Smart Border Project : पाकिस्तान आणि बांगलादेश येथून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट’ची घोषणा !

गृहमंत्री अमित शहा

नवी देहली – पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या सीमांमधून होणारी घुसखोरी कायमची रोखण्यासाठी केंद्रशासन लवकरच ‘स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट’ प्रारंभ करणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

सीमेवरील भागात अनैसर्गिक लोकसंख्याशास्त्रीय पालट होऊ दिले जाणार नाहीत !

सीमा सुरक्षा दलाच्या दीक्षांत समारंभात आणि ‘रुस्तमजी स्मृती व्याख्याना’त गृहमंत्री शहा म्हणाले की, देशाची सुरक्षा आता केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून राहू शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने भारताच्या सीमा पूर्णपणे ‘अभेद्य’ केल्या जातील. ‘स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट’ अंतर्गत सीमांवर ड्रोन, अत्याधुनिक रडार, हाय-टेक कॅमेरे आणि इतर प्रगत तंत्रज्ञान यांचा वापर केला जाईल. हा प्रकल्प चालू झाल्यानंतर सीमा सुरक्षा दलाचे काम अधिक सोपे, अचूक आणि भक्कम होईल. सरकारने केवळ घुसखोरी रोखण्याचाच नव्हे, तर देशात लपलेल्या प्रत्येक घुसखोराला शोधून बाहेर काढण्याचा संकल्प केला आहे. सीमेवरील भागात अनैसर्गिक लोकसंख्याशास्त्रीय पालट होऊ दिले जाणार नाहीत. घुसखोरीच्या माध्यमातून लोकसंख्या पालटण्याचे जे कारस्थान रचले जात आहे, ते सीमा सुरक्षा दलाने हाणून पाडले पाहिजे. सीमा सुरक्षा हे केवळ एका दलाचे दायित्व नसून ते संपूर्ण देशाच्या प्रादेशिक सुरक्षेशी जोडलेले आहे.