‘भविष्यात आपत्कालीन परिस्थिती येऊ शकते, हे लक्षात ठेवून आपण भविष्यकाळासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपल्या योजनांची कार्यवाही योग्य प्रकारे करू शकतो. प्रत्येकाला ‘समृद्ध जीवन जगावे’, असे वाटत असले, तरी आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन करणे भाग आहे. सद्य:स्थितीत ‘पुढे काय होईल ?’, हा प्रश्न बहुतेकांना भेडसावत आहे. हे लक्षात घेऊन आपल्याला काय आवश्यक आहे आणि काय नाही ? याचा विचार व्हायला हवा. या दृष्टीकोनातून निवास, आर्थिक आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी यांविषयी कोणती दक्षता घ्यावी, ते आपण समजून घेऊया.

१. आपत्काळानुसार निवासाचे व्यवस्थापन
१ अ. नवीन घर घ्यावे कि नाही ? : आपत्कालीन परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. भूकंप, भूस्खलन इत्यादींमुळे घरांची हानी होऊ शकते. त्यामुळे नवीन घरांमध्ये गुंतवलेले पैसे वाया जाऊ शकतात. या कारणास्तव शक्यतो नवीन घर किंवा सदनिका खरेदी करणे टाळावे. सध्या रहात असलेल्या घरातच रहाणे किंवा भाड्याची सदनिका निवडणे योग्य आहे. त्यातही काही तातडीच्या कारणास्तव घर किंवा अपार्टमेंट खरेदी करण्याची परिस्थिती उद्भवलीच, तर त्यावर नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव अल्प संभावणार्या जागेचा विचार करू शकतो. अशा स्थितीत शक्यतो तिसर्या मजल्याच्या वरील घर घेणे टाळावे. भूकंप झाल्यास तिसर्या मजल्यापर्यंतच्या घरातून बाहेर पडणे सोयीचे होते. समजा आपले घर तिसर्या मजल्याहून वरच्या ठिकाणी असेल, तर त्याहून खालचा मजला असणार्या घराचा शोध घेऊ शकतो.
१ आ. जुन्या घराचे नूतनीकरण करावे कि नाही ? : घर पुष्कळ जुने झाले आहे आणि नैसर्गिक आपत्तीत त्याची हानी होऊ नये, यासाठी आपण त्याचे नूतनीकरण करायचे ठरवले असेल, तर ते लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. यासमवेतच आपत्कालीन परिस्थितीत चांगल्या घरांचीही हानी होऊ शकते. त्यामुळे घराचा विस्तार करण्यासाठी किंवा अंतर्गत सजावटीसाठी केलेला मोठा व्यय वाया जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थिती संपल्यानंतर घराचा विस्तार किंवा अंतर्गत सजावट करण्यास प्राधान्य द्यावे.
१ इ. गावातील घर रहाण्यायोग्य स्थितीत हवे ! : भविष्यातील तिसरे महायुद्ध आणि आतंकवादाचा धोका इत्यादींच्या दृष्टीकोनातून शहरांपेक्षा गावे अधिक सुरक्षित असतात. अशा परिस्थितीत आपल्याला गावात स्थलांतरित व्हावे लागू शकते. त्यामुळे गावात स्वत:चे घर असेल, तर ते सध्या रहाण्यायोग्य ठेवू शकतो. आता शहरात रहाणार्यांचे गावात घर किंवा भूमी नसेल, तर त्यांनी गावात शक्य तितके आरामदायक घर बांधण्याचा विचार करावा. आर्थिक दृष्टीकोनातून परवडण्यासाठी काही लोक एकत्र रहाण्याचा विचार करू शकतात; पण भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन आपण काळजीपूर्वक नियोजन करायला हवे.

२. बचतीसाठी गुंतवणूक करतांना घ्यावयाची दक्षता

सध्या अनेक बँक घोटाळे उघडकीस येत आहेत. त्यामुळे ‘स्वतःचे पैसे सुरक्षित रहावेत’, असे वाटत असेल, तर ‘आपली सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत’, या आर्थिक तत्त्वानुसार स्वतःच्या पैशांची गुंतवणूक करावी. गुंतवणूक करतांना स्वतःची बचत (ठेव) आपण रहातो, त्याच परिसरातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवावी. राष्ट्रीयीकृत बँका या रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असतात. त्यामुळे आपत्काळात काही कारणांनी त्या कोसळल्या, तरी स्वतःचे पैसे गमावण्याची शक्यता नसते. केवळ बँकेतून विशिष्ट रक्कमच काढता येण्यासारख्या मर्यादा येतात. याउलट जर एखादी खासगी बँक कोसळली, तर त्यासाठी रिझर्व्ह बँक उत्तरदायी नसते. त्यामुळे गमावलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता अल्प असते. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रत्येक खातेदाराचा ५ लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवलेला असतो. त्यामुळे खातेदार एका राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकाधिक ५ लाख रुपये ठेवू शकतो.
३. आपत्काळात गैरसोय टाळण्यासाठी स्वत:ला अद्ययावत् ठेवण्याची आवश्यकता !
आपत्कालीन परिस्थितीत आपण सर्व प्रकारच्या बँक खात्यांवर उत्तराधिकारी (नामनिर्देशित व्यक्ती) नोंदवणे आवश्यक आहे. यासमवेतच कुटुंबातील सदस्यांना बँकेत पैसे जमा करणे आणि काढणे यांसारख्या गोष्टी शिकवू शकतो. आपणही ‘नेट बँकिंग’ (इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार) करणे; भ्रमणभाषच्या माध्यमातून वीज, पाणी, गॅस सिलिंडर, भ्रमणभाष इत्यादींची देयके भरायला शिकणे, घरबसल्या दैनंदिन आवश्यक वस्तू मागवणे, स्वतःच्या बँक खात्यातून दुसर्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करणे, बस आणि रेल्वे यांची तिकिटे आरक्षित करणे इत्यादी गोष्टी आताच शिकू शकतो.
मिळकत आणि बचत काटकसरीने वापरण्याचे महत्त्व

१. सध्या बर्याच जणांच्या आवश्यकता वाढलेल्या आहेत. येणारा आपत्काळ लक्षात घेऊन आपण सध्याचे स्वतःचे उत्पन्न आणि बचत यांचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. आणीबाणीच्या काळात महागाई वाढते. आपल्याला काटकसर करण्याची सवय नसेल आणि आपत्काळात स्वतःचा व्यवसाय बुडाला किंवा नोकरी गेली, तर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण आतापासूनच काटकसरीपणाची सवय अंगी बाणवली पाहिजे.
२. दुसर्या महायुद्धाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आवाहनावरून अनेक लोकांनी आझाद हिंद फौजेसाठी पैसे, दागिने इत्यादी गोष्टी दान केल्या होत्या. आपत्काळात राष्ट्रावरील आर्थिक भार लक्षणीयरित्या वाढतो. अशा स्थितीत आताच अनावश्यक व्यय टाळून काटकसर केली, तर ते पैसे ‘राष्ट्रीय कर्तव्य’ म्हणून राष्ट्राला दान करता येतील. यासमवेतच नैसर्गिक आपत्ती आली, तर त्या काळात सामाजिक कर्तव्य म्हणून आपत्तीग्रस्तांना आर्थिक साहाय्य करता येईल.
४. मौल्यवान धातूंमधील गुंतवणूक
मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करायची असल्यास सरकारी नियमांचे पालन करून सोने आणि चांदी इत्यादी धातूंमध्ये गुंतवणूक करू शकतो. आपत्कालीन परिस्थितीत बँकेतून पैसे काढणे कठीण होऊ शकते; पण सोने आणि चांदी यांसारखी मौल्यवान संपत्ती आपल्या कह्यात असते. त्यामुळे योग्य वेळी पैशांची आवश्यकता भासली, तर या पर्यायांचा वापर करता येतो. या वेळी सोने किंवा चांदी खरेदी ही अलंकार किंवा नाणे यांसारख्या स्वरूपात करू नये. त्याऐवजी शुद्ध सोन्याच्या वळ्या (बिस्किटे) किंवा शुद्ध चांदी खरेदी करावी. त्यामुळे दागिने बनवून घेण्याची आवश्यकता रहात नाही.
५. आपत्काळाच्या दृष्टीकोनातून समभागांतील (शेअर्समधील) गुंतवणूक
आस्थापनांचे समभाग (शेअर्स) हे खासगी संस्थांच्या मालकीचे असतात. जेव्हा ते विकले जातात, तेव्हा बाजारमूल्य हे पैसे मिळण्याचे साधन असते. ही रक्कम मूळ खरेदीच्या मूल्याहून न्यून किंवा अधिक असू शकते. शेअर्समधील गुंतवणुकीवर कोणताही विमा किंवा कुणाचेही नियंत्रण नसते. त्यामुळे ‘शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे परत मिळतील’, याची कोणतीही हमी नसते. त्यामुळे ज्यांनी शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांनी आजपासूनच त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीतील वाढती महागाई आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या विचारात घेऊन साधारणपणे काही वर्षांच्या आवश्यकता भागवण्यासाठी घरात पुरेसे पैसे ठेवणे आवश्यक आहे.
संभाव्य आपत्काळ स्वतःसह समाजाला चांगल्या सवयी लावण्यासाठीच…!

भविष्यात येणार्या अडचणींविषयी मार्गदर्शन मिळणे, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. सध्या लहान लहान अडचणींमुळे अनेक जण मानसिकदृष्ट्या खचून जातात. अशा वेळी आपल्या आधीच्या पिढ्यांनी सहन केलेल्या कठीण परिस्थितीचा विचार करावा. त्या काळात इतक्या सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यांना सर्व काही कठोर परिश्रमाने मिळवावे लागत असे. आज आपल्याला ‘वापरून फेकून देण्याची’ सवय लागली आहे. आता संभाव्य आपत्काळ आपल्याला परत एका गतकाळात घेऊन जात आहे आणि आपल्याला आपल्या आवश्यकता न्यून करायला शिकवत आहे. खेडेगावातील संस्कृती आपल्या जीवनात शिरलेली कृत्रिमता दूर करायला शिकवत आहे. ‘जे काही घडते, ते ईश्वरी इच्छेनुसार आणि आपल्या हितासाठीच घडते’, हे लक्षात ठेवून आपत्काळाची चिंता करणे सोडावे. सध्या चिंतन, प्रयत्न आणि आवश्यक व्यवस्था निर्माण करण्याची वेळ आहे. आध्यात्मिक साधनेद्वारे स्वतःची भक्ती वाढवा. या आपत्काळानंतर आपण सर्व जण मिळून निश्चितपणे एक आदर्श ‘हिंदु राष्ट्र’ घडवू.’
– श्री. रमेश शिंदे
६. भूमीमध्ये गुंतवणूक
ज्यांना शक्य आहे, त्यांनी बागकामासाठी योग्य भूमी खरेदी करावी. वैयक्तिकरित्या भूमी खरेदी करणे शक्य नसेल, तर मित्र-नातेवाइकांचा गट सिद्ध करूनही भूमी खरेदी करू शकतो. त्या त्या क्षेत्रानुसार या गुंतवणुकीचा परतावा उणे-अधिक असू शकतो. घरासाठी विहीर खोदणे आणि सौर ऊर्जा यंत्र बसवणे इत्यादी गोष्टीही गुंतवणुकीचाच भाग आहेत.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)