‘३.७.२०२६ या दिवशी रत्नागिरी येथील नामवंत वैद्य मंदार भिडे (वय ५१ वर्षे) यांचे हृदयविकाराने मुंबई येथील सायन रुग्णालयात निधन झाले. १४.७.२०२६ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त रत्नागिरी येथील साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सौ. शुभांगी मुळ्ये
१ अ. ‘वैद्य मंदार भिडे यांची साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी होती.
१ आ. ‘वैद्य भिडे हे एक शांत, संयमी आणि मितभाषी असे व्यक्तीमत्त्व होते.
१ इ. इतरांना साहाय्य करणे : आजच्या काळात वैद्य भिडे यांच्यासारखी माणसे मिळणे पुष्कळ दुर्मिळ आहे. ते रुग्णसेवेला देवकार्य मानून सर्वांना साहाय्य करत असत.
१ ई. अहं अल्प असणे : ते प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य असूनही दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण नियमित आणि सेवाभावाने करत.
१ उ. वैद्य भिडे यांच्याकडे रोगाचे अचूक निदान करण्याची दैवी शक्ती होती.’
२. श्री. गणेश घडशी
२ अ. कावीळ झाल्याने मुलगा पुष्कळ अशक्त होणे आणि डोळे उघडूनही पाहू न शकणे अन् वैद्य मंदार भिडे यांच्या उपचारांनी तो ४ दिवसांत चालू लागणे : ‘माझा मुलगा कु. ऋषिकेश १० वर्षांचा होता. एकदा त्याला कावीळ झाली होती. एका आधुनिक वैद्यांच्या रुग्णालयात ८ दिवस भरती होऊनही त्याला तेथे बरे वाटले नाही. तेथील आधुनिक वैद्यांनी ‘तो कधीही बेशुद्ध पडू शकतो’, असे म्हणून त्याला कोल्हापूर किंवा मुंबई येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेव्हा वैद्य भिडे यांना समजल्यावर ते त्वरित रुग्णालयात आले आणि त्यांनी सांगितले, ‘‘याला घरी घेऊन जा. मी याला ८ दिवसांत बरे करतो. त्याला काहीही झाले, तर त्याचे दायित्व मी घेतो.’’ त्यांच्या उपचाराने माझ्या मुलाला पूर्णपणे बरे वाटले. ऋषिकेश पुष्कळ अशक्त झाला होता आणि तो डोळे उघडूनही पाहू शकत नव्हता. तो ४ दिवसांत चालू लागला.’ हे केवळ वैद्य मंदार भिडे यांच्या औषधोपचाराने शक्य झाले.’
३. सौ. प्रिया घडशी
३ अ. वैद्य मंदार भिडे यांनी सांगितलेल्या पथ्य पाळल्यामुळे साधिका पूर्णतः बरी होणे : ‘मी २ वेळा पुष्कळ रुग्णाईत होते. मला अन्न जात नसल्याने १ मास काही खाता-पिता येत नव्हते. त्यामुळे मला पुष्कळ अशक्तपणा आला होता. मी सतत झोपूनच होते. वैद्य मंदार भिडे यांनी मला काही पथ्य पाळण्यास सांगितले. त्यांनी सांगितलेले पथ्य पाळल्यामुळे मी पूर्णपणे बरी झाले.’
४. श्रद्धा गणेश घडशी
४ अ. वैद्य मंदार भिडे यांनी अचूक निदान केल्याने साधिका बरी होणे : ‘वर्ष २०१६ मध्ये मी रुग्णाईत होते. मला श्वास घ्यायला त्रास होत असे. एका आधुनिक वैद्यांकडे गेले, तर त्यांनी मला मी मनोरुग्ण असल्याचे सांगितले आणि मला इतर आधुनिक वैद्यांकडे जाण्यास सांगितले. तेथे मी २ दिवस रुग्णालयात भरती होते; मात्र मला बरे वाटले नाही. मी घरी आल्यावर मला पुन्हा तसाच त्रास होऊ लागला. नंतर मी वैद्य भिडे यांच्याकडे गेले. त्यांनी अचूक निदान करून ‘माझी नाभी सरकली आहे’, असे मला सांगितले. मी त्यांच्या उपचारांनी बरी झाले.’
५. सौ. मधुरा मच्छिंद्र खेराडे
५ अ. साधिकेचे भाजलेले दोन्ही हात वैद्य मंदार भिडे यांनी सांगितलेल्या घरगुती उपचारांनी बरे होणे आणि हातांची त्वचाही पूर्ववत् होणे : ‘वर्ष २०१२ मध्ये मी बंब पेटवत असतांना अग्नीने काही प्रमाणात वितळलेले आणि गरम झालेले प्लास्टिक वार्याने उडून माझ्या दोन्ही हातांवर येऊन पडले आणि माझे दोन्ही हात भाजले. त्या वेळी वैद्य भिडे यांनी घरगुती उपचार सांगून माझे दोन्ही हात बरे केले, तसेच माझ्या दोन्ही हातांची भाजलेली त्वचाही पूर्ववत् झाली.
५ आ. साधिकेचे पुष्कळ न्यून झालेले हिमोग्लोिबन वैद्य मंदार भिडे यांनी दिलेले औषध आणि पथ्य पाळल्यामुळे एका मासात आवश्यक तेवढ्या प्रमाणात वाढणे : माझे हिमोग्लोबिनचे प्रमाण ३ ग्रॅम/डेसिलिटर पर्यंत न्यून झाले होते. (स्त्रियांमध्ये ते १२.१ ते १५.१ ग्रॅम/ डेसिलिटर ‘g\dl’ हवे.) त्या वेळी मला इतर आधुनिक वैद्यांनी लगेच रुग्णालयात भरती होण्यास सांगून तुम्हाला अन्य व्यक्तीचे रक्त द्यावे लागेल’, असे सांगितले. तेव्हा मी तेथे न थांबता घरी आले. नंतर मी वैद्य मंदार भिडे यांच्याकडे गेले. त्यांनी मला औषध देऊन काही पथ्य पाळण्यास सांगितले. त्यांचे औषध आणि पथ्य पाळून एका मासात माझे हिमोग्लोबिन आवश्यक तेवढ्या प्रमाणात वाढले.
५ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणे : २ वर्षांपूर्वी मला श्वास घ्यायला त्रास होत होता, तसेच मला पुष्कळ अशक्तपणा होता. त्या वेळी वैद्य भिडे यांनी स्वतःजवळील औषधे दिली आणि उत्तरदायी साधकांना नामजपादी उपाय विचारून घ्यायला सांगितले. त्यानंतर २ दिवसांत मी पूर्ण बरी झाले.’ त्या वेळी वैद्य भिडे म्हणाले, ‘‘तू केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमुळेच बरी झाली आहेस.’’
६. सौ. स्नेहा ताम्हनकर
६ अ. साधकांसाठी सर्व काही करण्याची सिद्धता असणे : ‘वर्ष २०२२ मध्ये रत्नागिरी येथील साधिका कै. (श्रीमती) अनुपमा परांजपे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचे निधन झाल्यावर तेथील काही साधिका आणि वैद्य मंदार भिडे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते. कै. (श्रीमती) परांजपे यांना मूलबाळ नव्हते. त्यांना अग्नी देण्यासाठी त्यांचे कुणी पुरुष नातेवाईक तेथे उपस्थित नव्हते. त्या वेळी वैद्य भिडे यांनी त्यांना अग्नी दिला.
६ आ. कोरोनाच्या कालावधीत वैद्य मंदार भिडे यांनी रत्नागिरी येथील साधकांना त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे आधार देणे : कोरोनाच्या कालावधीत आमच्याकडे मी, माझे यजमान श्री. रूपेश ताम्हनकर आणि सासूबाई सौ. रोहिणी ताम्हनकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६३ वर्षे) आम्हा तिघांनाही कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्या वेळी वैद्य मंदार भिडे यांनी आम्हाला पथ्य सांगून १४ ते २० दिवसांत पूर्णपणे बरे केले. त्यांचा आध्यात्मिक त्रास जाणण्याचा भागही चांगला होता. त्यांनी आम्हाला उत्तरदायी साधकांनी सांगितलेले नामजपादी उपाय आणि वैद्यकीय उपचार चालू ठेवण्यास सांगितले. सर्व उपचार केल्यावर काही दिवसांनी आम्हाला बरे वाटले. या संपूर्ण कालावधीत वैद्य मंदार भिडे आमच्याकडे काही दिवस प्रतिदिन येत होते. त्या कालावधीत सर्वच साधकांना वैद्य भिडे यांचा मोठा आधार होता. अनेक रुग्णांच्या कुटुंबातील ते एक सदस्य बनले होते.
६ इ. साधिकेच्या आईचे निधन झाल्यावर सर्व सेवा पुढाकार घेऊन करणे : माझ्या आईचे (सौ. प्रणाली जोशी, आध्यात्मिक पातळी ६० टक्के) निधन झाले, तेव्हा वैद्य भिडे माझ्या समवेत होते. मी त्यांना रुग्णालयात आधुनिक वैद्यांना भेटण्यास सांगितले. नंतर मला आईचे निधन झाल्याचे रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी सांगितले. त्या वेळी वैद्य भिडे यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला धीर दिला. त्यानंतर त्यांनी स्वतःच अंत्यसंस्कारांसाठी लागणारा दाखला सिद्ध करून आणून दिला. त्या दिवशी सगळे विधी होईपर्यंत त्यांनी आम्हाला साहाय्य केले.
६ ई. साधिकेला आधार वाटणे : मी रुग्णाईत असतांना वैद्य भिडे यांच्याकडे गेल्यानंतर ते प्राथमिक तपासणी करून औषधे देऊन पथ्य सांगत असत. उर्वरित वेळ ते समाज, राष्ट्र, धर्म, आंतरराष्ट्रीय घटना, निसर्ग, आयुर्वेद आदींविषयी माझ्याशी बोलायचे. त्यामुळे काही वेळ माझे मन रुग्णाईत स्थितीतून आपोआपच दूर होत असे. माझी प्रकृती ठीक नसतांना वैद्य भिडे घरी येऊन गेले, तरी मला बरे वाटायचे.
६ उ. साधिकेच्या अर्धांगवायू झालेल्या सासर्यांना सर्वतोपरी वैद्यकीय आणि मानसिक साहाय्य करणे : माझे सासरे (श्री. रमेश ताम्हनकर, वय ६७ वर्षे) यांना २०२२ मध्ये अर्धांगवायूचा झटका आला होता. त्या वेळी त्यांना देवगड येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. ते रुग्णालयातून ६ दिवसांनी घरी आले. तेव्हा आमच्या काही नातेवाइकांसह सासर्यांना रत्नागिरीला आणण्यासाठी वैद्य भिडेही आले होते. ते समवेत असल्यामुळे मला अडीच घंट्यांच्या प्रवासाचा ताण आला नाही. ‘सासर्यांना मानसिक स्तरावर आधार मिळावा’, त्यांच्यामध्ये ‘आपण जलद गतीने बरे होणार आहोत, असा आत्मविश्वास निर्माण व्हावा’, यासाठी ते पुढील दीड मास प्रतिदिन येऊन सासर्यांची विचारपूस करत होते.
६ ऊ. अहं अल्प असणे
१. वैद्य भिडे उच्चशिक्षित वैद्य असूनही त्यांना अहंकार नव्हता. आम्हाला बरे नसल्यास किंवा एखाद्या कुटुंबात कुणी औषध आणायला जाऊ शकत नसल्यास ते साधक किंवा इतर रुग्ण यांच्यासाठी औषध आणून देत असत.
२. सनातनच्या विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने त्या त्या वेळी उपलब्ध असलेली सेवा वैद्य भिडे मनापासून करत असत. ‘ते सेवा करत असतांना स्वतः वैद्य आहेत’, असे कधीही सांगत नसत.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ४.७.२०२६)
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘स्वीकारण्याची वृत्ती’ या विषयावर केलेले मार्गदर्शन ऐकून साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला झालेले लाभ !
श्रीरामरक्षास्तोत्रात ‘एकटेपणा जाणवणे’ आणि ‘असुरक्षित वाटणे’ या समस्यांच्या निवारणाचा उपाय असणे
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !