श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतून भक्तीसत्संगात स्रवलेले अमृतकण !
‘आपल्याला लाभलेला मनुष्यदेह ही ईश्वराची एक अमूल्य देणगी आहे. जेव्हा काळानुसार वाढते वय, व्याधी किंवा अन्य कारणे यांमुळे देहस्थितीमध्ये पालट होतात, तेव्हा देहाला काही मर्यादा येतात. त्या वेळी स्वाभाविकपणे आपले मन डगमगते; परंतु अशा वेळी मनाची स्थिती डळमळीत न होऊ देता गुरूंच्या शिकवणीनुसार या शारीरिक स्थितीचा सकारात्मकतेने स्वीकार करायला हवा. ‘स्वीकारणे’ हे केवळ विचारांच्या स्तरावर न ठेवता तो आपला ‘सहज स्वभाव’ बनायला हवा आणि स्वतःची शारीरिक स्थिती सहजपणे कशी स्वीकारावी ?’, याविषयी सध्या विशेष भक्तीसत्संग शृंखलेद्वारे साधकांना दिशादर्शन प्राप्त होत आहे. त्यातील काही महत्त्वपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

१. ‘मनुष्याला त्याच्या प्रारब्धानुसार शारीरिक व्याधी होणे’, हे भगवंताचे नियोजन असते !
आपला देह आणि त्याला होणारे आजार हे आपल्या ‘प्रारब्धकर्मां’वर अवलंबून असतात. ज्याप्रमाणे एखादे वस्त्र जुने झाले की, ते फाटते किंवा त्याला ठिगळ लावावे लागते, त्याचप्रमाणे देहाचे आहे. ‘आपल्या पूर्वजन्मांतील कर्मांनुसार आपल्याला मनुष्यदेह केव्हा द्यायचा ? देहाला कोणत्या व्याधी किंवा दुखापती होणार ?’, हे केवळ आणि केवळ भगवंताचे नियोजन असते. येथे साधकांनी लक्षात घ्यावे, ‘देह हे केवळ साधन आहे आणि आपण आत्मा आहोत. जेव्हा आपण स्वतःच्या शारीरिक स्थितीचा द्वेष करतो किंवा त्याविषयी गार्हाणे करतो, तेव्हा आपण नकळतपणे भगवंताच्या नियोजनावर अविश्वास दाखवत असतो.’
२. प्रारब्ध भोगतांना भगवंत आपल्या समवेत सतत असतो !
‘मानवी जीवनातील सुख-दुःख आणि शारीरिक व्याधी ही आपल्या पूर्वकर्मांची फळे (प्रारब्ध) असतात. ती भोगून संपवणे, हाच मुक्तीचा एकमेव मार्ग आहे. प्रारब्धभोग टाळता येत नाहीत; पण ‘ते कसे स्वीकारायचे ?’, हे आपल्या हातात आहे. भगवंत प्रत्येक वेळी आपल्या व्याधी दूर करीलच, असे नाही; कारण ते आपल्या प्रारब्धानुसार असते; पण आपल्या दुःखात तो आपल्याला कधीच, अगदी क्षणभरासाठीही एकटे सोडणार नाही, हे मात्र निश्चित !
३. आजारपणाकडे ईश्वराच्या अनुसंधानात रहाण्याची एक संधी म्हणून पहाण्याचे महत्त्व !
संत तुलसीदास यांनी एका दोह्यात प्रारब्धासंदर्भात अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
प्रारब्ध पहले रचा, पीछे रचा शरीर ।
तुलसी चिन्ता क्यों करे, भज ले श्री रघुबीर ।।
अर्थ : शरिराची रचना होण्यापूर्वीच विधात्याने त्याचे प्रारब्ध रचले आहे. त्यामुळे भविष्याची किंवा प्रारब्धाची चिंता का करावी ? हे मानवा, तू केवळ त्या श्रीरघुविराचे, म्हणजे भगवंताचे नामस्मरण कर. तोच तुला या भवसागरातून आणि प्रारब्धाच्या फेर्यांतून सुखरूप पार करील.
संत तुलसीदासांच्या या शिकवणीप्रमाणे ‘शारीरिक त्रास हे माझ्या कर्मांचे फळ असून माझा भगवंत माझ्या समवेत आहे’, असा भाव ठेवला, तर वेदना सुसह्य होतात. ‘आजारपण हा दुःखद प्रसंग नव्हे, तर ती ईश्वराकडे जाण्याची, ईश्वराच्या अनुसंधानात रहाण्याची एक संधी आहे’, या भावाने ते शांतपणे स्वीकारले, तर भगवंत स्वतः आपल्यावर कृपा करतो आणि आपल्याला जन्म-मरणाच्या फेर्यांतून मुक्त करतो.
४. देहप्रारब्धाविषयी प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण !
४ अ. देह प्रारब्धावरी सोडा । चित्त चैतन्यासी जोडा ।।
‘शारीरिक त्रास होत असतांनाही भक्तीत खंड पडू न देणे आणि मन ईश्वरापासून ढळू न देणे’, हेच खर्या भक्ताचे लक्षण आहे. आजारपण, वृद्धत्व आणि वेदना हा ‘देहधर्म’ आहे. जोपर्यंत प्रारब्ध आहे, तोपर्यंत देहाला या अवस्थांतून जावेच लागते; मात्र ज्याची बुद्धी आत्मस्वरूपात स्थिर झाली आहे, त्याला देहाच्या वेदना स्पर्श करू शकत नाहीत. तो सदैव आत्मानंदातच लीन असतो. ही अवस्था म्हणजे देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाणे. आपण देहाने आजारी असलो, तरी मनाने नेहमी ईश्वराशी जोडलेले असायला हवे.
४ आ. माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याची शक्ती मागा ! : प.पू. भक्तराज महाराज यांच्या या शिकवणीप्रमाणे साधकांनी योग्य प्रार्थना करण्यास शिकावे. देवाला ‘देवा, माझा त्रास, माझे दुःख दूर कर’, असे सांगण्यापेक्षा ‘देवा, मला हे दुःख सहन करण्याची आणि यात सतत साधनारत रहाण्याची शक्ती दे’, अशी प्रार्थना करावी अन् ही प्रार्थना केल्याने ‘भगवंत आपल्याला त्रास सहन करण्याची शक्ती कशी प्रदान करतो ?’, याची अनुभूती घ्यावी.
५. शारीरिक व्याधी स्वीकारल्यास मनाचा संघर्ष संपून अंतर्मनात खर्या आनंदाचा आणि समाधानाचा उगम होतो !
‘शारीरिक व्याधींमध्ये आनंदी कसे रहावे ?’, याचे उत्तर ‘स्वीकारण्याच्या वृत्ती’त दडले आहे. जेव्हा आपण त्या व्याधी पूर्णपणे स्वीकारतो, तेव्हा केवळ आनंद उरतो. शारीरिक व्याधीमुळे आपला देहबुद्धीशी असलेला संबंध तुटण्यास साहाय्य होते. ज्या क्षणी आपण स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार करतो, त्या क्षणी मनाचा संघर्ष संपतो. मनाचा संघर्ष संपल्यानंतरच अंतर्मनात खर्या आनंदाचा आणि समाधानाचा उगम होतो.
आजारपणात शारीरिक शक्ती क्षीण होते. अशा वेळी हतबल होण्यापेक्षा ‘हीच खर्या अर्थाने शरणागती वाढवण्याची संधी आहे’, असा भाव ठेवावा. कर्तेपणाने संघर्ष करत राहिल्यास आपली सर्व ऊर्जा त्या व्याधीशी लढण्यातच व्यर्थ जाते; पण वेदना काही न्यून होत नाहीत. उलट कर्तेपणा त्यागल्यास आणि संघर्ष थांबवल्यास आपली ऊर्जा भगवंताशी जोडली जाते.
साधकांनो, ‘आपले प्रारब्ध कितीही मोठे असले, तरी आपल्यात शरणागतभाव असल्यास भगवंत आपल्याला सदैव साहाय्य करून आपल्या त्रासांचे निवारण करतो’, हे लक्षात घ्या अणि प्रारब्धाच्या दुःखापेक्षा शरणागती वाढवा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) (१२.६.२०२६)
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : योग-आयुर्वेद
इतरांचा विचार करणारे आणि सेवाभावी वृत्ती असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. प्रताप वंका !
साधक नामजप करत असतांना त्याला भगवान शिवाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती
मुलांवर साधनेचे संस्कार करणारे आणि शेवटपर्यंत देवाच्या अनुसंधानात असणारे बेळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. रामू गणपति मिसाळ (वय ६६ वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !