रत्नागिरी जिल्ह्यातील ८७ सहस्र ८६२ नागरिक तंबाखूमुक्त !

जिल्हा रुग्णालयाच्या मोहिमेला यश

तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन.

रत्नागिरी – जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ८७ सहस्र ८६२ नागरिक आतापर्यंत तंबाखूमुक्त झाले आहेत. जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रमादरम्यान ही महत्त्वाची आकडेवारी घोषित करण्यात आली.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात एका विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

१. वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम कांबळे यांनी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम, तोंडाचा कर्करोग आणि अन्य असंसर्गजन्य आजारांचा वाढता धोका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

२. तंबाखूमुक्तीची ही चळवळ गावागावांत पोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत २ सहस्र ८४५ विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ७१ सहस्र ४२५ नागरिकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात १४७ रुग्णांना कर्करोगाचे निदान करण्यात आले.

३. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याप्रकरणी २ सहस्र ५१८ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत २ लाख ८९ सहस्र २३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

४. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अवैधपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍या १५४ दुकानांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३० सहस्र ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

५. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून स्वतः दूर रहा आणि आपल्या कुटुंबालाही त्यापासून दूर ठेवा. तोंडात जखम, पांढरे डाग, गाठ, जळजळ किंवा अन्य कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करून घ्या. तंबाखूमुक्त जीवन हेच निरोगी जीवन आहे. चला आपण सर्व जण तंबाखूमुक्त रत्नागिरी घडविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन डॉ. भास्कर जगताप (जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी) यांनी केले.