(म्हणे) ‘आम्ही भारताचे रणनीतिक भागीदार !’ : Marco Rubio

डॉ. एस्. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यात बैठक

नवी देहली – भारत आणि अमेरिका केवळ सहयोगी देश नाहीत, तर रणनीतिक भागीदार आहेत. दोन्ही देशांमधील संबंध एका क्षेत्रापुरते मर्यादित नाहीत, तर जगाच्या अनेक भागांमध्ये पसरलेले आहेत. दोन्ही देशांमध्ये आधीपासूनच भक्कम भागीदारी आहे आणि आता ती आणखी भक्कम करण्यावर काम केले जात आहे. भारत आणि अमेरिका हे जगातील दोन सर्वांत मोठे लोकशाही देश आहेत. दोन्ही देशांचे अनेक समान हितसंबंध आहेत. दोन्ही देशांमधील सहकार्य केवळ आशियापुरते मर्यादित नाही, तर जगाच्या इतर भागांमध्येही एकत्र काम करण्याच्या शक्यता आहेत, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केले. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्यासमवेत येथे झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर ते बोलत होते. या वेळी दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणि जागतिक सूत्रांवर सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली.

परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, सध्याची वेळ खूप गुंतागुंतीची आहे; परंतु भक्कम भागीदार असल्याने दोन्ही देश मोकळेपणाने आणि सकारात्मक चर्चा करण्यास सक्षम आहेत.

संपादकीय भूमिका

अमेरिका एक विश्‍वासघातकी देश असल्याने त्याच्या कोणत्याही विधानावर विश्‍वास ठेवता येणार नाही, हे भारताला आणि भारतियांना स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची कितीही विधाने केली, तरी त्यांचे महत्त्व शून्यच आहे !