रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील श्री हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालतांना साधिकांना आलेल्या अनुभूती !

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमामधील श्री हनुमानाची मूर्ती

१. सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), फोंडा, गोवा.

सुश्री (कु.) तेजल अशोक पात्रीकर

१ अ. हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालत असतांना ‘साक्षात् हनुमंताच्या पावलांचे ठसे उमटले आहेत’, असे जाणवणे : ‘२५.४.२०२६ या दिवशी, म्हणजे शनिवारी रात्री ८.३० ते ९ या कालावधीत आम्ही (मी आणि सौ. भक्ती कुलकर्णी) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील श्री हनुमान मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालत होतो. त्या पूर्वी नुकताच जोराचा पाऊस पडला होता. त्यामुळे मंदिराभोवतीच्या प्रदक्षिणामार्गावरील भूमी ओली झाली होती. आम्ही प्रदक्षिणा घालत असतांना काही वेळानंतर आम्हाला ओल्या भूमीवर कोरड्या पावलांचे ठसे दिसले. ते ठसे आकाराने मोठे होते. हनुमान मंदिराच्या अर्धवर्तुळाकार भागात कुणीतरी चालत गेल्यावर जसे ठसे उमटतील, त्याप्रमाणे ते होते. ते पाहून आम्हाला आश्चर्य वाटले आणि क्षणभर वाटले, ‘साक्षात् हनुमंताच्या पावलांचे ते ठसे असावेत.’ तसा भाव ठेवूनच मी प्रदक्षिणा घालू लागले. नंतर तेथे बसून आम्ही दोघींनी ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ आणि ‘मारुतिस्तोत्र’ म्हटले. त्यानंतर आम्ही पावलांच्या ठशांविषयी एकमेकींशी बोललो. तेव्हा दोघींनाही तसेच जाणवल्याचे आमच्या लक्षात आले; परंतु ‘त्यांचे छायाचित्र काढावे’, हे आम्हाला सुचले नाही. अनुमाने १० ते १५ मिनिटांनी ते ठसे दिसेनासे झाले.

१ आ. पावलांचे ठसे उमटण्याच्या माध्यमातून हनुमंताची दैवी साक्ष मिळाली असल्याचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगणे : या ठशांविषयी आम्ही सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारले. तेव्हा त्यांनी सूक्ष्म परीक्षण करून सांगितले, ‘‘त्या पावलांची स्पंदने चांगली जाणवत आहेत, तसेच आज शनिवार, म्हणजे हनुमंताचाच वार आहे. त्यामुळे तुम्हाला ही हनुमंताची दैवी साक्षच मिळाली आहे.’’

‘हे श्री हनुमंता, या कलियुगातही तू तुझे अस्तित्व या पाऊलखुणांच्या माध्यमातून आम्हाला दाखवलेस’, याबद्दल आम्ही कोटीशः कृतज्ञ आहोत. ‘ज्याप्रमाणे तुझ्या हृदयात श्रीरामाविषयी अखंड भक्ती आहे, त्याप्रमाणे आमच्या हृदयात आमच्या श्रीरामरूपी गुरुदेवांविषयीची भक्ती सदोदित राहू दे’, अशी तुझ्या पावन चरणी प्रार्थना आहे.’

२. सौ. भक्ती कुलकर्णी, फोंडा, गोवा.

सौ. भक्ती कुलकर्णी

अ. ‘हनुमंताच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतांना माझ्या मनात विचार आला, ‘हनुमंता, तू मला सोडून कुठे जाणार नाहीस ना ?’ त्यानंतर मी हे विसरले. तेथे पावलांचे उमटलेले ठसे पाहिल्यावर ‘माझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर या ठशांच्या माध्यमातून हनुमंताने दिले’, असे माझ्या लक्षात आले.

आ. मी आणि कु. तेजल पात्रीकर याविषयी बोलत असतांना मला चांगली स्पंदने जाणवत होती.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २६.४.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.