सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी यांची सेवा करत असतांना दाते कुटुंबियांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

‘७.६.२०२४ ते २२.१२.२०२५ या कालावधीत सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी (वय ९२ वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना ‘त्यांच्या प्राणशक्तीवहनातील अडथळा शोधून नामजप कोणता करायचा ?’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आम्हाला सांगत असत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी कृतीतून, शब्दांतून आणि शब्दातीत शिकवलेली सूत्रे आम्ही अत्यंत कृतज्ञतापूर्वक मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ‘सर्वांना शिकता यावे’, अशी असलेली तळमळ

१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सद्गुरु दातेआजींसाठी नामजपादी उपाय शोधण्यासाठी त्यांच्या खोलीत जातांना समवेत इतर साधकांना घेऊन जाणे : ‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले)‘सद्गुरु दातेआजींसाठी नामजपादी उपाय कोणते करायचे ?’, हे सांगण्यासाठी खोलीत येत असत. तेव्हा  ‘सद्गुरु आजींसाठी नामजपादी उपाय केल्यावर त्यांच्या शारीरिक स्थितीत काय पालट जाणवतो ? त्यांच्यात कशी सुधारणा होते ?’, याविषयी शिकण्यासाठी ते वेगवेगळ्या साधकांना त्यांच्या समवेत येण्यास सांगत असत.

१ आ. आधुनिक वैद्यांना सद्गुरु दातेआजींच्या स्थितीचा अभ्यास करायला सांगणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सद्गुरु दातेआजी यांच्यासाठी नामजपादी उपाय केल्यावर सद्गुरु दातेआजींच्या शारीरिक स्थितीत काय पालट जाणवतो ? कोणती सुधारणा होते ?’, याचा अभ्यास करायला साधक आधुनिक वैद्य लिंदा बोरकर, रूपाली भाटकार, दुर्गेश सामंत आणि मनोज सोळंकी यांना सांगत असत.

एकदा समाजातील एक आधुनिक वैद्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. तेव्हा गुरुदेवांनी त्यांनाही सद्गुरु आजींना भेटायला सांगितले. त्या वेळी गुरुदेव स्वतःही आले आणि त्यांनी ‘सद्गुरु आजींना होणारे त्रास दूर होण्यासाठी प्राणशक्तीवहनानुसार येणारे अडथळे कसे शोधायचे ?आणि कोणते नामजपादी उपाय करत आहोत’, याविषयी पुष्कळ उत्साहाने सांगितले, तसेच गुरुदेवांनी त्या आधुनिक वैद्यांना ‘काही प्रश्न असल्यास विचारा’,  असेही सांगितले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१ इ. संतांना घडवणे : काही वेळा एक संत सद्गुरु दातेआजींसाठी नामजपादी उपाय सांगत असत. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नामजप सांगायचे. तेव्हा काही वेळा दोघांनी सांगितलेला नामजप वेगवेगळा असायचा. याविषयी एकदा त्या संतांनी ‘हा भेद कसा झाला ?’, असे विचारले. त्यावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितले, ‘‘आध्यात्मिक पातळीत भेद आहे; म्हणून नामजप वेगळा येतो. जसे आपण रुग्णाईत असतो, तेव्हा आपण प्रथम जवळच्या ‘एम्.बी.बी.एस्.’ डॉक्टरांकडे जातो आणि ते सांगतील, ते औषध घेतो. तेव्हा आपण आपल्या घरापासून लांब असलेल्या आणि अधिक शिकलेल्या, म्हणजे ‘एम्.डी.’ झालेले किंवा त्याहूनही अधिक शिकलेल्या तज्ञ आधुनिक वैद्यांकडे (स्पेशालिस्ट डॉक्टरकडे) जाण्याची वाट पहात नाही. तसेच हे आहे.

आपल्याला त्रास व्हायला लागल्यावर आपण ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’नुसार नामजप शोधून उपाय करायला हवेत. त्रास अधिक होत असल्यास संतांना नामजप विचारावा. संतांनी सांगितलेला नामजप साधकांनी शोधून काढलेल्या नामजपापेक्षा अधिक परिणामकारक असतो.’’

१ ई. ‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे साधकांनी सद्गुरु दातेआजींच्या आध्यात्मिक स्थितीचा अभ्यास करणे : सौ. श्वेता क्लार्क आणि श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ५६ वर्षे) हे दांपत्य ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आध्यात्मिक संशोधन करतात. त्यांनी सद्गुरु दातेआजींच्या हाता-पायांचे ठसे घेणे, ‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे त्यांचे ‘रिडिंग’ घेणे, या माध्यमातून सद्गुरु दातेआजींच्या आध्यात्मिक स्थितीचा अभ्यास केला.

१ उ. वर्ष २०२३ मध्ये ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’निमित्त रामनाथी आश्रमात सनातनचे सद्गुरु आणि संत आले होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना (सद्गुरु आणि संत यांना) सद्गुरु दातेआजींविषयी सर्व माहिती देण्यास आम्हाला सांगितले.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सद्गुरु दातेआजींना होत असलेल्या त्रासाविषयी सांगितल्यावर सद्गुरु दातेआजींचा त्रास लगेच न्यून होणे

अ. एकदा सद्गुरु आजींच्या काखेत आणि छातीवर पुष्कळ प्रमाणात रक्त साकळले होते. तेथील जागा पूर्ण काळी झाली होती. प.पू. गुरुदेवांना याविषयी सांगितल्यावर एका दिवसात त्यात ५० टक्के सुधारणा झाली आणि २ दिवसांत तो डाग पूर्ण गेला.

आ. एकदा सद्गुरु आजींच्या हातावरील त्वचा निघू लागली होती. प.पू. गुरुदेवांना याविषयी सांगितल्यावर दुसर्‍याच दिवशी सद्गुरु आजींच्या हातावरील त्वचा निघणे बंद झाले.

३. सर्वांवर प्रीतीचा वर्षाव करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सौ. ज्योती दाते

३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सद्गुरु दातेआजींना खिडकीतून दर्शन देणे : ४.५.२०२४ या दिवशी सद्गुरु आजींना अर्धांगवायूचा झटका आला. त्या आधी अनुमाने २ मास आश्रमाच्या इमारतीच्या बाजूच्या मोकळ्या जागेत आसंदीत बसलेल्या सद्गुरु आजींना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांच्या खोलीतील खिडकीतून दर्शन देत असत.

३ आ. सद्गुरु आजींना अत्यंत प्रेमाने हाक मारणे आणि खोलीत उपस्थित असलेल्या साधकांकडे वात्सल्यमय दृष्टीने पहाणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांची प्राणशक्ती अल्प असतांनाही सद्गुरु आजींसाठी नामजपादी उपाय सांगण्यासाठी सद्गुरु आजींच्या खोलीत येत असत. ते खोलीत आल्यावर सद्गुरु आजींना अत्यंत प्रेमाने हाक मारत असत. ते खोलीत उपस्थित असलेल्या साधकांकडे वात्सल्यमय दृष्टीने पहात असत. ते पाहून आमची भावजागृती व्हायची.

३ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘कुणाला काही शंका आहेत का ?’ असे विचारून साधकांच्या शंकांचे निरसन करायचे.

३ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सद्गुरु आजींसाठी नामजपादी उपाय सांगण्यासाठी खोलीत येणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सद्गुरु आजींसाठी आरंभी दिवसातून ३ वेळा नामजपादी उपाय सांगितले. काही कालावधीनंतर ते दोन वेळा नामजपादी उपाय सांगत होते. २८.७.२०२४ या दिवसापासून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ‘दिवसातून एकदा नामजपादी उपाय सांगण्यासाठी येईन’, असे सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळी गुरुदेवांनी विचारले, ‘‘सद्गुरु आजींना काही त्रास होत नाही ना ?’’

डॉ. नरेंद्र दाते

३ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सांगत, ‘‘सद्गुरु आजी केवळ तुमच्या आजी नाहीत. त्या आपल्या सर्वांच्या आहेत. सद्गुरु आजींना किती त्रास सहन करावे लागतात !’’

३ ऊ. सद्गुरु आजींची सेवा करण्यासाठी आलेल्या त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करणे : आम्ही कुटुंबीय सद्गुरु आजींची सेवा करण्यासाठी रामनाथी आश्रमात राहिलो होतो. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘आमची सोय नीट होत आहे ना, खोलीत कपडे वाळत घालण्यास जागा पुरेशी आहे ना, आम्हाला काही अडचण नाही ना’, अशी आमची विचारपूस सतत करत असत.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अहंशून्यता दर्शवणारे प्रसंग

अ. गुरुदेवांनी आम्हाला विचारले, ‘‘आधी मी दिवसातून तीन वेळा नामजपादी उपाय सांगण्यासाठी यायचो. नंतर दोन वेळाच येऊ लागलो. आता ‘मी एकदाच आलो, तर तुम्हाला सगळ्यांना चालेल ना ?’’

आ. गुरुदेव म्हणाले, ‘‘सद्गुरु आजींचे नाव जगात होणार आहे. असा रुग्ण याआधी कुणी पाहिला नसेल. ‘सद्गुरु आजींसारखी रुग्णाची स्थिती झाली, तर काय काय करावे लागते ?’, हे मला सद्गुरु आजींमुळे समजले.’’

इ. एकदा गुरुदेवांनी आम्हाला विचारले, ‘‘चाकाच्या आसंदीत बसून रुग्णाला तपासण्यासाठी येणारा माझ्यासारखा डॉक्टर तुम्ही कधी पाहिला आहे का ?’’

ई. सच्चिदानंद परब्रह्म डाॅ. आठवले खोलीतून बाहेर जातांना दाराजवळ थांबून आम्हा कुटुंबियांना नमस्कार करून जात असत.

उ. एखाद्या दिवशी गुरुदेवांना सद्गुरु आजींच्या खोलीत यायला उशीर झाल्यास गुरुदेव म्हणत, ‘‘मला उठवत नव्हते. आताच उठलो. मला उशीर झाल्यामुळे तुम्हाला त्रास झाला.’’

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्वव्यापी, सर्व शक्तीमान आणि सर्वज्ञ असूनही त्यांनी चांगल्या गोष्टींचे श्रेय इतरांना देणे आणि स्वतः नामानिराळे रहाणे

५ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सद्गुरु आजींच्या मनात विचार घालून त्यांना उत्तरही देणे आणि याचे श्रेय मात्र सद्गुरु दातेआजींना देणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पूर्वी एकदा सद्गुरु आजींना ‘नामजपादी उपाय चालू ठेवायचे कि नाही’, असे सूक्ष्मातून विचारले. त्यानंतर गुरुदेव म्हणाले, ‘‘सद्गुरु आजी काहीच सांगत नाहीत.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘तुम्हीच काय करायचे ते ठरवा.’ तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘पू. आजींना आता कोणतीच स्वेच्छा राहिली नाही. आता आपल्यालाच ठरवावे लागेल.’’

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, हे साक्षात् श्रीविष्णुस्वरूप आहेत. तेच सद्गुरु दातेआजींच्या मनात विचार घालतात आणि तेच त्यांना उत्तरही देतात. त्यानंतर ‘सद्गुरु आजींना स्वेच्छा नाही’, असे म्हणून श्रेय मात्र त्यांना देतात’, असे आम्हाला वाटले.

५ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे दाते कुटुंबीय सद्गुरु दातेआजींची सेवा करू शकणे, तरीही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रेय कुटुंबियांनाच देणे : एकदा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव म्हणाले, ‘‘तुम्ही सर्व असल्यामुळे सद्गुरु आजींची सेवा होऊ शकते. मी केवळ प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधून न्यास आणि नामजपादी उपाय सांगतो. शेष सर्व तुम्ही करता.’’

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव सर्वांना शक्ती देतात. त्यांनीच आमच्याकडून नामजपादी उपाय आणि सद्गुरु दातेआजींची सेवा करून घेतली आणि श्रेय मात्र आम्हा कुटुंबियांना दिले.

५ इ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव सर्वव्यापी, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ आहेत, तरीही ते ‘मला सद्गुरु दातेआजींकडून अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत’, असे म्हणत असत.

५ ई. एकदा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव म्हणाले, ‘‘तुम्ही मला नामजप कोणता करायचा ?’, हे विचारता. मी देवाला विचारून तुम्हाला सांगतो.’’

५ उ. ‘सद्गुरु दातेआजींना तनोटमातेचे चैतन्य मिळते’, असे सांगणे : सद्गुरु आजींचे वास्तव्य होते. त्या खोलीच्या खिडकीतून आश्रमाच्या परिसरातील तनोटमातेचे मंदिर दिसत होते. एकदा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव म्हणाले, ‘‘मी तनोटमातेला प्रार्थना करतो, ‘पू. दातेआजींना बरे वाटू दे’ आणि तनोटमातेचे चैतन्य त्यांच्या खोलीपर्यंत येत आहे’, असे मला जाणवते.’’ ते स्वतःकडे कर्तेपणा घेत नसत.

६. सद्गुरु दातेआजींच्या आजारपणात कुटुंबियांना सकारात्मक ठेवणे

७.६.२०२४ पासून अनुमाने १८ मास सद्गुरु आजी गंभीर आजारी आणि बेशुद्धावस्थेत होत्या. त्या कालावधीत त्यांचे वजन हळूहळू न्यून होत होते. त्या पुष्कळ कृश झाल्या होत्या. त्या परिस्थितीतही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आम्हाला सद्गुरु आजींच्या प्रकृतीविषयी अत्यंत सकारात्मक ठेवत होते. त्यामुळे आम्ही सर्व कुटुंबीय स्थिर राहून आणि आनंदाने सद्गुरु दातेआजींची सेवा करू शकलो.

आमच्या अल्पमतीनुसार लक्षात आलेली ही सूत्रे अंशात्मकच आहेत. ‘हे सर्व अनुभवण्याची आणि शिकण्याची अमूल्य संधी आम्हा दाते कुटुंबियांना दिली’, त्याबद्दल आम्ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– डॉ. नरेंद्र मोहन दाते (सद्गुरु दातेआजी यांचा मोठा मुलगा, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६७ वर्षे ) आणि सौ. ज्योती नरेंद्र दाते (सद्गुरु दातेआजी यांची मोठी सून, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

(१७.४.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक