‘वर्ष १९९९ पासून सौ. पूनम प्रभुदेसाई यांनी साधनेला आरंभ केला. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यावर त्यांना एका कठीण प्रसंगात होणारा मानसिक ताण दूर झाला. सौ. प्रभुदेसाई यांच्या घरी ३ मास सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या समवेत डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले वास्तव्यास होते. या दोघांच्या सत्संगातून प्रभुदेसाई कुटुंबाला पुष्कळ प्रेम मिळाले. ‘गुरुदेवांच्या अपार प्रीतीमुळे आमचे सर्व कुटुंब साधनेत आले’, अशी त्यांची श्रद्धा आहे. सौ. प्रभुदेसाई यांनी निवृत्तीनंतर दायित्व घेऊन सेवा केल्या. सौ. प्रभुदेसाई यांनी साधनेचे प्रयत्न करून २९.३.२०२६ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. या लेखात आपण सौ. प्रभुदेसाई यांचा साधनाप्रवास जाणून घेऊया.

१. संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वीची साधना
‘माझा जन्म कुंडई येथे एका मध्यम सारस्वत कुटुंबात झाला. माझ्यावर पूर्वीपासूनच धार्मिक संस्कार होते. माझी आई पुष्कळ धार्मिक होती. ती कर्मकांडातील सर्व गोष्टी सोवळे-ओवळे पाळून करत असे. तिची देवावर पुष्कळ श्रद्धा होती. ती सकाळी आणि संध्याकाळी श्री व्यंकटेशस्तोत्र अन् श्री गणपतिस्तोत्र म्हणत असे. तिचे हेच संस्कार माझ्यावरही झाले. माझ्या सासरीही धार्मिक वातावरण होते. माझी देवावर पूर्ण श्रद्धा होती. ‘आपल्या सर्व इच्छा देवच पूर्ण करतो’, असा माझा दृढ विश्वास होता.
२. ईश्वरी नियोजनानुसार सनातन संस्थेच्या संपर्कात येणे
वर्ष १९९८ – १९९९ च्या कालावधीत आमच्या जीवनात एक कठीण प्रसंग घडला. त्यामुळे आमचा देवावरील विश्वास आणि श्रद्धा यांना तडा गेला. आम्ही हतबल झालो. ईश्वरी नियोजन वेगळेच होते. या कठीण प्रसंगात सनातनचे साधक माझ्या संपर्कात आले. ते साधक मला म्हणाले, ‘‘सनातन संस्था ही अन्यायाविरुद्ध लढणारी संस्था आहे. आमचे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक आहे. त्याच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो.’’ त्यांनी मला साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार केले.
३. सत्संगाला जाण्यास आरंभ करणे
आम्ही रहात होतो तिथे जवळच असलेल्या लक्ष्मी मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने श्री. दुर्गादत्त नाडकर्णी सत्संग घेत असत. त्या सत्संगाला मी जाऊ लागले. नंतर मी माझी मोठी मुलगी (सौ. आरती कामत (पूर्वाश्रमीची कु. आरती प्रभुदेसाई) आणि मुलगा (श्री. गिरीजय) यांना समवेत घेऊन मी सत्संगाला जाऊ लागले. यजमानांना साधनेची आवड नव्हती; मात्र त्यांचा साधनेला विरोधही नव्हता.
४. सत्सेवेला आरंभ करणे
४ अ. घरी ग्रंथांच्या संबंधित सेवा चालू होणे : आरंभी सनातनच्या ग्रंथांची छपाई नेसाई, गोवा येथे होत होती. ग्रंथांचे ‘फोल्डिंग अन् बाईडिंग’ या प्रक्रिया मडकई येथे श्री. हेमंत काळे यांच्या घरी होत असत. मडकई येथे जाण्यासाठी आमच्या आजूबाजूला रहात असलेल्या साधकांना अडचण येत होती; म्हणून आमच्या घरी ग्रंथांच्या ‘फोल्डिंग’ची सेवा चालू झाली. साधक दुपारी सेवेला येत असत आणि संध्याकाळी घरी जात असत. आम्हाला या सेवेच्या माध्यमातून साधकांचा सत्संग मिळत होता.
५. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यावर जीवनातील कठीण प्रसंगावर मात करता येणे
एक साधक आम्ही रहात होतो त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येत असत. एकदा श्री महालसा मंदिराच्या सभागृहात सत्संग होता. त्या वेळी रात्री एक साधक आमच्या घरी रहायला आले होते. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘जीवनात येणारे प्रसंग आपल्या प्रारब्धानुसार घडतात.’’ साधनेत येण्यापूर्वी मी कर्मकांडानुसार इच्छित काम पूर्ण होण्यासाठी देवाचे करत असे. मला ‘अध्यात्म म्हणजे काय ?’, हे ठाऊक नव्हते. मी शिक्षिका असल्याने शाळेत मुलांना संतांविषयी माहिती देत असे; मात्र प्रत्यक्षात ‘संतांचे जीवन कसे असते ?’, ते मला ठाऊक नव्हते. हे सर्व मला सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यावर अनुभवायला मिळाले. हे अनुभवत असतांना ‘आम्ही त्या कठीण प्रसंगातून आणि मानसिक तणावातून बाहेर कधी पडलो’, हे मला समजलेच नाही.
६. घरात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयासाठी जागा देणे
वर्ष २००० मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय पणजी येथे कै. प्रभाकर वेरेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि कै. डॉ. (सौ.) मंगला वेरेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्या घरी होते. काही कारणास्तव कार्यालय दुसरीकडे स्थलांतरित करायचे होते. तेव्हा मडकई येथील श्री. हेमंत काळे यांनी केंद्रातील इतर साधकांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयासाठी जागा पहाण्यास सांगितले. एक दिवस वेलिंग येथील श्री. अनिल गावडे आमच्या घरी आले.
तेव्हा त्यांनी आम्हाला ‘‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयासाठी नवीन जागा शोधत आहोत’’, असे सांगितले. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘आमची वास्तू आहे. तुम्ही वापरू शकता.’’ त्या वेळी देवानेच माझ्याकडून ते बोलून घेतले होते. दुसर्या दिवशी श्री. हेमंतदादा आणि त्यांच्या पत्नी (सौ. अलका काळे) यांनी आमच्याशी सविस्तर बोलून घराचा आराखडा बनवला. ‘हा योगायोग होता कि ईश्वरी नियोजन होते’, हे त्या वेळी मला ठाऊक नव्हते. ‘ते ईश्वरी नियोजन होते’, हे आता माझ्या लक्षात येते. काही साधकांनी येऊन सर्व घराची पहाणी केली आणि पुढची सेवा चालू केली.
७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सहवासातील अनमोल क्षण !
१.४.२००१ या दिवशी गुरुदेवांचे आमच्या वास्तूत आगमन झाले. गुरुदेवांच्या समवेत डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले याही होत्या. आम्हाला दोघांचा सत्संग लाभला. आम्हाला त्यांच्याकडून पुष्कळ प्रेम मिळाले, जे आम्ही शब्दात मांडू शकत नाही. माझे यजमान (श्री. परशुराम प्रभुदेसाई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हे सेवेत तेवढे सहभागी होत नव्हते, तरीही गुरुदेव इतर साधकांकडून ‘त्यांनी अल्पाहार केला का ? त्यांनी महाप्रसाद घेतला का ?’, अशी यजमानांची विचारपूस करत असत.
गुरुदेव धामसे येथे जातांना ते आम्हाला समवेत नेत असत. सावंतवाडी येथील पू. भाऊ मसुरकर यांच्या अमृत महोत्सवाला गुरुदेव आम्हाला कुडाळ येथे घेऊन गेले होते. अशा विविध प्रकारे आम्ही गुरुदेवांची प्रीती अनुभवली. त्यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय फोंडा येथे स्थलांतरित झाले. तेथे यज्ञ किंवा एखाद्या संतांचे आगमन होणार असल्यास गुरुदेव आम्हाला साधकांकडून निरोप पाठवत असत. त्यांच्या या अपार प्रीतीमुळे आमचे सर्व कुटुंब साधनेत आले.
८. केलेल्या समष्टी सेवा
अ. मी माध्यमिक शाळेत शिक्षिका असल्याने मला समष्टी सेवेला वेळ देण्यास अडचण येत असे. मी सेवेसाठी पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे वर्ष २००२ मध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याला प्राधान्य दिले.
आ. आरंभी मी आणि माझा मुलगा (श्री. गिरीजय) पहाटे ५ वाजता दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करत होतो. आम्हाला ती सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळत होता. नंतर मी गुरुपौर्णिमेच्या निमित्त घरोघरी प्रसार करणे, प्रवचन आणि सत्संग घेणे, हिंदु राष्ट्र-जागृती सभा अन् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन यांतील सेवेत सहभागी होत असे. गुरुदेवांच्या कृपेने मला विविध सेवा करायला मिळाल्या.
इ. आता वयोमानामुळे मी बाहेर जाऊन सेवा करू शकत नाही. मला घरी बसून जेवढी सेवा करता येते, तेवढी करण्याचा मी प्रयत्न करते.
‘प.पू. गुरुदेवांनी माझ्याकडून हे लिखाण लिहून घेतले’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे), म्हार्दाेळ, गोवा. (२४.५.२०२६)
एकमेवाद्वितीयत्व असा हिंदु धर्म !
गुरुबोध
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असलेल्या आणि शारीरिक त्रासांतही नृत्यकलेतून आनंद मिळवणार्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
साधकांनो, मनातील अनावश्यक विचार न्यून करण्यासाठी प्रयत्न करून साधना आणि सेवा यांची फलनिष्पत्ती वाढवा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !