Islamized Britain: ब्रिटनचे इस्लामीकरण होत असल्याने भारतासह अनेक देशांचे लोक स्वदेशात परतत आहेत !

‘लंदनिस्तान’ ?

लंडन (ब्रिटन) – एकेकाळी ब्रिटनमध्ये स्थायिक होण्यासाठी भारतियांमध्ये स्पर्धा असायची, आज त्याच ब्रिटनमधून स्वदेशी परतणार्‍यांमध्ये भारतीय प्रथम क्रमांकावर  आहेत. ब्रिटनच्या सरकारी आकडेवारीनुसार भारतीय विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग विक्रमी संख्येने मायदेशी परतत आहेत. यामागे अन्य कारणांसह लंडनचे ‘लंडनिस्तान’ (इस्लामीकरण) होणे, हेही एक महत्त्वाचे कारण आहे. यामुळे तिथे रहाणार्‍या सुशिक्षित आणि शांतताप्रिय भारतियांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

१. ब्रिटनच्या ‘ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स’कडून समोर आलेल्या ताज्या अहवालात सरकारी आकडेवारीनुसार केवळ २०२५ या वर्षात अनुमाने ५१ सहस्र भारतीय विद्यार्थी आणि २१ सहस्र भारतीय कर्मचारी ब्रिटनला कायमचा निरोप देऊन भारतात परतले. म्हणजेच एका वर्षात ७२ सहस्रांहून अधिक भारतियांनी ब्रिटन सोडले.

२. भारतियांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या स्थलांतरामुळे ब्रिटनमध्ये येणार्‍या एकूण स्थलांतरितांचे प्रमाण १ लाख ७१ सहस्रांवर पोचले आहे, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास अर्धे आहे. भारतियांनंतर ब्रिटन सोडणार्‍यांमध्ये चिनी नागरिक दुसर्‍या क्रमांकावर आहेत. ४६ सहस्र चिनी नागरिकांनी ब्रिटन सोडले आहे. चीननंतर युक्रेन आणि नायजेरिया या देशांतील लोकांचा क्रमांक लागतो.

काय आहे ‘लंदनिस्तान’ ?

गेल्या काही वर्षांत ब्रिटनच्या अनेक मोठ्या शहरांची लोकसंख्या रचना वेगाने पालटली आहे. कट्टरतावाद आणि पाकिस्तानी मुसलमानांची वाढती लोकसंख्या यांमुळे ब्रिटनचे अनेक भाग आता ‘लंडनिस्तान’ म्हणून अपकीर्त होत आहेत. तिथे होणारी हिंसक आंदोलने, ग्रूमिंग गँग (मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणार्‍या टोळ्या), रस्त्यांवरील धार्मिक घोषणाबाजी आणि ब्रिटीश संस्कृतीवर वर्चस्व गाजवणारा कट्टरतावाद तिथे रहाणार्‍या शांतताप्रिय भारतीय समाजाला घाबरवत आहे.
अलीकडच्या काळात ब्रिटनमध्ये हिंदू आणि भारतीय वंशाचे लोक यांना लक्ष्य करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. अशा वातावरणात भारतीय कुटुंबे, विशेषतः स्वतःच्या मुलींच्या आणि मुलांच्या भविष्याविषयी अत्यंत चिंतित आहेत. अशा असुरक्षित वातावरणात रहाण्यापेक्षा सुरक्षित आणि वेगाने प्रगती करणार्‍या भारतात परतणे त्यांना अधिक योग्य वाटत आहे.

ब्रिटनमध्ये महागाईचा दुहेरी मारा ! 

दुसरे सर्वांत मोठे कारण ब्रिटनची ढासळलेली अर्थव्यवस्था, हे आहे. ब्रिटनमध्ये सध्या महागाई गगनाला भिडली आहे. घराचे भाडे भरणे असो, विजेचे देयक भरणे असो किंवा शिधा खरेदी करणे असो, सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागली आहे. आखाती देशांतील संकटानंतर तिथे तेल आणि गॅस यांच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की, सामान्य नोकरदार वर्गाला जगणे कठीण झाले आहे. भारतीय विद्यार्थी लाखो रुपयांचे कर्ज काढून ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जातात; परंतु तिथे रहाण्याचा खर्च इतका वाढला आहे की, अर्धवेळ नोकरीच्या आधारेही ते स्वतःला सावरू शकत नाहीत.

ब्रिटीश सरकारकडून स्थलांतराचे नियम कठोर !

ब्रिटीश सरकारने स्थलांतरितांविषयी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. नवीन  नियमांमुळे आता परदेशी विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यावर अनेक निर्बंध लादले गेले आहेत. पूर्वी भारतीय विद्यार्थी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिथे सहज वर्क व्हिसा’ (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारे अधिकृत कागदपत्र किंवा शिक्का) मिळवत असत आणि कुटुंबालाही समवेत ठेवू शकत होते; परंतु आता ब्रिटीश सरकारने हे नियम इतके कडक केले आहेत की, व्हिसा नूतनीकरण करणे कठीण झाले आहे. नियमांमधील या कठोरतेने भारतियांना जाणीव करून दिली आहे की, ब्रिटन आता परदेशी लोकांचे स्वागत करण्याच्या मनस्थितीत नाही.