सध्या उष्णतेत वाढ होत आहे. काही वर्षांपूर्वी काही प्रदेशांतील ऋतूमान स्थिरतेने दिलेला कालावधी पूर्ण करायचे; मात्र गत १२-१४ वर्षांपासून पावसाळा दीर्घकाळ असणे, थंडीच्या महिन्यांतही पाऊस पडणे, थंडीचा कालावधी वाढून उन्हाळ्यात थंडी वाजणे, तर उन्हाची दाहकता वाढून जुलैपर्यंत उन्हाळा जाणवणे असे चक्र अस्थिर झाले आहे. हवामान विभागाचे अनुमान नेहमी चुकायचे. आता तंत्रज्ञानातील पालटामुळे ते काही अंशी अचूक येते. संभाव्य हवामान पालटाची माहिती भ्रमणभाषवर उपलब्ध होते. त्यानुसार कामांचे नियोजन करता येते. शास्त्रज्ञांनी भविष्यातील एका मोठ्या संभाव्य संकटाविषयी सांगून ठेवले आहे. त्याविषयी या लेखातून जाणून घेऊ.

१. ‘सुपर एल निनो’विषयीचे अनुमान
जागतिक हवामान संस्था आणि भारतीय हवामान विभाग यांच्या अहवालानुसार मे २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत ‘सुपर एल निनो’ सक्रीय होण्याची ८२ टक्के शक्यता आहे. यामुळे भारतात पाऊस सामान्यपेक्षा न्यून (९२ टक्के) पडण्याचे अनुमान असून ३५ टक्के दुष्काळाचा धोका वाढला आहे. उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील शेती अन् शहरे यांवर पाण्याचे मोठे संकट येऊ शकते.
२. दुष्काळ आणि पूर असे दुहेरी संकट

प्रशांत (पॅसिफिक) महासागरात घडणार्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींचा जागतिक वातावरणावर परिणाम होतो. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत असून शास्त्रज्ञांच्या मते यंदा ‘सुपर एल निनो’ विकसित होत आहे. मे २०२६ पासून चालू होणारा हा प्रभाव फेब्रुवारी २०२७ पर्यंत रहाण्याची शक्यता आहे. परिणामी देशात कुठे तीव्र दुष्काळ, तर कुठे अचानक येणारा पूर अशी टोकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
३. ‘सुपर एल निनो’ची स्थिती
अमेरिकेच्या ‘नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिस्ट्रेशन’च्या हवामान अनुमान केंद्रानुसार मे ते जुलै २०२६ मध्ये ‘एल निनो’ सक्रीय होण्याची ८२ टक्के शक्यता, तर ऑक्टोबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ यामध्ये ते तीव्र किंवा अत्यंत तीव्र (सुपर एल निनो) श्रेणीत जाण्याची ६५ टक्के शक्यता आहे. जागतिक तापमानवाढीमुळे उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागेल. ‘सुपर एल निनो’ तीव्र झाल्यास वर्ष २०२७ हे वर्ष आजवरच्या मानवी इतिहासातील ‘सर्वांत उष्ण वर्ष’ ठरू शकते.
४. कोट्यवधी लोकांच्या मृत्यूची शक्यता
हवामान तज्ञांच्या मते, ‘एल निनो’ वर्ष १८७७ मधील विनाशकारी ‘एल निनो’इतके शक्तीशाली असू शकते. तेव्हाच्या ‘एल निनो’मुळे जगभरात भीषण दुष्काळ पडला. तत्कालीन जागतिक लोकसंख्येच्या ३ टक्के म्हणजे ५ कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
‘एल निनो’ म्हणजे काय ?

‘एल निनो’ ही प्रशांत महासागरातील महत्त्वाची हवामानविषयक घटना आहे. मध्य-पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे पाणी सामान्यपेक्षा अधिक गरम होण्याची स्थिती म्हणजे ‘एल निनो’ ! महासागरातील पूर्वेकडील उष्ण वारे पश्चिमेकडे (आशिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दिशेने) वहात असल्याने आशियाई भागात पाऊस पडतो; परंतु ‘एल निनो’काळात वारे कमकुवत होतात किंवा त्यांची दिशा पालटते. त्यामुळे समुद्रातील उष्णता दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीकडे सरकून जगातील वार्यांच्या चक्रासह पावसाचे स्वरूप बिघडते.
– श्री. यज्ञेश सावंत
५. ‘सुपर एल निनो’चा संभाव्य फटका कुणाला ?
‘सुपर एल निनो’चा सर्वाधिक फटका उत्तर, पश्चिम आणि मध्य भारताला बसेल. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांसाठी ऑगस्ट महिना आव्हानात्मक असेल. पावसाच्या कमतरतेमुळे खरीप पिकांची हानी होऊ शकते. मध्यप्रदेशातील इंदूर, उज्जैन, ग्वाल्हेर, जबलपूर, रीवा आणि सागर या मोठ्या शहरांत सरासरीपेक्षा पुष्कळ न्यून पाऊस पडेल. चंबळ आणि नर्मदापूरम् भागात पिण्याच्या पाण्याची अन् सिंचनाची टंचाई निर्माण होऊ शकते. देहली आणि आसपासच्या परिसरात भीषण उष्णता अन् पाण्याचे दुर्भिक्ष्य असा दुहेरी फटका बसू शकतो. ‘सुपर एल निनो’मुळे ‘अर्धा भारत कोरडा, तर अर्ध्या भागात पूर येईल’, अशी स्थिती आहे. अल्प पावसामुळे धरणांतील पाणीसाठा आटून शेती, अन्नधान्य उत्पादन आणि वीज निर्मिती यांवर परिणाम होईल. हवामानातील पालटांमुळे काही भागांत अल्प वेळेत ढगफुटीसारखा प्रचंड पाऊस होऊन अचानक पूर येऊ शकतो, तर काही भागात पाण्याच्या थेंबासाठी लोक तळमळतील.
६. कोरोना महामारीसारखे संकट !
५ वर्षांपूर्वी जगाने कोरोना महामारीचे संकट अनुभवले. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला, तर लाखो लोकांच्या शारीरिक क्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम झाला. वर्ष १९१८ मध्ये आलेल्या ‘स्पॅनिश फ्लू’ किंवा तत्सम जागतिक महामारीने जगभरात हाहा:कार माजवला होता. अधिकृत आकडेवारीनुसार या प्राणघातक आजारामुळे जगभरात ५ कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. सध्या कांगो आणि युगांडा या दक्षिण आफ्रिकेतील देशांत ‘इबोला’ विषाणूची साथ पसरत आहे. हे संक्रमण वाढू नये किंवा आपल्या देशात येऊ नये; म्हणून प्रत्येक देश मार्गदर्शक सूचना प्रसारित करतो, तरीही उद्योगधंदा, महत्त्वाची कामे यांसाठी काहींना प्रवास करावाच लागतो. तेव्हा हे संक्रमण वाढू शकते.
विविध कारणांमुळे हा धोका भारताच्या उंबरठ्यापर्यंत येत आहे.
अ. पालटते हवामान : वाढते तापमान आणि निसर्गातील पालटांमुळे अनेक सुप्त विषाणू अन् जीवाणू पुन्हा जिवंत होत आहेत.
आ. नवीन म्युटेशन्स : जुने विषाणू आता अधिक शक्तीशाली आणि औषधांना दाद न देणारे बनत चालले आहेत.
इ. ग्लोबल कनेक्टिव्हिटी : जगभरातील दळणवळण वेगवान झाल्याने जगाच्या एका कोपर्यात उद्भवलेला आजार २४ घंट्यांत भारतात पोचू शकतो.
भारतासारख्या विकसनशील आणि मोठ्या लोकसंख्येच्या देशाने योग्य पावले उचलली, तरच या संभाव्य महामारीला रोखू शकतो.
अनेक भाकितांत जसे अप्पाची वाडी (बेळगाव) येथील हालसिद्धनाथ, बाबा वेंगा आणि नॉस्ट्रेडॅमस यांच्या माहितीत जागतिक स्तरावर मोठ्या रोगाचे संकट आहे अन् हवामान पालटामुळे येणारी तीव्र प्रतिकूलताही आहे. अतीवृष्टी, दुष्काळ, भूकंप या नैसर्गिक आपत्तींचे आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणात होणार्या वित्त अन् जीवित हानीचे संकेत आहेत. या संभाव्य नैसर्गिक आणि काही मानवनिर्मित आपदांच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यासह दैवी पाठबळ मिळवणे, हे अत्यंत आवश्यक आहे.
– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (२५.५.२०२६)
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)