अष्टविनायकाच्या इतिहासातील अद्वितीय आणि सुवर्णक्षण !

पुणे – मोरगाव येथील श्री मयुरेश्वर गणपति मंदिरात ऐतिहासिक अनमोल ठेवा उजेडात आला आहे. राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाच्या वतीने मंदिरात चालू असलेल्या संवर्धन आणि जीर्णोद्धार यांच्या कार्यात अत्यंत दुर्मिळ असे २ प्राचीन ‘ताम्रपट’ (तांब्याच्या पट्ट्यांवरील शिलालेख) सापडले आहेत. अष्टविनायक मंदिरांच्या प्रदीर्घ इतिहासात अशा प्रकारे गर्भगृहातून थेट ताम्रपट किंवा शिलालेख हाती लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वाहाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यशासनाच्या १४८ कोटी रुपयांच्या ‘अष्टविनायक विकास आणि संवर्धन आराखड्या’च्या अंतर्गत सध्या मोरगाव मंदिराचे काम चालू आहे. या अंतर्गत मंदिराच्या मुख्य गाभार्यात श्रींच्या मूर्तीभोवती नंतरच्या कालखंडात लावलेले ग्रॅनाईट, आधुनिक संगमरवर आणि तांब्या-कांसाचे प्रभावळ (तेजोमंडप/अलंकारिक कमान) शास्रोक्त पद्धतीने काढण्याचे काम चालू होते. हे आधुनिक आवरण हटवताच, त्यामागे दडलेली मंदिराची मूळ देखणी प्राचीन दगडी कमान समोर आली. या दगडी कमानीच्या आत अत्यंत सुरक्षितपणे जडवलेले २ प्राचीन ताम्रपट तज्ञांच्या पथकाला आढळून आले.
Two Ancient Copper Plate Inscriptions Discovered at Shri Mayureshwar Temple, Morgaon
A unique and golden moment in the history of the Ashtavinayak temples
Archaeological Survey of India (ASI) experts to assist in deciphering the script#HinduTemples #GloriousHistory pic.twitter.com/rSeAt4sTAi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2026
ताम्रपटांमधील ऐतिहासिक संदर्भ आणि कालखंड !
प्राथमिक निरीक्षणांनुसार सापडलेल्या २ ताम्रपटांपैकी एका ताम्रपटावर शके १५४७ (वर्ष १६२५) आणि दुसर्या ताम्रपटावर शके १६३२ (वर्ष १७१०) असा स्पष्ट कालखंड नोंदवलेला आहे.
या ऐतिहासिक ताम्रपटांमध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचे संदर्भ आहेत !
या ताम्रपटांमध्ये मंदिराचे मूळ बांधकाम, नूतनीकरण आणि विविध कालखंडात भक्त आणि राजे यांनी दिलेल्या देणग्यांची विस्तृत नोंद, पुण्याजवळील चिंचवड येथील गाणपत्य संप्रदायाचे महान संत श्रीमंत मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिराच्या मूळ रचनेचा आणि विस्ताराचा थेट उल्लेख, तसेच दगडकाम करणारे त्या काळातील प्रसिद्ध कारागीर नारायणदेव आणि त्यांच्या वास्तू-कौशल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.
गाणपत्य संप्रदायाची प्राचीनता सिद्ध होणार
पुण्यातील सुप्रसिद्ध इतिहासतज्ञ आणि ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे सचिव पांडुरंग बलकवडे यांनी या शोधाचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले आहे. ते म्हणाले की, ताम्रपट हे इतिहासाचे सर्वांत विश्वसनीय आणि समकालीन लिखित दस्तऐवज मानले जातात; कारण ते ज्या काळात घटना घडली, त्याच काळात कोरले जातात. श्री मयुरेश्वर मंदिराच्या गर्भगृहातून मिळालेले हे पुरावे महाराष्ट्र आणि गाणपत्य संप्रदायाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि वास्तूकलेच्या इतिहासाला अधिक समृद्ध करणारे आहेत.
मराठा साम्राज्याचा काळ आणि इतिहासाची पुनर्रचना !
पुण्यातील पेशवे हे गणपतीचे भक्त असल्याने, मोरगावमधील सध्याचे मंदिर पेशवे काळात बांधले गेले असावे, असे मानले जाते. तथापि या शोधामुळे मंदिराचा काळ आणखी मागे, म्हणजेच मराठा काळापर्यंत निश्चित करण्यास साहाय्य होऊ शकते. पेशवे वर्ष १७१३ नंतरच मराठा साम्राज्याचे प्रमुख म्हणून सत्तेवर आले.
परिसराच्या ऐतिहासिक जतनाला प्राधान्य
‘अष्टविनायक संवर्धन आराखडा’ या राज्यशासनाने हाती घेतलेल्या १४८ कोटी रुपयांच्या विशेष संवर्धन मोहिमेत ८ पैकी ७ स्वयंभू मंदिरांचा कायापालट केला जात आहे. यामध्ये मोरगाव, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, ओझर आणि रांजणगाव या मंदिरांचा समावेश आहे. जुन्नर जवळील लेण्याद्री मंदिर हे डोंगरातील गुहेत असून ते ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा’च्या अखत्यारीत असल्याने या मोहिमेत समाविष्ट नाही. अष्टविनायक यात्रेचा आरंभ आणि सांगता मोरगाव येथूनच होत असल्याने या परिसराच्या ऐतिहासिक जतनाला प्राधान्य दिले जात आहे.
लिपीचा उलगडा करण्यासाठी ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा’चे साहाय्य घेणार
सापडलेले ताम्रपट हे देवनागरी आणि संस्कृत लिपीत कोरलेले आहेत. या संपूर्ण लिखाणाचे सखोल वाचन करण्यासाठी राज्य पुरातत्व विभाग आता ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण’च्या तज्ञांचे साहाय्य घेणार आहे.
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क