संपादकीय : झुरळ आणि बोध

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्याचा विदेशात बसलेल्या एका भारतीय (महाराष्ट्रातील) युवकाने हवा तसा अर्थ लावून वाईट वाटून घेतले आणि त्यानंतर नवा पक्ष स्थापन केला. ४-५ दिवसांत अनुयायांच्या संख्येत भाजपलाही मागे टाकणार्‍या नव्या पक्षाच्या उदयाच्या चर्चा जगभरात होऊ लागल्या. १५ मे या दिवशी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बनावट पदव्यांच्या आधारे नोकर्‍या मिळवणार्‍या युवकांना उद्देशून वक्तव्य केले, ज्यात त्यांनी अशा युवकांना ‘कॉकरोच’ अर्थात् झुरळ संबोधले. याचा वेगळा अर्थ घेतला गेल्याविषयी त्यांनी स्पष्टीकरणही दिले. याच कालावधीत बेरोजगार युवकांना ‘झुरळ’ म्हटल्यावरून त्यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि त्यातूनच लंडनमधील बॉस्टन विद्यापिठातील अभिजित दिपके या युवकाने ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नावाच्या निवडणूक न लढवणार्‍या पक्षाची स्थापना केली. सरन्यायाधिशांच्या वक्तव्यापासून चालू झालेले हे वावटळ अवघ्या शंभर घंट्यांत देशविरोधी शक्तींच्या हातातील साधन कसे होते ? हे घटनाक्रम जाणून घेतल्यास लक्षात येईल.

मोठ्या पाठिंब्याचे गणित

रातोरात बनलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या संकेतस्थळावर या पक्षाचे घोषणापत्र प्रसारित झाले. कथित ‘सामान्य अंसतोषातून जन्मलेल्या या पक्षाला कुणीही प्रायोजक नाही, कुणाचीही देणगी नाही’ असे लिहिलेले आहे. ‘बेरोजगार, आळशी, दिवसातील अधिक वेळ सामाजिक माध्यमांवर ऑनलाईन रहाणारे आणि व्यावसायिकदृष्ट्या एखाद्यावर कठोर टीका करणारे’ अशी या पक्षातील सदस्यांची ‘पात्रता’ आहे. या पक्षाचे सदस्य होण्यासाठीचे आवाहन केल्यावर अवघ्या ४-५ दिवसांत १ कोटी ३० लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली. भाजपला जे करण्यासाठी दशकांचे कष्ट लागले, ते ‘कॉकरोच जनता पार्टी’ने अल्प दिवसांत करून दाखवल्यानेही प्रसारमाध्यमांमध्ये याविषयी ‘प्राईम टाइम’ चर्चासत्रे झडत आहेत. भारतात नको ते उगवणारे तण काढण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या ‘एक्स’ खात्यावर कारवाई करून ते बंद करण्यात आले खरे; परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुयायांची संख्या पोचली ती कशी ? याचा मागोवा घेणे, महत्त्वाचे ठरते.

अल्पावधीत अनुयायांची संख्या वाढवण्यासाठी ‘बॉट’ प्रणालीचा वापर केला जातो, हे सर्वश्रुत आहे. अर्थात्च त्यासाठी पैसे ओतावे लागतात. मध्यंतरी सामाजिक माध्यमांवर एखादी माहिती पसरवण्यासाठी, ‘व्ह्यूज’ची आकडेवारी वाढवण्यासाठी एका ठिकाणी अनेक भ्रमणभाष चालू ठेवले जात असल्याचे कुठल्याशा देशात समोर आले होते. त्यातच अनेक सामाजिक माध्यमांची मुख्य कार्यालये आणि त्यांचे ‘डेटा सेंटर्स’ विदेशी शक्तींच्या हातात आहेत. ही संख्या तांत्रिकदृष्ट्या जाळ्यामुळे वाढवल्याची शक्यता अधिक आहे; कारण ‘सनातन प्रभात’सारख्या निःस्वार्थी आणि समाज, देशहितैषी माध्यमांच्या अनुयायांच्या संख्येत साम्यवादी ‘अल्गोरिदम’मुळे वाढ होतांना दिसत नाही.

दुसरे म्हणजे या पक्षाचा संस्थापक असलेला अभिजित दिपके हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आहे. ‘कॉकरोच’च्या स्थापनेनंतर लगोलग त्याला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेल्या जर्मनीस्थित ध्रुव राठी याची भारतविरोधी मानसिकता सर्वपरिचित आहे. त्यासह अरब देशातील ज्या मुसलमान युवकाने हे संकेतस्थळ बनवून दिले आहे, तोही आपचा कार्यकर्ता राहिला आहे. ज्या वल्गना करत भ्रष्टाचारविरोधाचे वारू चौफेर उधळत ‘आप’ जन्मला, त्याच धर्तीवर ‘कॉकरोच पक्ष’ही जन्माला घातला गेला आहे, हे उघड आहे. या पक्षात सहभागी होणार्‍यांत आणि त्याला पाठिंबा देणार्‍यांत ठराविक वलयांकित व्यक्ती अन् काही राजकीय लोकप्रतिनिधीही आहेत, जे सातत्याने हिंदु आणि देशविरोधी कनाथके पसरवण्यात पुढे असतात. विरोधी पक्षांतील काही जणांनीही या पक्षाला जोर दिला आहे. ‘कॉकरोच’च्या रातोरात लोकप्रियतेचे हे गणित आहे.

डावीकडे अभिजीत दीपके

भावनांचा सापळा

भारतात जेन्-झी चळवळ जन्माला घालण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्याचप्रमाणे जन्मताच उभी रहाण्याच्या धडपडीत अशा चळवळींची पोलखोल होण्याचीही ही पहिली वेळ नाही. शेजारी देशांत सत्तापालट करू शकणारी ही वावटळे भारतात कितीही वेळा उठली असली, तरी ‘ती देशासाठी योग्य नाहीत’, हे भारतियांना आम आदमी पक्षाच्या उगमापासून आतापर्यंतच्या वाटचालीवरून उमगले आहे. प्रश्न विचारून, तर्क लावून, अभ्यास करून संतुलितपणे व्यक्त होणार्‍यांची संख्या भारतात अद्यापही मोठी आहे. त्यामुळे पिढ्यांना नावे देऊन त्यांच्यात दरी निर्माण करण्याचा अलीकडील काही वर्षांतील साम्यवादी प्रकार भारताच्या सांस्कृतिक मुळांना दूर करण्यात सफल झालेला नाही. तरीही ‘डीप स्टेट’-साम्यवादी-जिहादी यांची आघाडी भारतातील ‘जेन झी’कडे आशाळभूतपणे डोळे लावून बसली आहे. शासकीय यंत्रणांच्या, भ्रष्टाचार्‍यांच्या कृत्यांमुळे क्षुब्ध असलेल्यांपैकी काही जण नकळतपणे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या भूलथापांना बळी पडलेले असू शकतात. नवमार्क्सवादात अशांना ‘युजफूल इडियट्स’ म्हटले असून त्यांचा खुबीने वापर केला जात आहे. त्यामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’सारख्या छुप्या साम्यवादी प्रकारांना भारतियांनी भूलू नये. त्यासाठी पंचतंत्रातील लहानशा बोधप्रद गोष्टी पुन्हा समजून घ्याव्यात. सत्य न मानणार्‍या मूर्ख घुबडांच्या नादी लागून खोट्याला सत्य मानू नये आणि धूर्त लोकांच्या संगतीत स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग करण्याच्या भानगडीत पडू नये, हा या ‘झुरळ’ कथेचा बोध आहे.

भारत आणि भारतीय ऊर्जासंकटाच्या काळात ते टाळण्यासाठी अन् त्याची तीव्रता न्यून करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अशा वेळी भारतीय समाजाला योग्य दिशेने घेऊन जाणार्‍यांची आवश्यकता आहे. भारताला नागरिकांचा संघटितपणा, देशप्रेम यांची आवश्यकता असतांना नको त्या चळवळी जन्माला घालून भारतीय युवकांची ऊर्जा भरकटवणार्‍या अशा चळवळींना कोणतेही भविष्य नाही. देश ऊर्जासंकटाच्या उंबरठ्यावर असतांना देशात चालू होणार्‍या कोणत्याही चळवळींना योग्य दिशा आवश्यक आहे. सामाजिक माध्यमांच्या वेगवान युगात भावना भडकवणे, कृत्रिम लोकप्रियता निर्माण करणे आणि काही कथित युवकांच्या असंतोषाला राजकीय दिशा देणे, हे देशविरोधी शक्तींसाठी सोपे झाले आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाने कोणत्याही नव्या चळवळीचा स्वीकार करण्यापूर्वी तिच्या मागील विचारसरणी, निधी, उद्देश आणि लाभार्थी यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भारताला आज भावनिक उत्तेजनातून आलेला क्षणिक आक्रोश नव्हे, तर राष्ट्रनिष्ठ, संयमी आणि विधायक युवकशक्तीची आवश्यकता आहे.

भारतियांनो, डिजिटल युगात जागरूक नागरिक होऊन देशविघातक चळवळींना वेळीच रोखण्यासाठी संघटित व्हा !