तापमानातील सध्याची वाढ आणि दुसरीकडे अंदमानात वेळेआधीच पोचलेला ‘मान्सून’ (मोसमी पाऊस) पहाता आपण सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. हवामानातील या संमिश्र काळाला आयुर्वेदात ‘ऋतूसंधी’ म्हटले जाते. एका ऋतूचा शेवट आणि दुसर्या ऋतूचा प्रारंभ होण्याचा हा मधला काळ, निसर्गासह स्वतःच्या शरिरासाठीही मोठ्या पालटाचा असतो. सध्या ग्रीष्म, म्हणजेच उन्हाळा संपून वर्षा, म्हणजेच पावसाळा चालू होत आहे. या काळात वातावरणात अचानक पालट होतात. एका बाजूला कडक ऊन असते, तर दुसरीकडे ढगाळ हवामान आणि हवेतील दमटपणा वाढू लागतो.
या पालटाचा थेट परिणाम स्वतःच्या शरिरावर होतो. या दिवसांत शरिरातील वात दोष वाढायला लागतो आणि पचनशक्ती, म्हणजेच जठराग्नी कमालीचा मंदावतो. त्यामुळेच सध्या आमच्याकडे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आणि पोटाचे विकार घेऊन येणारे रुग्ण अधिक दिसत आहेत. या ऋतूसंधीच्या काळात आजारपणापासून दूर रहाण्यासाठी आयुर्वेदाने आहारात आणि जीवनशैलीत काही विशेष पालट करायला सांगितले आहेत.

काय काळजी घ्याल ?
१. या काळात सर्वांत महत्त्वाची काळजी आहाराची घ्यायची असते. पचनशक्ती कमकुवत झाल्यामुळे पचायला जड असलेले पदार्थ पूर्णपणे टाळावेत. त्याऐवजी ताजे, गरम आणि मऊ अन्न खावे. मूग डाळीचे कढण, खिचडी, मऊ भात किंवा साळीच्या लाह्यांचे पाणी म्हणजेच लाजा मंड या दिवसांत शरिराला शक्ती देण्यासाठी आणि पोटाला आराम देण्यासाठी उत्तम ठरतात.
२. शीतकपाटामधील (फ्रीजमधील) अतीथंड पाणी, बर्फ किंवा शीतपेये (कोल्ड्रिंक्स) पिणे पूर्णपणे टाळावे; कारण यामुळे पचनशक्ती आणखी मंदावते आणि कफ वाढतो.

३. या ऋतू पालटाच्या काळात शरिरातील वाढणारा वात शांत करण्यासाठी आहारात देशी गायीच्या साजूक तूपाचा वापर थोडा वाढवावा; मात्र अतीतिखट आणि तळलेले पदार्थ खाणे (विशेषतः मांसाहार) टाळावे.
४. आहारासह स्वतःच्या दैनंदिन सवयींमध्येही काही पालट करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात दुपारची झोप घेण्याची सवलत असली, तरी ऋतूसंधी आणि पावसाळा जवळ येतांना दुपारी झोपणे टाळावे. दुपारच्या झोपेमुळे शरिरात कफ आणि पित्त वाढते, ज्याने अपचनाचा त्रास चालू होतो, तसेच रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने शरिरात कोरडेपणा वाढून वात दोष बिघडतो; म्हणून वेळेवर झोपणे हितकारक ठरते.
५. सध्या पडणार्या मान्सूनपूर्व किंवा प्रारंभीच्या पावसात भिजण्याचा मोह टाळावा; कारण या हवेत संसर्ग पसरवणार्या जंतूंचे प्रमाण अधिक असते आणि भिजल्यामुळे लगेच ताप अथवा सर्दी होऊ शकते. पाऊस चालू झाल्यावर संध्याकाळच्या वेळी घरात गुग्गुळ, ओवा किंवा कडुनिंबाच्या पानांची धुरी द्यावी, ज्यामुळे हवेतील दमटपणामुळे वाढणारे डास आणि जंतू नष्ट होतात.

निसर्गाच्या या पालटत्या रूपाशी जुळवून घेण्यासाठी शरिराला सज्ज करणे आणि जुन्या सवयी हळूहळू पालटून सुपाच्य (सहज पचणारे) गोष्टींचा स्वीकार करणे, हाच ऋतूसंधीचा खरा नियम आहे. स्वतःची काळजी घ्या आणि ‘निरोगी रहा !’
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (२४.५.२०२६)
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?