तीर्थक्षेत्रासम चैतन्याची अनुभूती देणारा मुंबई येथे झालेला राजमातंगी महायज्ञ !

कमळावर आरूढ असलेल्या श्री राजमातंगी देवीचे प्रचलित चित्र

१. यज्ञस्थळाविषयी जाणवलेली सूत्रे

अ. ‘मुंबईतील नर्दुल्ला टँक मैदानात सनातन संस्थेने आयोजित केलेला राजमातंगी महायज्ञ होत होता. ते स्थळ एकदम चैतन्यमय जाणवत होते.

आ. तेथून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत होती.

इ. यज्ञस्थळ एखाद्या तीर्थक्षेत्रासारखे वाटत होते, तसेच ‘तेथे देवतांची सभा भरली आहे’, असेही मला जाणवत होते.

 २. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे पाहून ‘स्वर्गातून दोन देवी यज्ञस्थळी आल्या आहेत’, असे मला जाणवले.

आ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चेहर्‍यावर पुष्कळ तेज दिसत होते आणि ‘देवीच प्रगट झाली आहे’, असे जाणवून ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे मला वाटत होते.

श्रीमती शशिकला भगत

३. पुरोहितांविषयी जाणवलेली सूत्रे

अ. यज्ञस्थळी ‘यज्ञाला बसलेले सर्व पुरोहित हे देवतांचे दूत असून देवतांनी त्यांना यज्ञ करण्यासाठी पृथ्वीवर पाठवले आहे’, असे मला जाणवले.

आ. ‘यज्ञाचे पौरोहित्य करणारे सगळे ऋषिमुनीच आहेत’, असे त्यांच्याकडे पाहून मला जाणवत होते. ते ऋषिमुनींप्रमाणे तन्मय होऊन यज्ञ करत होते. हे पाहून माझी भावजागृती होत होती.

इ. ‘यज्ञस्थळी सजवलेले व्यासपीठ, म्हणजे जणू श्री राजमातंगीदेवीचा दरबारच आहे’, असे मला जाणवले. ‘व्यासपिठावरून पुरोहित जे मंत्रपठण करत होते, त्याचे चैतन्य सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.

ई. मला यज्ञात आहुती देणारे पुरोहित शक्तिमान हनुमानासारखे आणि अन्य पुरोहित वानरसेनेसारखे वाटत होते.

४. ‘मी यज्ञस्थळीच बसलेले आहे’, असे मला जाणवत होते. इतके चैतन्यमय वातावरण देवद आश्रमातही जाणवत होते.

५. ‘श्री राजमातंगीदेवीचा यज्ञ पृथ्वीवर होत नसून स्वर्गातच चालू आहे’, असे मला वाटले.

६. यज्ञासाठी ५ घंटे एका जागेवर बसूनही मला कोणताच त्रास झाला नाही. ‘यज्ञस्थळातील चैतन्य आणि ऊर्जा यांमुळे मला एवढा वेळ बसता आले’, असे मला जाणवले.

७. ‘या यज्ञाचे चैतन्य सर्वत्र पसरत आहे. या यज्ञाचा भारत देशाला आणि भारतियांना नक्कीच लाभ होणार आहे. साधक आणि हितचिंतक यांचे रक्षण होणार आहे’, याविषयी माझी निश्चिती झाली.’

– श्रीमती शशिकला भगत (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक