कौटुंबिक दायित्व खंबीरपणे पार पाडणार्‍या आणि देवावर श्रद्धा असणार्‍या कवळे (फोंडा, गोवा) येथील कै. (श्रीमती) आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) !

१३.१.२०२५ या दिवशी कवळे (फोंडा, गोवा) येथील श्रीमती आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, आलेल्या अनुभूती आणि शेवटच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कै. (श्रीमती) आनंदी नाईक

१. वैवाहिक जीवन

‘आईच्या माहेरी धार्मिक वातावरण होते. लग्नानंतर ती सासरी कवळे (गोवा) येथे आली. माझे वडील उपाहारगृह चालवत होते. काही वर्षांनी त्यांनी हा व्यवसाय सोडून देऊन सायकली भाड्याने देण्याचा व्यवसाय चालू केला. हा व्यवसाय उत्तम चालू होता. माझे वडील पुष्कळ धार्मिक आणि प्रेमळ होते. आम्ही ५ मुली आणि २ मुले, अशी ७ भावंडे होतो.

२. पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे दायित्व सांभाळणे

काही वर्षांनी माझे वडील आजारी पडू लागले. माझ्या मोठ्या भावालाही पोलिओचा झटका आला. या दोघांच्या आजारपणाच्या वेळी आईला आमच्याकडेही लक्ष द्यावे लागत होते. वडिलांच्या व्यवसायाकडे लक्ष द्यायला तिला वेळ मिळाला नाही. काही वर्षांनी माझ्या वडिलांचे निधन झाले. आम्हा सर्वांचा भार आईवर आला. त्यानंतर ४ – ५ वर्षांनी माझ्या मोठ्या भावाचे निधन झाले. त्यामुळे आई पुष्कळ खचून गेली.

माझे बाबा आजारी पडण्यापूर्वी आईने लहान असलेले आमचे घर नवीन बांधायला घेतले होते; पण घर पूर्ण होण्याआधीच माझे वडील गेले. त्यानंतर आईने घराचे बांधकाम पूर्ण करून घेतले. माझे वडील वारले, त्या वेळी मी २ वर्षांचा आणि माझी धाकटी बहीण ६ मासांची होती. आई शेतीची कामे करू लागली. पावसाळ्याच्या दिवसांत पुष्कळ पाऊस झाला की, आम्हाला कधी कधी उपाशी रहावे लागत असे; पण ती आमच्यासाठी थोडेसे खाण्याची व्यवस्था करायची. आईने पुष्कळ काबाडकष्ट केले. ती आम्हाला शिक्षणासाठी शाळेतही पाठवायची.

श्री. प्रदीप अनंत नाईक

३. मुलांवर चांगले संस्कार करणे 

आईने आमच्यावर पुष्कळ चांगले संस्कार केले. तिने आम्हाला देवाची भक्ती करायला शिकवले.

४. आईने केलेली साधना 

शक्य असेल, तेव्हा आई दानधर्मही करत असे. ती दत्त महाराज आणि विठ्ठल यांची पुष्कळ भक्ती करत असे. त्या वेळी आई फुले विकण्याचे काम करत असे. ती सर्वांत प्रथम देवदर्शन करून आणि देवाला फुले वाहून फुले विकायला बसायची. आई पूजेची सिद्धता पुष्कळ छान करायची. पूजा करणारे पुरोहितही तिचे कौतुक करायचे. आईला अनेक संतांचे दर्शन घडले आहे. आम्ही कवळे (फोंडा, गोवा) येथील मारुतिगड येथे मागच्या २६ वर्षांपासून दासनवमीनिमित्त श्री सत्यनारायणाची पूजा करतो. त्या पूजेच्या वेळी आईला पुष्कळ आनंद होत असे.

४ अ. संत श्री कलावतीआई यांच्या संप्रदायानुसार साधना करणे : आईला गुरुप्राप्तीची पुष्कळ तळमळ होती. त्यामुळे ती अनेक संप्रदायांमध्ये जायची. ती बेळगाव येथील संत श्री कलावतीआई यांच्या संप्रदायात गेली. आई त्यांच्या वास्को येथील सेवाकेंद्रात जाऊ लागली. आईची भाव-भक्ती, साधना आणि सेवेची तळमळ, यांमुळे तिला श्री कलावतीआईंचा अनुग्रह मिळाला. त्यानंतर ती सकाळ-संध्याकाळ माळ घेऊन नामस्मरण करत असे. तिने ३० वर्षे साधना केली. आई अनेक वेळा पडली. तिच्या उजव्या पायाचे शस्त्रकर्मही झाले होते. या कालावधीत ‘श्री कलावतीआईच आईची काळजी घेतात’, असे आम्हा सर्वांना सतत जाणवत असे.

५. सनातन संस्थेविषयी आईच्या मनात पुष्कळ आदर होता. अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी सेवेसाठी आलेले १० ते १५ साधक आमच्याकडे १५ ते २० दिवस रहायचे. आई त्यांच्याशी पुष्कळ आदराने वागायची.

६. आईची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

अ. आईला स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि शिस्त यांविषयी आवड होती.

आ. आईचे बालपण आणि वैवाहिक जीवन पुष्कळ त्रासदायक असल्याने आईला कधी कधी क्रोध यायचा; पण जेव्हा ती नामजपादी उपाय करू लागली, तेव्हा तिचा क्रोध न्यून होत गेला.

इ. मी वर्ष १९९२ पासून गुरुकृपायोगानुसार साधना करू लागलो. आई आणि माझी भावंडे श्री कलावतीआईंच्या संप्रदायानुसार साधना करत असत; पण आईने मला कधीही सक्ती केली नाही की, मीही त्यांच्याप्रमाणे श्री कलावतीआईंना गुरु मानावे.

७. आईच्या संदर्भात आलेली अनुभूती 

मी नेहमी आईला नमस्कार करून बाहेर पडायचो. तेव्हा माझा प्रवास पुष्कळ सुखरूप व्हायचा आणि आईच्या आशीर्वादामुळे माझी अडलेली कामेही होत असत.

८. आईला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

८ अ. गायीच्या माध्यमातून देवाने आईला गावात सुखरूप पोचवणे : आई फुले विकण्यासाठी खेडेगावात जायची. त्या वेळी बसेस अल्प असायच्या. एकदा ती एका गावात फुले विकायला निघाली होती; पण काही कारणामुळे आईची फोंड्यातून त्या गावात जाणारी बस चुकली. दुसर्‍या बसने ती त्या गावाला जाणार्‍या रस्त्यावर उतरली. संध्याकाळच्या वेळी जवळपास कुणी दिसत नसल्यामुळे आई भांबावून गेली. अंधार व्हायची वेळ आली होती. त्या वेळी आईने देवाला प्रार्थना केल्यानंतर तिला त्या वाटेत एक गाय दिसली. गायीला बघून आईला थोडा धीर आला. तेथून गाव ३-४ कि.मी. दूर होते. आईने गायीच्या जवळ जाऊन रक्षण करण्यासाठी तिला प्रार्थना केली आणि ‘गावापर्यंत सोड’, असे म्हणाली. गाय त्या गावाच्या दिशेने चालू लागली. आई गायीची शेपटी धरून तिच्या मागून चालू लागली. तिन्ही सांज होईपर्यंत गाय गावच्या वेशीवर येऊन थांबली. त्यानंतर आईने गायीला नमस्कार केला आणि ती पुढे गावाकडे चालू लागली. काही अंतरावरून तिने मागे वळून पाहिले, तर तिला गाय दिसली नाही.

८ आ. रुग्णालयात भरती असतांना आईला श्रीकृष्णाने स्वप्नात दर्शन देणे : वर्ष १९९८ मध्ये दादर (मुंबई) येथील रुग्णालयामध्ये आईचे एक शस्त्रकर्म झाले. आईच्या जवळ रात्रीच्या वेळी माझी बहीण रहात असे. एकदा सकाळी मी आईकडे गेलो. तेव्हा आई पुष्कळ आनंदी दिसत होती. मी आईला कारण विचारल्यावर तिने मला खिडकीच्या बाहेर रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवर असणारा विजेचा खांब दाखवला. तिने सांगितले, ‘‘मला स्वप्नात श्रीकृष्णाने त्या भिंतीवर उभे राहून दर्शन दिले. श्रीकृष्ण स्मितहास्य करत मला आशीर्वाद देत होता. श्रीकृष्णाच्या भोवती एक मोठे वलय होते आणि त्यामुळे मला मागे असलेली इमारतही दिसत नव्हती.’’

९. शेवटचे आजारपण

अ. वर्ष २०२४ च्या आरंभापासून आईचे जेवण न्यून झाले होते. हळूहळू तिला अशक्तपणा जाणवू लागला.

आ. आम्ही तिच्यासाठी बसून थोडे नामस्मरण करायचो. कधी कधी आम्ही भ्रमणभाषवरून तिला नामजप ऐकवायचो.

इ. आईला तिच्या आजारपणाच्या काळात अनेक देवतांच्या मंदिरातील प्रसाद आणि तीर्थ मिळाले. माझी मुलगी आईसाठी नामजपादी उपाय करत असे.

ई. माझी धाकटी बहीण, माझी मुलगी आणि मला सतत असे वाटायचे, ‘आईला श्रीकृष्ण समवेत नेणार आहे.’ आई आजारी असतांना आमच्याकडून गावातील देवतांना प्रार्थना व्हायची, ‘श्रीकृष्णाने तिला समवेत घेऊन जावे.’

१०. १३.१.२०२५ या दिवशी ‘हा आईचा शेवटचा दिवस आहे’, असे मला सतत वाटत होते आणि तसेच घडले.’

– श्री. प्रदीप अनंत नाईक (कै. (श्रीमती) आनंदी नाईक यांचा मुलगा), कवळे, फोंडा, गोवा. (२३.१.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक