‘१८.३.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सनातन संस्थेला लाभलेले एक दुर्लभ दैवी संतरत्न – सद्गुरु सत्यवान कदम !’ या मथळ्याखाली सुश्री मधुरा भोसले यांचा सूक्ष्म ज्ञानावर आधारित लेख प्रकाशित झाला होता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे निवासस्थान असलेल्या मुंबई येथील सेवाकेंद्रात मी सेवेसाठी जात असे. तेव्हा अनुमाने १० वर्षे (वर्ष १९९० ते २००१ या कालावधीत) मला श्री. सत्यवान कदम यांचा सत्संग लाभला. तेव्हा गुरुकृपेने सद्गुरु सत्यवानदादांच्या संदर्भातील सूक्ष्म ज्ञानावर आधारित मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यात समर्पणभावाने सेवा करणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे कौतुक करणे

अनुमाने वर्ष १९९४ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मुंबई येथील रूपारेल कॉलेजच्या सभागृहात अभ्यासवर्ग होत असे. एकदा जुने साधक आणि नवीन जिज्ञासू मिळून अनुमाने १५० जण अभ्यासवर्गात होते. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सद्गुरु सत्यवान कदम यांचे कौतुक करतांना म्हणाले, ‘‘सत्यवान कोणतीही सेवा लगेच स्वीकारतो. तो भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करतो.’’ तेव्हापासूनच ‘सद्गुरु सत्यवानदादांनी आम्हा सर्व साधकांपुढे ‘सेवाभाव कसा असावा !’, याचा आदर्श निर्माण केला आहे’, असे मला वाटते. त्यांनी आतापर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात समर्पणभावाने सेवा केली आहे. आता ते सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु म्हणून सेवा करत आहेत.
२. ‘सुश्री मधुरा भोसले यांना सूक्ष्म ज्ञानातून मिळालेली माहिती – ‘सद्गुरु सत्यवान कदम यांच्यामध्ये ७ टक्के शिवतत्त्व आणि ३ टक्के हनुमानतत्त्व आहे’ या संदर्भात जाणवलेली सूत्रे
२ अ. अंतर्मुख वृत्ती : मुंबई येथील सेवाकेंद्रात आम्ही अनुमाने २० साधक सेवा करत होतो. काही वेळा साधक एकमेकांशी अनावश्यक बोलायचे किंवा एकमेकांतील गुण-दोष पहायचे. सद्गुरु दादा इतरांचे गुण-दोष पहाण्यात वेळ न घालवता सर्वांकडे साक्षीभावाने पहात असत. ते नेहमी अंतर्मुख होऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या सेवा करण्यात मग्न असत. एकदा अभ्यासवर्गात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील प्रयोग घेतला. त्यांनी सद्गुरु सत्यवानदादा आणि एक पुष्कळ सेवा करणारा साधक यांना साधकांसमोर उभे करून ‘‘दोघांकडे पाहून काय वाटते ?’’, असे विचारले. तेव्हा सर्वांना सद्गुरु सत्यवानदादा यांच्याकडे पाहून चांगले वाटले, तर दुसर्या साधकाकडे पाहून त्रास जाणवला. तेव्हा सद्गुरु सत्यवानदादा यांची अंतर्मुख वृत्ती आणि त्यांच्याकडून येणारी दैवी अन् सात्त्विक स्पंदने यांची सर्वांना जाणीव झाली.
२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सद्गुरु सत्यवान कदम यांच्यातील ‘वैराग्य आणि त्यागी वृत्ती’ याविषयी काैतुकोद्गार काढणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आमचा अभ्यासवर्ग दादर, मुंबई येथील बालमोहन शाळेतील एका वर्गात घेत असत. एकदा ते ‘सद्गुरु सत्यवानदादा तन, मन आणि धन यांचा त्याग करून साधना करत आहेत. ते वेळ देऊन तळमळीने सेवा करत आहेत’, याविषयी सांगून सद्गुरु सत्यवानदादांचे कौतुक करत होते. तेव्हा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना म्हणालो, ‘‘सत्यवानदादांचे लग्न झाले नाही. त्यांना संसार आणि नोकरी, असे काही दायित्व नाही. त्यामुळे त्यांना सेवा आणि साधना करणे शक्य आहे; पण मला शक्य नाही.’’ त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर म्हणाले, ‘‘तुम्ही लग्न केले, संसार केला आणि सर्व उपभोग घेतला आहे, तरीही तुम्हाला साधनेसाठी संसार आणि व्यवहार सोडवत नाही. सत्यवानने तसे काही केले नसतांना लहान वयातच साधनेसाठी संसाराचा त्याग केला आहे; म्हणून त्याचा त्याग, साधना आणि सेवा कौतुकास्पद आहे.’’ तेव्हा मला सद्गुरु दादांमधील ‘वैराग्य, त्यागी वृत्ती आणि समर्पणभाव’ हे गुण लक्षात आले.
३. सद्गुरु सत्यवान कदम हे मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे परम प्रिय शिष्य आणि संतरत्न असणे

३ अ. गुर्वाज्ञापालन : वडाळा, मुंबई येथील ‘बाँबे पोर्ट ट्रस्ट’च्या वसाहतीत इंग्रजी भाषेतून साप्ताहिक सत्संग घेतला जात होता. काही कारणांमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितले, ‘‘इंग्रजी सत्संग वटकर आणि सत्यवान हे दोघे घेतील. वटकर इंग्रजीतून सत्संग घेतील आणि तेथील साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी सत्यवान सत्संगाला जाईल.’’ सद्गुरु सत्यवानदादांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांना सत्संग घेण्याएवढे इंग्रजी येत नव्हते, तरीही ‘त्यांना माझ्या समवेत इंग्रजी सत्संग घेण्यास का सांगितले ?’, याचे सर्वांना आश्चर्य वाटले. तेव्हा सद्गुरु सत्यवानदादांनी मनात कसलाही विकल्प न आणता गुर्वाज्ञापालन केले. सद्गुरु दादांनी आतापर्यंत गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे) तंतोतंत आज्ञापालन करण्याचा प्रयत्न केला आहे. अध्यात्मात ‘गुरुमंत्र, सेवा, व्यष्टी साधना’ इत्यादींपेक्षा गुर्वाज्ञापालनाला अधिक महत्त्व आहे. सद्गुरु सत्यवानदादा गुरुदेवांचे आज्ञापालन करून गुरुदेवांचे परम प्रिय शिष्य झाले.
३ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु सत्यवान कदम म्हणजे गुरु-शिष्य नात्याचा उच्च आदर्श ! : वर्ष १९९० मध्ये आरंभीच्या कालावधीत माझ्यासारख्या अज्ञानी जिवाला ‘सद्गुरु सत्यवान कदम हे सर्वसामान्य व्यक्ती आणि साधक आहेत’, असे वाटत होते. आम्ही केवळ त्यांच्याकडे मानसिक स्तरावर पहात होतो. सद्गुरु सत्यवान कदम संत म्हणून घोषित झाल्यावर काही जणांना आश्चर्य वाटले. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना सद्गुरु दादांविषयी सर्व ज्ञात होते. त्यामुळेच त्यांनी सद्गुरु दादांना टप्प्याटप्प्याने घडवले. सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या लहरींचे प्रमाण वाढल्याने परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यास सांगितले होते.
सुश्री मधुरा भोसले यांच्या सूक्ष्म ज्ञानावर आधारित लेखावरून सद्गुरु दादांची गुणवैशिष्ट्ये समजली आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचेही एकमेवाद्वितीय गुरुत्व शिकायला मिळाले. ‘आध्यात्मिक क्षेत्रात गुरु-शिष्य नात्याचा उच्च आदर्श निर्माण झाला आहे’, असे मला वाटते.
सद्गुरु सत्यवानदादांच्या आदर्श आचरणातून मला शिकायला मिळाले आणि अजूनही साधनेसाठी प्रेरणा मिळत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सनातन संस्थेच्या आरंभीच्या कालावधीत मुंबई सेवाकेंद्रातील आम्हा साधकांना घडवतांना सद्गुरु सत्यवान कदम या संतरत्नाचा आदर्श आमच्या पुढे ठेवला. त्याबद्दल विष्णुस्वरूप मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या चरणी मी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.३.२०२६)
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !
व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण