
प्रश्न : भगवद्गीतेत अध्याय ८, श्लोक २२ मध्ये भगवान् श्रीकृष्णांनी ‘हे पार्थ, ज्याच्या आत सर्व भूते आहेत आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे तो परमपुरुष अनन्य भक्तीने प्राप्त होतो’ असे सांगितले आहे. इथे भक्ती करायची म्हणजे कशी करायची, काय करायचे?
उत्तर : ह्यात दोन गोष्टी आल्या, अनन्यता आणि भक्ती. आधी ‘अनन्यता’ थोडक्यात पाहूया.
अनन्यता
अनन्यता दोन प्रकारची मानली जाऊ शकते, द्वैती आणि अद्वैती.
द्वैती १- ‘देवाची ज्या रूपात मी उपासना करतो तोच एक देव आहे, अन्य देव नाही’ अशी धारणा, ही द्वैती अनन्यता आहे. उदा. संत नरहरी सोनार आधी कट्टर शिवभक्त होते, ‘विठ्ठलमूर्तीचे तोंडसुद्धा पाहणार नाही’ असे म्हणत.
२- बहुतेक सर्व सनातनधर्मी अनेक देवतांना मानतात, त्यांची उपासना करतात, पण त्यांना स्वत:पासून वेगळे मानून. ह्याचा उल्लेख गीता अध्याय ९ श्लोक १५ मध्ये भगवान् श्रीकृष्णांनी ‘उपासते—पृथक्त्वेन’ म्हणजे वेगळेपणा राखून उपासना करतात, असा केला आहे.
अद्वैती – त्याच अध्याय ९ श्लोक १५ मध्ये भगवान् श्रीकृष्णांनी ‘उपासते एकत्वेन’ म्हणजे परमात्मा आणि स्वत: एकच आहेत असे जाणून उपासना करतात, असे म्हटले आहे. ‘मी’, म्हणजे माझा आत्मा ईश्वराचाच अंश असल्याने ईश्वराहून वेगळा, अन्य, नाहीच अशी अद्वैती अनन्यता.
पू. अनंत आठवले यांच्या लिखाणातील चैतन्य न्यून न होण्यासाठी घेतलेली काळजी
पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत.
भक्ती
अविधीपूर्वक भक्ती – कोणत्याही रूपात ईश्वराची श्रद्धेने भक्ती केली तरी ती होणार त्याच परमेश्वराची, पण ती विधीपूर्वक नसते असे भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत अध्याय ९ श्लोक २३ मध्ये सांगितले आहे. अशी भक्ती केल्याने काय होते ते भगवान् श्रीकृष्णांनी सांगितले आहे –
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित: ।। – अध्याय ८ श्लोक ६
अर्थ – मृत्यूसमयी ज्या ज्या भावाचे (देवता, पितर इत्यादीचे) स्मरण करत शरीर सोडतो, नेहमी त्याच भावाचे चिंतन राहिल्याने त्या भावाला प्राप्त होतो.
पुन्हा भगवान् श्रीकृष्णांनी सांगितले आहे –
यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रता:।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोपि माम् ।। – अध्याय ९ श्लोक २५
अर्थ – देवतेची उपासना त्या देवतेसाठी ठरलेल्या पद्धतीनुसार करणारे त्या देवतेला प्राप्त होतात. पितरांसाठी श्राद्ध इत्यादी क्रियापरायण पितृभक्त पितरांना प्राप्त होतात. भूतांची उपासना करणारे षोडशमातृकागण इत्यादी भूतगणांना प्राप्त होतात, पण माझे पूजन करणारे मलाच प्राप्त होतात.
म्हणजे अशा प्रकारची भक्ती जरी श्रद्धेने केली तरी परमात्म्याची प्राप्ती होत नाही.
विधीपूर्वक भक्ती – भगवान् श्रीकृष्णांनी गीतेतील जवळजवळ प्रत्येक अध्यायात वेगवेगळे योग सांगतांना भक्तीचाही उल्लेख केला आहे. उदा. भक्तांनी अर्पित केलेले पान, फूल, जल इत्यादी ते स्वीकारतात (अध्याय ९, श्लोक २६), पण प्रत्येक अध्यायात आचरण कसे असले पाहिजे हे त्यांनी सांगितले आहे. मग भक्तीने जर ईश्वर प्रसन्न होत असेल तर आणखी आचरणाविषयी का सांगितले?
जवळजवळ प्रत्येक अध्यायात भक्ती सांगितली असली तरी बारावा अध्याय केवळ भक्तीवर आहे, भक्तीयोग सांगितला आहे, अध्यायाचे नावच ‘भक्तीयोग’ आहे. त्यात कुठेही भगवान् श्रीकृष्णांनी माझ्या रूप-गुणांचे गान ऐका (श्रवण), माझ्या लीलांचे कीर्तन करा (कीर्तन), माझ्या नामाचा जप करा (स्मरण) इत्यादी नवधा भक्तीचा आणि मधुरा भक्तीचा उल्लेख सुद्धा केलेला नाही. मन ईश्वरात लावायला सांगितले आहे, पण ते सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून म्हणजे कर्मांच्या फळांचा त्याग करून (अध्याय १२ श्लोक ६). श्लोक ८ ते १२ मध्ये मन आणि बुद्धीवर नियंत्रण मिळवण्याचे वेगवेगळे उपाय सांगितले आहेत. मुख्यत: काय सांगितले आहे, ते श्लोक १३ ते १९ मध्ये पाहावे. ममताराहित्य; अहंकार नसणे; सुख-दु:ख, मान-अपमान, निंदा-स्तुतीमध्ये समता; इच्छा नसणे; शुचिता इत्यादी चित्तशुद्धी सांगितली आहे आणि ‘असे भक्त मला प्रिय आहेत’ हे श्लोक १४, १५, १६, १७ ,१९ मध्ये पुन्हा पुन्हा सांगितले आहे. इतर, म्हणजे पूजा करणे, निरांजन ओवाळणे, आरत्या म्हणणे, नैवेद्य दाखवणे, जप, तीर्थयात्रा इत्यादींचा उल्लेखसुद्धा नाही. केवळ चित्तशुद्धी ही उच्चभक्ती परमेश्वराशी योग करवील, हा आहे भक्तीयोग.
गीतेतील अध्याय १८ श्लोक ४९, ५० पाहावेत. अनासक्त, इच्छारहित, नैष्कर्म्यसिद्ध (कर्मफलाचा त्याग केलेला) मनुष्य ब्रह्म प्राप्त करतो, ती ज्ञानाची परानिष्ठा आहे. पुढे श्लोक ५१,५२ मध्ये चित्तशुद्धीविषयी सांगून श्लोक ५३ मध्ये म्हटले आहे –
अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।
विमुच्य निर्मम: शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते।।
अर्थ – अहंकार, बळ (इच्छा आणि आसक्तीप्रेरित सामर्थ्य), गर्व, काम, क्रोध (आणि) संग्रहाचा त्याग करून ममतारहित, शांत झालेला, ‘ब्रह्म’शी एकरूप होण्याच्या योग्य होतो.
त्यापुढे भगवान् श्रीकृष्ण सांगतात –
ब्रह्मभूत:प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति।
सम:सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ।। – अध्याय १८ श्लोक ५४
अर्थ – ब्रह्मरूप होण्याची योग्यता प्राप्त झालेला, प्रसन्नचित्त मनुष्य न शोक करतो न कसली इच्छा करतो. सर्व प्राण्यांमध्ये समभाव असलेल्या अशा मनुष्याला माझी पराभक्ती (परमभक्ती) प्राप्त होते.
आधीच्या श्लोकांमध्ये केवळ चित्तशुद्धी सांगून, अशा शुद्धचित्त आणि ब्रह्मरूप होण्याची योग्यता असलेल्या मनुष्याला पराभक्ती प्राप्त होते, असे स्पष्ट म्हटले आहे. त्यापुढे भगवान् श्रीकृष्ण सांगतात –
भक्त्या ममाभिजानाति यावान्यश्र्चास्मि तत्त्वत:। ङ
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ।। – अध्याय १८ श्लोक ५५
अर्थ – पराभक्तीने मला तत्त्वत: मी जसा आणि जो आहे ते चांगल्या प्रकारे जाणतो आणि नंतर मला तत्त्वत: जाणून माझ्यात तत्काळ प्रवेश करतो.
हे जे सांगितले आहे ते अधिक स्पष्ट समजून घेऊया. इथे भगवान् श्रीकृष्णांनी त्यांना तत्त्वत: जाणण्याविषयी सांगितले आहे. एकाच श्लोकात ‘तत्त्वत:’चा दोनदा उल्लेख तत्त्वत: जाणण्याच्या महत्त्वाला अधोरेखित करतो. ईश्वराला तो जो आणि जसा आहे हे जाणणे, तत्त्वत: जाणणे, म्हणजे ईश्वराचे वास्तविक स्वरूप जाणणे. खरोखर असणे, ज्ञान (जाणीवकळा, चैतन्य) आणि अनन्तत्व हे ईश्वराचे स्वरूप आहे. तो अव्यक्त, अक्षर, अविकारी, गुणातीत, सर्वव्यापी आहे. मनुष्याचा शुद्ध आत्मा ईश्वराचाच अंश असल्याने चित्त पूर्णपणे शुद्ध झाल्यावर आपल्या शुद्ध आत्म्याचे स्वरूप आणि ईश्वराचे स्वरूप एकच असल्याचे ज्ञान, बोध होतो. ही ज्ञानाची परानिष्ठा – पराकाष्ठा आहे, जी पराभक्तीने प्राप्त होते आणि त्यामुळे तो तत्काळ ईश्वराशी एकरूप होतो.
भगवद्गीता अध्याय ७ श्लोक १६, १७, १८ मध्ये भगवान् श्रीकृष्ण आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे भक्तांचे चार प्रकार सांगून ‘ज्ञानी त्वात्मैव मे मतम्’ असे म्हणतात. म्हणजे ‘परंतु ज्ञानी माझे स्वरूपच आहे’ असे सांगतात.
प्रभू श्रीरामांनीसुद्धा हेच सांगितले आहे. ते आपली आई कौसल्येला सांगतात-
तावन्मामर्चयेत् देवं प्रतिमादौ स्वकर्मभि:।
यावत्सर्वेषु भूतेषु स्थितं चात्मनि न स्मरेत् ।। – अध्यात्मरामायण, काण्ड ७, सर्ग ७, श्लोक ७६
अर्थ – म्या देवाची प्रतिमा इत्यादींमध्ये स्वकर्मांनी (विविध अनुष्ठाने इत्यादींनी) तोपर्यंतच पूजा करावी, जोपर्यंत सर्व प्राणीमात्रांमध्ये आणि स्वत:त असलेल्या मला (श्रीरामांना) जाणता येत नाही.
अशी अनेक उद्धरणे देता येतील पण लेखाचा विस्तार वाढेल म्हणून केवळ एकच उद्धरण आणखी देतो.
आद्य शंकराचार्य सांगतात –
मोक्षकारणसामग्र्यां भक्तिरेव गरीयसी ।
स्वस्वरूपानुसंधानं भक्तिरित्यभिधीयते ।। – विवेकचूडामणी, श्लोक ३१
अर्थ – मोक्षप्राप्तीसाठी लागणार्या सामग्रीत भक्तीच श्रेष्ठ आहे. स्वत:च्या स्वरूपाशी अनुसंधान (स्वरूपाचे सतत भान) असणे, ह्याला ‘भक्ती’ (पराभक्ती) म्हणतात. स्वस्वरूपाशी अनुसंधान ठेवावे लागत नाही, अनुसंधान राहते.
प्रचलित जप, पूजा इत्यादी भक्ती – मूर्तीपूजा, जप, तीर्थयात्रा इत्यादी करणे व्यर्थ नाही. बहुतेक सर्व मनुष्यांची चित्तशुद्धी झालेली नसते आणि त्यांना ईश्वराच्या वास्तविक स्वरूपाचे आकलन झालेले नसते. गुरु, संत वगैरे मंडळी आपल्या अशा भक्तांना एखाद्या देवतेचा जप करायला, काही विशिष्ट उपासना करायला सांगतात. गुरूंचा उद्देश हा असतो की हळूहळू भक्तांमध्ये सत्वगुण वाढावा. त्यांच्यातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू; अहंकार आणि ममता उणावत जावेत; हळूहळू त्यांची चित्तशुद्धी होत जावी. चित्तशुद्धीत प्रगती होत गेल्यावर पुढचे पुढचे उमगण्याची शक्यता वाढत जाते.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
– अनंत आठवले
८.५.२०२६
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !
शांत, स्थिर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असलेले अकलूज येथील श्री. विष्णु जाधव !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
अध्यात्माचे अनंतत्त्व !