संपादकीय : बंगालमधील कालचक्र !

पराकोटीच्या अहंकारी व्यक्तीला जागा दाखवण्याचे सामर्थ्य केवळ काळातच असते, हा इतिहास आहे. राजकारणात जे सत्तेच्या शिखरावर उन्मत्तपणे वागतात, त्यांना ‘उद्या आपल्याला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल’,  याची पुसटशीही कल्पना नसते. जेव्हा राज्यकर्ते सत्तेच्या माध्यमातून अन्याय आणि अत्याचार यांचा अतिरेक करतात, तेव्हा काळ स्वतः त्यांना लक्षात राहील, असा धडा शिकवत असतो. सध्या बंगाल राज्यात घडत असलेल्या घटना जणू याचीच साक्ष देत आहेत. सत्तेवरून पायउतार व्हावे लागलेल्या तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना सध्या रस्त्यावर ज्या प्रकारे जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, ते पहाता जनतेच्या मनातील खदखद दिसून येते. गेल्या १५ वर्षांपासून तृणमूल काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी सत्तेच्या बळावर आणि हिंसेच्या जोरावर हिंदूंचा अतोनात छळ केला, बांगलादेशी घुसखोरांना भारतात वसवले, विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, आज त्याच नेत्यांना जनआक्रोशाचा आणि अपमानाचा सामना करावा लागत आहे. बंगाली जनतेच्या मनात अन्यायाविरुद्धची जी चीड आहे, त्याची दाहकता राज्यातील विविध भागांत घडलेल्या ताज्या घटनांवरून स्पष्ट होते. कामारहाटी भागामध्ये तृणमूल काँग्रेसचे अत्यंत वजनदार नेते आणि ज्येष्ठ आमदार मदन मित्रा यांच्या वाहनावर संतप्त आंदोलकांनी अंडी फेकून अन् त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला. या प्रकरणाची व्याप्ती केवळ रस्त्यावरील आंदोलनापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर कोलकाता येथील पटुली पोलीस ठाण्याच्या परिसरातच तृणमूलचे नेते दासगुप्ता यांनासुद्धा अशाच प्रकारे अंडी फेकून मारण्यात आली. भूमी हडपणे आणि लोकांना धमकावणे या प्रकरणी त्यांच्यावर संतप्त लोकांनी राग काढला. यासह दास यांच्या निकटवर्तीय पदाधिकार्‍याकडे मोठ्या प्रमाणात आपत्कालीन साहाय्याची सामुग्री आढळून आल्याचाही राग लोकांनी त्यांच्यावर काढला. तृणमूलच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. शिक्षकभरती घोटाळ्यापासून विविध योजनांमधील अनियमितता, स्थानिक पातळीवरील आर्थिक गैरव्यवहार आणि सत्तेच्या जवळ असलेल्या व्यक्तींवर होणारे आरोप, यांमुळे तृणमूल काँग्रेसची प्रतिमा मोठ्या प्रमाणात खराब झाली. या भ्रष्टाचाराच्या विरोधातील धग अजूनही जनतेच्या मनात घर करून आहे. याचे उदाहरण म्हणजे श्यामपूर भागात ‘मनरेगा’ योजनेतील गैरव्यवहारावरून गावकर्‍यांनी तृणमूलचे नेते मन्ना यांना वेढा घालून खडसावले. खरेतर जनतेने ही रोखठोक भूमिका तेव्हाच घेतली असती, तर तृणमूल काँग्रेसचे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते एवढे उन्मत्त झाले नसते. या सर्व घटनांवरून जनतेच्या मनातील असंतोषाचा ज्वालामुखी कसा धगधगत आहे ?, हे लक्षात येते. अर्थात् कुठलीही हिंसा अजिबात समर्थनीय नाही. केवळ इतकेच सांगायचे आहे की, तृणमूलच्या नेत्यांना आज तेच भोगावे लागत आहे, जे त्यांनी पूर्वी केले आहे.

लोकशाहीत अशा प्रकारचा विरोध होणे, हे नवीन नाही. कोणत्याही सरकारला किंवा पक्षाला टीकेचा सामना करावाच लागतो. तथापि जेव्हा विरोध केवळ राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून न होता सामान्य नागरिकांच्या पातळीवरूनही उघडपणे केला जातो, तेव्हा ते अधिक गंभीर मानले जाते. बंगालमध्ये आज नेमके तेच घडतांना दिसत आहे. यावरून बंगालमधील जनतेच्या प्रतिक्रिया आता मतपेटीपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर प्रत्यक्ष रस्त्यावर दिसू लागल्या आहेत. राजकारणात जनमानसातील भावना हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो.

जे पेरले, ते उगवले !

बंगालच्या राजकारणाला प्रथमपासूनच हिंसेचा इतिहास लाभलेला आहे. डाव्या (साम्यवादी) आघाडीच्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ आणि जुलमी राजवटीत हिंसा हीच राज्य करण्याची कार्यपद्धत होती. ‘हम करे सो कायदा’ हे शब्दशः तेथे घडत होते. पुढे ममता बॅनर्जी यांनी साम्यवाद्यांच्या सत्तेला सुरुंग लावून स्वतःची सत्ता स्थापन केली. तेव्हा बंगालमधील सर्वसामान्य जनतेला मोठ्या परिवर्तनाची अपेक्षा होती; परंतु तृणमूलने साम्यवाद्यांच्या दोन पावले पुढे जाऊन जनतेत हिंसा आणि भय निर्माण करण्याची परंपरा कायम ठेवली. बंगालच्या मागील विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरू न देण्यापासून त्यांच्या घरांची जाळपोळ करण्यापर्यंत करता येईल तितका हिंसाचार केला. पुढे तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्यावर तर या हिंसाचाराने कहरच केला. विरोधी पक्षांच्या पराभूत उमेदवारांना गाठून त्यांना मारहाण करणे, अत्याचार करणे, त्यांच्या हत्या करणे आदी त्यांनी केले. सत्तेच्या अमर्याद अधिकारामुळे तृणमूलचे नेते अहंकारीच नव्हे, तर हिंसाचारी तृणमूल काँग्रेस कुणालाही जुमानत नसल्याचे पाहून काळाने चक्रे फिरवली. आज बंगालमध्ये सत्तांतरानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे हालहाल होतांना दिसत आहेत. ज्याप्रमाणे त्यांनी लोकांना त्रास दिला होता, तसाच त्रास आज ते भोगतांना दिसत आहेत. जे त्यांनी पेरले, तेच आज उगवले आहे. कौटिल्य अर्थशास्त्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ज्या राज्यामध्ये प्रजा नेहमी भयभीत आणि त्रस्त असते, तेथील सत्ताधिशांचे पतन निश्चित असते. अनाचारी आणि दुराचारी तृणमूल काँग्रेसच्या पतनाचे मूळ यात आहे.

बंगालला हिंसेच्या या दुष्टचक्रातून मुक्त करण्यासाठी आता सर्वच स्तरांवरून तातडीने, गांभीर्याने आणि कठोरतेने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. बंगालमध्ये नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचे दायित्व यामध्ये मोठे आहे. सर्वप्रथम सर्व गुन्हेगारांना सरकारने कारागृहात डांबले पाहिजे. गुन्हे करणार्‍यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई केली पाहिजे, घुसखोरांना बांगलादेशात हाकलले पाहिजे आणि धर्मांधांना वठणीवर आणले पाहिजे. सरकारने हे केले, तरच बंगालमध्ये कायद्याचे राज्य पुनर्स्थापित होऊ शकेल.

‘द बंगाल फाईल्स’मधून धडा घ्या !

राजकारणात मिळालेल्या पदाचा कधीही गर्व करू नये, असे म्हटले जाते. ज्या ममता बॅनर्जी एकेकाळी साम्यवाद्यांच्या अहंकारी सत्तेविरुद्ध उभ्या ठाकल्या, आज त्यांनाच जनतेच्या असंतोषाचा करावा लागणारा सामना, म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती आहे. या वास्तवातील ‘द बंगाल फाईल्स’मधून सर्वच पक्षांच्या राजकारण्यांनी वेळीच योग्य धडा घेतला पाहिजे. सत्तेचा अहंकार, गुंडगिरी, दडपशाही आदींचा जेव्हा अतिरेक होतो आणि त्यात सर्वसामान्य माणूस सातत्याने भरडला जातो, तेव्हा काळ स्वतः न्यायनिवाडा करतो अन् जेव्हा काळ न्यायनिवाडा करतो, तेव्हा तो कुणाचीही गय करत नाही, हेच बंगालमध्ये दिसून येत आहे. सर्वच ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी हे लक्षात घेऊन राज्यकारभार केला पाहिजे !

ज्या राज्यामध्ये प्रजा नेहमी भयभीत आणि त्रस्त असते, तेथील सत्ताधिशांचे पतन निश्चित असते !