वारसांना बँकेकडून २३.८४ लाख रुपयांचा विमा लाभ

विजेच्या धक्क्याने कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

राजापूर, ३१ मे (वार्ता.) – तालुक्यातील धोपेश्वर-तिठवली येथील महावितरणच्या कंत्राटी कर्मचार्‍याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना बँक ऑफ इंडिया, राजापूर शाखेकडून पगार खातेदार विमा योजनेअंतर्गत २३ लाख ८४ सहस्र १०० रुपये इतके आर्थिक साहाय्य देण्यात आले.

६ जानेवारी २०२६ या दिवशी सायंकाळी पेंडखळे येथील भवानी मंदिर परिसरात विजेच्या खांबावर काम करत असतांना महावितरणमध्ये कंत्राटी कर्मचार्‍याच्या स्वरूपात कार्यरत असलेल्या अनिकेत परवडी यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

अनिकेत परवडी यांचे बँक ऑफ इंडिया, राजापूर शाखेत वेतन खाते (Salary Account) होते. बँकेच्या खातेदार विमा संरक्षण योजनेअंतर्गत त्यांचा विमा उतरवण्यात आलेला असल्याने त्यांच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळाला. ३० मे या दिवशी ही विमा रक्कम अनिकेत यांच्या आई सुरेखा परवडी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली.

या वेळी अनिकेत यांचे वडील शांताराम परवडी, आई सुरेखा परवडी, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे, महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कोल्हापुरे, बँक इंडियाचे मुख्य प्रबंधक मुकेश मेश्राम, महावितरणचे  गावकारे, तसेच राजापूर शाखेचे व्यवस्थापक कन्नन भानु यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. अनिकेत यांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बँक ऑफ इंडियाचे अधिकारी करण सिंग यांनी विशेष पाठपुरावा केला होता.