संपादकीय : हिंदुद्वेषाचे धोरण !

पुण्यातील गंज पेठेतील ज्योतिबा फुले यांचा वाडा हा ‘संरक्षित स्मारक’ म्हणून पुरातत्व विभागाने घोषित केला आहे. या वाड्याच्या आत वडाचे एक भले मोठे जुने झाड आहे. पुरातत्व विभागाने या वर्षी या वडाच्या झाडाची पूजा करण्यास बंदी घातली आहे. अर्थातच यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ‘फुले हे ‘सुधारणावादी’ विचारांचे असल्याने ‘बुरसटलेल्या’ विचारांची वटपूजा येथे नको’, असे आजच्या कथित सुधारणावाद्यांचे म्हणणे आहे.

येथील वडाच्या झाडाचा आकार आणि उंची पहाता हे झाड जुने असल्याचे लक्षात येते. कदाचित् ते फुले यांच्या आधीपासूनही तिथे असणार आहे. त्यामुळे या वडाच्या झाडाची पूजा गेली अनेक वर्षे होत असणार, अगदी फुले यांच्या पूर्वी, ते असतांना आणि फुले गेल्यानंतरही आतापर्यंत ! कदाचित् या झाडाची पूजा सावित्रीबाईंनीही केलेली असू शकते. असे वाटण्याचे एक कारण आहे. फुले यांच्या अस्थी त्यांच्या वाड्याच्या कुंपणाच्या आतच पुरल्या आहेत आणि तिथे त्यांची समाधी बांधली आहे. त्या समाधीवर सावित्रीबाईंनी तुळस लावल्याचा उल्लेख तिथे लावलेल्या पाटीवरच आहे. ही साम्यवाद्यांना मोठी चपराक आहे. ज्या सूत्रावरून साम्यवादी वटपौर्णिमेच्या पूजेला विरोध करत आहेत, त्यांनी त्यांच्या डोळ्यांत हे अंजन घालून घेतले पाहिजे की, फुले यांच्या समाधीवर तुळस लावणार्‍या सावित्रीबाई यांना काहीतरी तुळशीचे महत्त्व वाटले, म्हणून त्यांनी ती समाधीवर लावली. ‘सब्जा’ लावला नाही. बरं येथे येऊन वटपूजन करणार्‍या हिंदु भाविक महिला काही कचरा करत असतील आणि त्यामुळे संरक्षित (हेरिटेज) वास्तूच्या सौंदर्यात बाधा येत असेल, तर त्या संदर्भात सूचना देणे किंवा स्वच्छता करणे या उपाययोजना पुरातत्व विभाग करू शकतो; परंतु वर्षानुवर्षे ज्या झाडाचे श्रद्धास्थान म्हणून पूजन होत आहे, ते अचानक अशा प्रकारे एक सूचना काढून पूजन बंदच करणे, हे कितपत योग्य आहे ? कदाचित् पुण्याच्या सुधारणावादी पुरोगामी हिंदूंना याविषयी काही वाटणार नाही; कारण लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा विद्रोही ब्राह्मणद्वेषींनी काढून नेला, त्यानंतरही आजतागायत पुणे शांतच राहिले आहे. अटकेपार झेंडा फडकवणार्‍या ब्राह्मणी संस्कृतीचा किती द्वेष करावा, त्याची ही परिसीमा होती. आताही केवळ हिंदु धर्माला विरोधासाठी विरोध म्हणून अशा प्रकारे फुलेवाड्यातील वटपूजनावर बंदीची टूम निघाली आहे. सध्या शहरी हिंदूंच्या दैनंदिन जीवनात धर्माचरणाचा बराचसा अभावच असल्याने कुणी या घटनेलाही विशेष विरोध करणार नाही किंवा कुणी म्हणतील, ‘तेवढेच एक झाड आहे का ?’ प्रश्न या झाडाचा आहे, असे नाही, तर हिंदूंच्या धर्माचरणाला होणारा विरोध यातून लक्षकेंद्रित होत आहे आणि परंपरा अन् संस्कृती यांचे माहेरघर असलेल्या पुण्यात होत आहे.

 पुरातत्व विभागाचा हिंदुद्वेष !

एखादी अनधिकृत मजार किंवा थडगे उखडायला गेले, तर त्याला किती प्रचंड विरोध होतो ! त्यामुळे हिंदु धार्मिक श्रद्धास्थानांविषयी जागृत नसल्यानेच अशा प्रकारचा आदेश काढायचे पुरातत्व विभागाचे धाडस झालेले आहे. छत्रपतींच्या विविध गडांवरील अनधिकृत मजारी आणि थडगी यांच्याविषयी पुरातत्व विभागाने कधी अशा प्रकारचे आदेश काढलेले ऐकले नाहीत. गडांवरील अतिक्रमणांनी तेथील वहिवाट कायमची अडवली होती किंवा आहे; किंबहुना त्यावर मालकी हक्क सांगितला आहे. एक दिवसाच्या काही वेळच्या वटपूजनाने येथील वहिवाट तर अडवली जाणार नाही. मुख्य म्हणजे हा वाडा जर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत आहे, तर ‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते का विरोध करत आहेत ? पुरातत्व विभाग त्यांचे का ऐकत आहे ? गडांवरील अतिक्रमणांच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ वर्षानुवर्षे सांगत होते; पण पुरातत्व विभागाला ते अतिक्रमणही दिसले नाही आणि हिंदुत्वनिष्ठाची हाकही ऐकू आली नाही. ‘समता प्रतिष्ठान’चे ऐकून मात्र पुरातत्व विभागाने या वर्षी या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची विनंती केली आहे. मग ‘पुरातत्व विभाग आणि समता प्रतिष्ठान यांचे काय साटेलोटे आहे ?’, असाही एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

चार बोटे स्वतःकडेच !

‘पुराणवास्तूच्या ठिकाणी पाळण्यात येणार्‍या चालीरितींचे, वहिवाटीचे किंवा रूढींचे उल्लंघन होता कामा नये’, असा कायदा आहे. मग एका अर्थाने या पुराणवास्तूच्या ठिकाणी प्रतिवर्षी होणारे वटपूजन ही एक परंपरागत रूढीच आहे. तिचे उल्लंघन का होत आहे ? केवळ पुरोगाम्यांचा आकस आहे आणि त्यांना खुश करण्यासाठी म्हणून ? कायद्यानेच जायचे झाले, तर हिंदुत्वनिष्ठ हे सूत्र उपस्थित करू शकतात आणि पुरोगाम्यांचा डाव थेट त्यांच्यावरच उलटू शकतो. फुले यांच्या वंशजांनी म्हणे धार्मिक वास्तूचे पावित्र्य राखण्याकरता ही मागणी केली. प्रत्यक्षात वटपूजनाने या ठिकाणचे पावित्र्य वाढणार आहे, हे त्यांच्या समजण्याच्या पलीकडे आहे. त्यासाठी स्पंदने किंवा ‘ऑरा’ मोजणार्‍या एखाद्या पाश्चात्त्य वैज्ञानिक उपकरणाने त्यांना पूजेपूर्वीची त्या ठिकाणची स्पंदने आणि पूजेनंतरची स्पंदने मोजून दाखवली पाहिजेत. तरीही ‘कर्मकांडा’ला विरोध करणे’, हेच ध्येय असल्याचे त्यांनी सांगितल्याने, ते हे मान्य करणार नाहीत. ‘कर्मकांडे’ हे एक प्रकारचे वैज्ञानिक प्रयोगच आहेत’, हे आज पाश्चात्त्यांनी मान्य केले आहे. आज ‘सावित्री’बाई असत्या, तर त्यांनीही सती‘सावित्री’ची देण असलेले हे वटपूजन आणि त्याचे महत्त्व कदाचित् मान्य केले असते; पण हिंदुद्वेषाची झापडे लावलेल्यांना ते कसे कळणार ? शाळांमध्ये ‘सरस्वतीची प्रतिमा काढून तिथे सावित्रीबाईंची प्रतिमा बसवा’, अशी मागणी करणार्‍या याच हिंदुद्वेषींना ना सरस्वतीदेवीचे महत्त्व कळले, ना त्यांना सावित्रीबाई ओळखता आल्या, त्यांना केवळ ‘राजकारणासाठी द्वेष पसरवायचा एवढेच कळले’, असेच खेदाने म्हणावे लागेल. ‘सुधारणा’ म्हणजे तरी नेमके काय ? माणसाच्या गरजा तर त्याच रहातात.  एका व्हिडिओत फुले वाड्याच्या दाराला फुलांचा हार घातला आहे. हिंदु संस्कृतीचा इतका द्वेष आहे, तर हिंदु संस्कृतीत महत्त्वाचे मानला गेलेला हा तोरणसदृश हार तरी दरवाजावर का लावला आहे ?

कुठून कुठून म्हणून हिंदु संस्कृतीचा द्वेष कराल ? त्याची पाळेमुळे उखडणे केवळ अशक्य आहे. ती उखडायला गेले, तर हिंदुद्वेषी स्वतःच उखडले जातील. आज वटपूजनाला विरोध केला, उद्या सारसबागेला सार्वजनिक उद्यान ठरवून ‘तेथील श्री गणेशाची मूर्ती हटवा’ म्हणायलाही हे साम्यवादी, विद्रोही कमी करणार नाहीत आणि हिंदुत्वनिष्ठांनी जोरदार आवाज उठवल्याविना कुणी त्याची साधी नोंदही घेणार नाही !

सुधारणावादाच्या नावाखाली हिंदुद्वेषी धोरणे राबवणार्‍या साम्यवाद्यांना हिंदूंनी संघटितपणे विरोध केला पाहिजे !