श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा  !

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, आपल्याला आमच्या साधनेची केवढी काळजी आहे ! आमच्यापेक्षा आपल्यालाच ‘आमची साधना व्हावी’, याची तळमळ आहे. हे कृपाळू गुरुदेवा, तुम्ही आमच्यासाठी किती करता ! आपल्या मनात दिवस-रात्र साधकांचाच विचार असतो. आपल्याला सर्वांत प्रिय साधकच आहेत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, आपण आम्हाला प्रत्येक सप्ताहात भक्तीसत्संगाची अनमोल भेट देत आहात.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे भक्तीसत्संगातील चैतन्यमय मार्गदर्शन आणि साधक अनुभवत असलेली भावस्थिती !

प्रत्येक साधक भक्तीसत्संगाच्या दिवसाची उत्साहाने वाट पहात असतो. भक्तीसत्संगातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या भावपूर्ण वाणीतून चैतन्याचा अखंड प्रवाह प्रक्षेपित होत असतो. त्यांचे मार्गदर्शन ऐकतांना साधक मंत्रमुग्ध होतात. त्या बोलत असतांना त्यांच्या वाणीतील माधुर्य साधकांच्या अंतर्मनाला भिडते. आम्ही साधक भारावून जातो.

२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या संदर्भात जाणवलेली भावसूत्रे !

सौ. शुभांगी पात्रीकर

अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची स्तुती विविध प्रकारांनी करतात. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची गुणवैशिष्ट्ये माझ्या डोळ्यांसमोर येतात. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ करत असलेल्या मार्गदर्शनातील अवीट गोडी मला चाखायला मिळते. त्यातील काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

आ. ‘हा भक्तीसत्संग दिव्य लोकात चालू आहे’, असे मला वाटते. सर्व जण स्तब्ध होऊन चैतन्याचे रसपान करतांना दिसतात.

इ. साधकांची शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही त्यांना भक्तीसत्संग बसून ऐकण्यासाठी शक्ती मिळते. साधकांना शारीरिक त्रास होत असल्यास सत्संगातील चैतन्याने त्यांचा त्रास दूर होतो आणि त्यांना एकाग्र चित्ताने सत्संग श्रवण करता येतो.

ई. भक्तीसत्संगात विविध कथांद्वारे विषयाची गुंफण केलेली असते. ‘त्यातून काय बोधामृत घ्यायचे ?’, हे शिकायला मिळते.

उ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी आतापर्यंत ‘विचारणे, ऐकणे आणि स्वीकारणे’ या सूत्रांविषयी सांगून साधनेतील अनेक पैलू उलगडून साधकांना अंतर्मुख केले आहे. साधकांमध्ये या गुणांची वृद्धी होण्यासाठी आवश्यक अशी सूत्रे परम पूज्य, आपणच श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून साधकांच्या लक्षात आणून देत आहात.

ऊ. हे कृपावंता, आपणच ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी विषय सोपा करून सांगता. त्यामुळे साधकांना साधना करण्यासाठी उत्साह आणि प्रेरणा मिळते.

ए. भक्तीसत्संग ऐकून सर्व साधकांचा आनंद द्विगुणित होतो. भक्तीसत्संगाच्या समाप्तीपूर्वी लावले जाणारे उद्बोधक भक्तीगीत साधकांच्या मनात घर करून रहाते.

ऐ. प.पू. गुरुदेव साधकांना घडवत आहेत. ते साधकांच्या मनाची सिद्धता करून घेत आहेत. हे गुरुदेवा, करुणाकरा, आपल्या कृपेमुळेच आम्हाला पुढच्या पुढच्या टप्प्याचा सत्संग मिळत आहे. त्या चैतन्यात आम्ही डुंबून जातो. हे दयाघना, गुरुदेवा, आपली केवढी कृपा आहे ! धन्य धन्य गुरुदेव ! सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे गुणवर्णन करायला शब्द अपुरे पडतात.

‘हे गुरुमाऊली, भक्तीसत्संगात सांगितलेली सर्व सूत्रे कृतीत आणण्याची सद्बुद्धी आपणच आम्हाला द्यावी आणि आमच्याकडून नित्य प्रयत्न करून घ्यावेत’, अशी आपल्या चरणी कृतज्ञताभावाने अन् आर्ततेने प्रार्थना आहे. मी आपल्या चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. शुभांगी अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक