५ ते ८ वर्षांच्या मुलांच्या पोटातून वायू सुटत असेल, तर कोणती काळजी घ्यावी ?

मुलाच्या योगासन वर्गामध्ये बैठक होती. वर्ग घेणार्‍या ताईंना लक्षात आलेल्या काही गोष्टी त्यांनी सगळ्यांसमोर मांडल्या. रुग्णांमध्ये आम्ही पहात असलेल्याच होत्या; पण एखाद्या वर्गामध्ये सांगायला लागावे, यावरून लहान मुलांमध्ये हे त्रास किती पटीत वाढले आहेत, हे अजून प्रकर्षाने जाणवले. योगासने करतांना वायू सुटणे, हे सामान्य असू शकते; पण मोठ्या माणसांच्या. ५ ते ८ वर्षांच्या मुलांच्या पोटातून लगेच वायू (गॅस) सुटत असेल, तर ते नक्कीच विचारात घ्यावे लागेल. या व्यतिरिक्त अनेक मुलांना आम्लपित्तसारखी लक्षणे होती. त्याचेच वेगळे रूप किंवा पुढे जाऊन रूपांतर हे अपचन, पोट साफ न होणे, गळू येणे, केस पांढरे होणे इथपर्यंत कुठल्याही स्वरूपात दिसू शकते. याविषयी बरीच काही सूत्रे आहेत; पण काही अगदी लक्ष ठेवून पहावीत, अशी सूत्रे जाणवली, ती येथे देत आहे.

कोणते पदार्थ टाळावेत ? आणि कोणते पदार्थ द्यावेत ?

१. हरभरा डाळीचे आणि कच्चे पदार्थ न्यूनतम ठेवा. पोळीभाजीचा डबा असतांना परत अर्धी काकडी, मोड आलेली कडधान्ये, गाजर द्यायची आवश्यकता नाही.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

२. गव्हाचा पास्ता कितीही भाज्या टाकून दिला, तरी जोपर्यंत तो ‘अल्फ्रेडो’ (मिल्क क्रीम घालून) किंवा ‘मॅक एन चीज’ (बटर, मैदा, दूध, चीज) घालून केला जाणार, तोपर्यंत ‘ॲसिडिटी’ (पित्त) आणि वायू (गॅस) हे त्रास होणारच आहेत.

३. मुलांच्या हाताशी काजू, बदाम, पिस्ते ठेवू नका. या सगळ्याने आम्लपित्तासह त्वचा विकार, गळू किंवा आपण गांध्या उठणे म्हणतो, हे दिसते. खजूर, बेदाणा, अंजीर, मनुके हे देता येईल.

४. ‘साखर नको’, असे म्हणत पौष्टिक लाडू ठामपणे टाळतांना बिस्कीट, नूडल्स, पॅकेटबंद अन्न, चीज आणि मैदा वेगवेगळ्या वेळी वारंवार सोय म्हणून देणे, हे कायमस्वरूपी त्रासदायक ठरू लागते.

५. उपाहारगृहामध्ये मेजवानी असली, तरीही मुलांचे जेवण घरी उरकून मग त्यांना नेणे चांगले. मुलांचे पोट परिपक्व नसल्याने त्यांच्या पोटातील ‘फ्लोरा’ (सूक्ष्म जीवाणू) या खाण्याने बिघडत जातो.

६. मुलांना बडबड न करता, वळवळ न करता जेवायची सवय लावणे चांगले. बडबड करत खाण्याने हवा पोटात जाते, यामुळे ढेकर/वायूचा त्रास चालू झालेला दिसतो. हीच गोष्ट सतत होणार्‍या सर्दी किंवा दमा असल्याने उघडे रहाणार्‍या तोंडाविषयी आहे.

७. सकाळची शाळा नसली, तर मुले लवकर उठत नाहीत. सकाळची शाळा असली की, घाई होते आणि हे गडबडले की, प्रातःविधीचे तंत्र बिनसते. शाळा नसली, तरी मुलांना किमान सकाळी ७ वाजेपर्यंत उठवून सकाळीच पोट साफ होईल, यासाठी प्रयत्न करावा.

८. मुलाचा कल सतत गोड खाण्याकडे असेल, त्याला वारंवार सर्दी खोकला होत असेल, दात किडत असतील, पोट फुगत असेल, शिंका येत असतील, त्वचा खराब होत असेल, तर केवळ पित्त किंवा वाढत्या सर्दी खोकल्यावर ‘अँटिबायोटिक्स’ (प्रतिजैविके) औषधे देत न रहाता आयुर्वेदपद्धतीत औषधे आणि समवेत कृमीनाशन (जंतनाशक) चिकित्सा विचारून करून घ्यावी. या औषधांनी बिघडलेला पोटातील जीवाणूंचा समतोल लांबपर्यंत वेगवेगळे त्रास चालू होतांना दिसतात. पाश्चात्त्य औषधे केवळ असलेल्या कृमींना मारतात; पण त्यांचे जीवनचक्र थांबवू शकत नाहीत, तसेच शरिराला कृमींना तोंड देण्यासाठी सक्षम बनवू शकत नाहीत. आयुर्वेद औषधात अशी औषधे आहेत, जी असलेल्या कृमींना न्यून करणे, नवीन कृमी होऊ नये म्हणून औषध आणि होत असलेल्या लक्षणांवर औषध अशा पद्धतीत सर्व बाजूने आजार थांबायला साहाय्य करतात.

९. जेवायच्या वेळी जेवण आणि मधल्या वेळेत काय खाल्ले पाहिजे, याविषयी पालकांनी आग्रही राहिले पाहिजे. जिथे आजी-आजोबा नातवंडे सांभाळतात, अशा घरात विशेषकरून ही नातवंडे आजी-आजोबांना रडण्याने सहज नमवतात. अशा वेळी आई-बाबांनी नियमाने खाता येईल, अशा खाऊचे प्रावधान करून ठेवणे आणि जेवणाच्या वेळी जेवणाचा आग्रह ठेवणे, हे महत्त्वाचे आहे. अशा खाऊमध्ये मखाणा, लाह्यांचा चिवडा, फळ, चिक्की, सकाळी करून ठेवलेला अधिकचा पराठा, घावन, दूध, खाकरा, खजूर असे काहीही देता येईल.

१०. जेव्हा धान्ये आणि फळे या मूलभूत अन्नावरच तंत्रज्ञानाचा घाला घातला जातो, त्यात सगळ्यात आधी नवीन पिढी भरडली जाणार, हे नक्की. ५ ते १० वर्षांतील मुले समोर जे दिसते, त्याप्रमाणे सवयी लावून घेतात. नुसत्या धाकापेक्षा हे पदार्थच त्यांना दिले नाहीत, तर पुढे या सवयी टिकायला साहाय्य होते.

‘आम्हाला लहानपणी कुठे काय झाले ? आणि कधीतरी चालते’, असे म्हणता म्हणता आठवड्यात किती वेळा वरील वर्गातील अन्नपदार्थ मुलांना दिले जातात, याकडे लक्ष ठेवले की, बर्‍याच गोष्टी स्वतःच स्वतःला समजत जातात. त्यातल्या त्यात या चुकांना आपल्यामुळे खतपाणी घातले जाऊ नये, हा डोळसपणा ठेवणे, हे दायित्व पालक म्हणून आपण घेतले, तर पुढच्या पिढीचे मोठे त्रास अल्प ठेवू शकू, असे नक्की वाटते !

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.