होत्या.

७. भात कांडणारा तरुण चिठ्ठीतील वाक्य ऐकल्यावर हसणे आणि इतर शिष्यांनी त्याला हसण्याचे कारण पुनःपुन्हा विचारून त्याला बेजार करणे

त्यांतील काही चर्चा हा जो तरुण भात कांडत होता, त्याच्या कानावर पडल्या. त्या चिठ्ठीवरील वाक्य त्याच्या कानावर पडल्यावर तो स्वतःशीच हसला आणि परत भात कांडू लागला. दुर्दैवाने त्याचे हे हसणे एका शिष्याने पाहिले. त्याने चिडून त्या भात कांडणार्‍याला विचारले, ‘‘तू का हसलास ?’’ त्यावर तो तरुण म्हणाला, ‘‘काही नाही.’’ आता सगळेच शिष्य इरेला पेटले. (ईर्ष्येने पेटून उठले.) ते म्हणाले, ‘‘तू का हसलास ?’, ते सांग ! तू त्या चिठ्ठीत लिहिलेल्या सत्याचा अपमान केलास. मग जर ते चुकीचे असेल, तर ‘सत्य काय आहे ?’, ते तू सांग.’’ तरुण म्हणाला, ‘‘माझे चुकले. मी काही म्हणायला नको होते; पण मी साधा भात कांडणारा माणूस आहे. मला काय कळते ? मला क्षमा करा. सोडून द्या.’’ इरेला पेटून उठलेल्यांना तो अपमान वाटला, तसेच हे कोडे सोडवायचेही होते. त्यांनी पुनःपुन्हा विचारून तरुणाला बेजार केले.

८. तरुणाने ‘इथे काहीच नाही’, हेच सत्य आहे’, असे सांगणे आणि शिष्यांनी ते उत्तर लिहून ती चिठ्ठी गुरुजींच्या आसनासमोर ठेवणे

शेवटी त्या तरुणाने सांगितले, ‘‘मी हसलो. माझी चूक झाली; कारण चिठ्ठीतील वाक्ये मला पटली नाहीत. खरे असे आहे की, इथे ना मन आहे, ना डाग आहेत, ना आरसा आहे, इथे काहीच नाही. ‘इथे काहीच नाही’, हेच सत्य आहे. असे म्हणण्यासारखेही सत्य नाही; कारण इथे काहीच नाही. आता हे सांगायचे कसे ? आणि समजायचे कसे ?’’ इरेला पेटलेल्यांना आणखी कुणाचा तरी अपमान होणे हवेच होते. त्यांनी या तरुणाने सांगितलेले एका चिठ्ठीवर लिहिले आणि रात्री पुन्हा गुरुजींच्या आसनाच्या समोर चिठ्ठी नेऊन ठेवली.

९. गुरुजींनी चिठ्ठी वाचून थेट त्या तरुणाकडे जाणे आणि त्याला उत्तराधिकार्‍याचे दायित्व सांभाळण्यास सांगणे

दुसर्‍या दिवशी गुरुजींनी ती चिठ्ठी वाचली आणि ते म्हणाले, ‘‘ही चिठ्ठी लिहिणारा कोण ?’, हे तुम्ही मला सांगायची आवश्यकता नाही.’’ गुरुजी थेट उठून भात कांडणार्‍याकडे आले आणि म्हणाले, ‘‘मला ठाऊक आहे. या मठाच्या पसार्‍यात हे केवळ तूच लिहू शकतोस. आता तू सिद्ध झाला आहेस. हे उत्तराधिकार्‍याचे दायित्व तू सांभाळ. मी आता चाललो.’’ तरुणाने गुरुजींचे पाय धरले. तो म्हणाला, ‘‘हो. माझे चुकले. तुम्ही मला सांगितले होते. मी तेवढेच करायला पाहिजे होते; पण अशी घटना झाली. मी असे करणार नाही.’’ गुरुजी म्हणाले, ‘‘नाही. हे नियतीने ठरवलेले होते. तुला ‘सत्य काय आहे ?’, ते कळलेले आहे. ‘इथे काहीच नाही’, हेच खरे सत्य आहे. आता हा पसारा तूच सांभाळ.’’

१०. गुर्वाज्ञा म्हणून त्या तरुणाने मठाचे दायित्व घेणे आणि ‘अहंविरहित कर्म करायला हवे’, ही शिकवण देऊन शिष्यांना घडवणे

गुर्वाज्ञा म्हणून त्या तरुणाने मठाचे दायित्व घेतले. त्याने स्वतःचे जे शिष्य सिद्ध केले, ते एका साध्या शिकवणीवर होते. ते म्हणायचे, ‘‘जर तुम्ही भात कांडत असाल, तर असा भात कांडा की, भात कांडण्याची प्रक्रिया राहू दे. तुम्ही राहू नका. तुम्ही खड्डा खोदत असाल, तर असा खड्डा खोदा की, खड्डा खोदण्याची प्रक्रिया राहू दे. तुम्ही राहू नका. झाडांना पाणी घालण्याची प्रक्रिया राहू दे. तुम्ही राहू नका. तुम्ही रहाता, म्हणजे तुमचा अहं रहातो. तुमचे अस्तित्व रहाते. सेवा करणार्‍याने हे लक्षात ठेवले पाहिजे.’’

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद. (एप्रिल २०२६)