
१. शेतभूमीत पारंपरिक बगाड उत्सव साजरा करण्यास शेतमालकाची मनाई
‘बाणेर, पुणे येथे बगाड हा पारंपरिक ग्रामोत्सव शेकडो वर्षांपासून साजरा होतो. हा उत्सव बाणेरचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराशी संबंधित आहे. हा उत्सव प्रामुख्याने हनुमान जयंतीच्या दिवशी आयोजित केला जातो. बगाड, म्हणजे लाकडाची एक मोठी पारंपरिक रचना असते. ती मिरवणुकीच्या माध्यमातून गावात फिरवली जाते. त्यात सहस्रो लोक एकत्र येतात, तसेच भजन-पूजन आणि पारंपरिक कार्यक्रम होतात.
या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा असल्याचे न्यायालयीन प्रकरणातही नमूद झाले आहे. या प्रकरणातील वस्तूस्थिती अशी आहे की, गणेश तापकीर नावाच्या एका व्यक्तीने शेतभूमी (सर्व्हे क्रमांक २८८) खरेदी घेतली. त्यानंतर त्याने त्याच्या भूमीवर होत असलेल्या या पारंपरिक धार्मिक उत्सवावर बंदी घातली. त्याच्या मते ही शेतभूमी त्याच्या मालकीची आहे. त्यामुळे त्याच्या मालकीच्या शेतभूमीत गावकर्यांनी येऊन उत्सव साजरा करण्यास त्याचा विरोध आहे. त्यामुळे न्याय मागण्यासाठी ‘समस्त बाणेर ग्रामस्थ मंडळ’ न्यायालयात गेले.

२. शेतभूमीत उत्सव साजरा करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
या प्रकरणाचा खालच्या न्यायालयाने निवाडा केला. त्यानंतर ग्रामस्थ मुंबई उच्च न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाने ‘इजमेन्टरी राईट्स’च्या (सुखाकार कायद्याच्या) कलम ४ चा उल्लेख करून आणि वर्ष १९६७ खरेदी खताचा आधार घेऊन घोषित केले की, ‘खरेदी खतात हनुमान जयंतीच्या काळात भैरवनाथासाठी शेतभूमीच्या १० गुंठे भागात बगाड उत्सव साजरा केला जातो’, हे स्पष्ट नमूद आहे. खरेदी खतामध्ये एवढी स्पष्ट नोंद असल्याने मूंबई उच्च न्यायालयाने त्याच शेतभूमीमध्ये गावकर्यांना बगाड उत्सव साजरा करण्याची अनुमती दिली. त्यामुळे हा निवाडा मूळ मालकाच्या विरुद्ध गेला. यातून ‘खासगी भूमीवरही हा उत्सव थांबवता येणार नाही’, असे स्पष्ट झाले.

३. परंपरा, श्रद्धा आणि न्यायसंरक्षण यांचा अद्वितीय संगम असलेला बगाड उत्सव !
पुणे शहरात वेगाने विकसित होणार्या उपनगरांपैकी बाणेर हे एक आहे. हे गाव केवळ ‘आयटी पार्क’ आणि ‘आधुनिक जीवनशैली’ यांसाठीच प्रसिद्ध नाही, तर तेथे जपली गेलेली काही शतकांची परंपराही तितकीच महत्त्वाची आहे. त्यापैकीच बगाड उत्सव एक आहे. हा ग्रामोत्सव धार्मिक श्रद्धा, लोकसहभाग आणि सांस्कृतिक ओळख यांचे विलक्षण मिश्रण आहे. या महोत्सवात सहस्रो गावकर्यांचा सहभाग असतो. या वेळी पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशे आणि भजन-कीर्तन यांचा गजर होतो. त्यातून गावातील एकोपा आणि सामूहिक भावना स्पष्ट दृष्टीस पडते. बगाड उत्सव हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संस्थेचा नाही, तर संपूर्ण गावाचा आहे. यात प्रत्येक घर आणि व्यक्ती सहभागी होते. शेकडो वर्षांच्या पालटत्या काळातही ही परंपरा तशीच टिकून आहे. शहरीकरणाच्या लाटेतही बाणेरने त्यांची सांस्कृतिक ओळख जपली आहे. अशा या उत्सवाला मुंबई उच्च न्यायालयाने ‘इजमेन्टरी राईट्स’ किंवा ‘परंपरागत अधिकार’ (कस्टमरी राईट्स) मान्य करून अनुमती दिली. हे न्यायव्यवस्थेतील पालटत्या स्थितीचे लक्षण आहे का ?, हा येणारा काळच सांगेल.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२७.४.२०२६)
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !