ज्यांना भारताची माहिती नसते, तेच असे प्रश्न विचारतात ! – भारताने सुनावले

नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍यावर भारतातील पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आणि मानवाधिकारावर परदेशी महिला पत्रकाराचे प्रश्न

नॉर्वेच्या पत्रकार हेलीी लिंग व भारताचे परराष्ट्र मंत्रालयातील सचिव सिबी जॉर्ज

ओस्लो (नॉर्वे), नवी देहली – युरोपातील देश नॉर्वेच्या दौर्‍यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोरे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या वेळी पत्रकारांना प्रश्न विचारण्यास मनाई करण्यात आली होती. या वेळी स्थानिक पत्रकार हेलीी लिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला; मात्र नियोजनानुसार प्रश्नांना मनाई असल्याने पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले नाही. यावरून हेली लिंग यांनी एक्सवर टीका केली. त्यांनी म्हटले, ‘नॉर्वे ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स’मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत १५७ व्या क्रमांकावर आहे. पत्रकारांचे काम सरकारला प्रश्न विचारणे हे असते.’ यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. तेथे जाऊन त्यांनी भारतीय अधिकार्‍यांशी वाद घातला. ‘आम्ही भारतावर विश्वास का ठेवावा ? भारतात मानवाधिकाराविषयी जे काही घडत आहे, ते थांबवले जाईल का ? पंतप्रधान कधी भारतीय माध्यमांच्या कठीण प्रश्नांची उत्तरे देतील का ?’ असे प्रश्न विचारले. यावर परराष्ट्र मंत्रालयातील पश्चिम व्यवहार सचिव सिबी जॉर्ज यांनी ‘अनेक लोकांना भारताचा आकार आणि येथील माध्यम प्रणाली यांची समज नाही. एकट्या देहलीतच २०० हून अधिक वृत्तवाहिन्या आहेत. इंग्रजी, हिंदी आणि अनेक भाषांमध्ये प्रतिदिन सहस्रो बातम्या दाखवल्या जातात. लोक काही अज्ञात स्वयंसेवी संस्थांचे अहवाल वाचतात आणि मग प्रश्न विचारण्यासाठी येतात’, अशा शब्दांत सुनावले.

जॉर्ज पुढे म्हणाले की,

१. आधी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, भारत काय आहे ? एक देश चार गोष्टींनी बनतो, लोकसंख्या, सरकार, सार्वभौमत्व आणि प्रदेश. भारत ५ सहस्र वर्षांपासून चालत आलेली एक प्राचीन संस्कृती आहे आणि आम्ही जगाला पुष्कळ काही दिले आहे.

२. कोरोना महामारीच्या काळात भारताने स्वतःला जगापासून वेगळे केले नाही. भारताने इतर देशांना साहाय्य केले आणि लस अन्य देशांपर्यंत पोचवली. हेच विश्वासाचे खरे कारण आहे.

३. भारताने ‘जी २०’ (‘जी २०’ म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.) आणि ‘एआय समिट’ (कृत्रिम बुद्धीमत्ता यांवर आधारित परिषद) सारख्या मंचांवरही जगाची महत्त्वाची सूत्रे उपस्थित केली आणि दायित्वाची भूमिका बजावली.

४. आम्ही जगाच्या लोकसंख्येचा सहावा भाग आहोत; पण जगाच्या समस्यांचा सहावा भाग नाही. भारतात जर कुणाच्या हक्कांचे उल्लंघन झाले, तर त्याला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे आणि भारताला आपल्या लोकशाहीचा अभिमान आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारचे प्रश्न कधी डॉनल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेला किंवा शी जिनपिंग यांच्या चीनला विचारण्याचे धाडस कधी विदेशी पत्रकार का करत नाहीत ? तेव्हा त्यांना कसली भीती वाटते ?